भाजपाला काँग्रेसपेक्षा शिवसेना संपविण्याची घाई

बदलत्या काळाची पावलं ज्याला ओळखता येत नाहीत,

तो माणूस वा संस्था-संघटना केविलवाणे झाल्याशिवाय राहत नाही़ शिवसेनेचंही सद्या असंच झालं आहे़ शिवसेनाप्रमुख ऐन भरात असतानाचा शिवसेनचा रुबाब, दरारा, वैभव, मानमरातब शिवसेना विसरायला तयार नाही़ एखाद्या जुना संस्थानिक वा जमीनदार भूतकाळातच रमून पडावा आणि वर्तमानाशी त्याला जुळवूनच घेता येऊ नये, असे काहीसे शिवसेनेचे झाले आहे़ एक काळ होता की, शिवसेना-भाजपा युतीत शिवसेनाप्रमुख म्हणेल तसंच व्हायचं. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे महाराष्ट्राचे नेते बाहेर कितीही डिंगा मारत असले तरी शिवसेनाप्रमुखांसमोर हात जोडून उभे राहायचे़ आऱ के़ लक्ष्मण यांचं तेव्हाचं एक व्यंगचित्र अनेकांना आठवत असेल. शिवसेनाप्रमुख एका खुर्चीत ऐटीत बसून दुस-या  खुर्चीवर पाय लांब करुन  बसले आहेत़ बाजूला छोटा स्टूल आहे़ जागावाटपाची चर्चा करायला प्रमोद महाजन आले आहेत़ बाळासाहेब त्यांना म्हणताहेत़़…हॅव अ सिट़़..भिंतीवरील शिवसेनेचा वाघ मिशा फिस्कारुन मिस्किलपणे हसत आहे़ त्यावेळी खरंच तशी स्थिती होती़ बाळासाहेब भाजपाचा कायम ‘कमळाबाई’ म्हणून उपहास करत असे़ महाजन, मुंडेच काय़़, लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींचीही टर उडवायला शिवसेनाप्रमुख तेव्हा  कमी करत नव्हते़. तेव्हा दिवसच त्यांचे होते़. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रात अफाट लोकप्रिय होते़ भारतीय जनता पक्षाला त्यांचे पाय पकडून राहण्याशिवाय पर्याय नव्हता़ मात्र मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं़ गेल्या अडीच दशकात भाजपच्या सर्व नेत्यांनी शिवेसेनेकडून होणारा अपमान निमूटपणे सहन करुन आपली ताकद वाढविण्याचं काम सुरु ठेवलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपºयात संघटना बांधणीवर त्यांनी लक्ष दिलं. शिवसेनेबद्दल चुकूनही अवमानजनक उद्गार त्यांनी कधी काढले नाहीत़ इकडे शिवसेनेत  बाळासाहेबांच्या करिष्म्यावर सर्व सुभेदारांची मदार होती़ मुंबई-ठाण्याचा अपवाद वगळता राज्याच्या इतर भागात सुनियोजितपणे संघटना बांधणी, पक्ष विस्तार केला पाहिजे, हे शिवसेनेच्या सरदारांच्या कधी डोक्यात आले नाही़ आपला बाप कधी थकूच शकत नाही़ त्याची किमया आपल्याला कायमच तारुन नेईल, या समजुतीत ते राहिलेत़ निसर्गनियमाप्रमाणे बाळासाहेब थकलेत़ त्यांचा करिष्मा आणि धाक ते असतानाच ओसरायला लागला़ परिणामी यांच्या हयातीतच भाऊबंदकीचे प्रयोग गाजलेत़ निष्ठावंत सरदारांची फाटाफूट झाली़ प्रत्येक जिल्ह्यातील सुभेदारांना महत्वाकांक्षेचे धुमारे फुटायला लागलेत़ ते स्वंयभू झालेत़ परिणामी संघटना-पक्ष खिळखिळा झाला़ शिवसेनेचा धाक, दरारा कमी व्हायला लागला़ बाळासाहेबांच्या जाण्यानंतर तर शिवसेनेला गंभीरतेने घेण्याचीही गरज अनेकांना वाटेनाशी झाली़

अनेक वर्ष अपमानाचे घोट पिलेल्या भाजपाने हे हेरलं नसेल तरच नवल़ केंद्रात स्वबळावर सत्ता आणल्यानंतर शिवसेनेची राजकीय गरज न उरलेल्या भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ठरवून शिवसेनेला  डॉमिनेट करणे सुरु केले़ केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक मंत्रिपद देऊन भाजपाने त्यांची बोळवण केली़ उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या नाराजीला त्यांनी कवडीचेही महत्व दिले नाही़ घ्यायचे असेल तर घ्या़़़नाहीतर बाजूला व्हा़़़असा अप्रत्यक्ष मेसेजच भाजपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविला़ पुढे विधानसभा जागावाटपाच्या चर्चेत तर  प्रत्येक टप्प्यावर भाजपाने सेनेची कोंडी केली़ युती तुटावी ही भाजपा नेत्यांची मनापासून इच्छा होती़ फक्त खापर आपल्यावर फुटू नये़ सेनेच्या अडेलतट्टूपणामुळे युती तुटली हे त्यांना दाखवायचे होते़ नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष या युतीच्या सहयोगी पक्षांची शिवसेनेसोबत होत असलेली युतीही अतिशय मुरब्बीपणे अगदी शेवटच्याक्षणी  फिसकटेल अशी व्यवस्था भाजपाने केली़ त्या साºया पक्षांना सत्तेचे गाजर दाखवून आपल्या दावणीला बांधून घेतले़ निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्यावेळीही भाजपाने शिवसेनेचा जेवढा अपमान करता येईल तेवढा केला़ राष्ट्रवादीसोबतच्या छुप्या युतीमुळे सत्तास्थापनेचे ‘ए’ व ‘बी’ प्लान तयार असलेल्या भाजपाने स्पष्ट बहुमत मिळाले नसतानाही राष्ट्रवादीच्या आश्वासनाच्या जोरावर अगदी आत्मविश्वासपूर्वक सत्ता स्थापनेचा दावा केला़ राष्ट्रवादीसोबतच्या चुंबाचुंबीबद्दल संघ परिवारातच कुजबूज सुरु झाल्याने नंतर सव्वा महिन्यानंतर नाईलाजाने शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्यात आले़ मात्र अतिशय दुय्यम खाती शिवसेनेच्या माथी मारण्यात आली़ शिवसेनेही तोही अपमान पचविला़ लोकसभा निवडणुकीतील विजय  ते महाराष्ट्रातील सत्तास्थापना या संपूर्ण कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना उद्धव ठाकरे व शिवसेना यांना खाली दाखविण्याची कुठलीही संधी सोडली नाही़ एवढ्या वर्षाच्या अपमानाचा जणू बदला घ्यावा, असं भाजपा नेत्यांचं वर्तन होतं.
 कमालीचा आत्मविश्वास आणि उद्दामपणा वाढलेल्या भाजपा नेत्यांनी  उद्धव ठाकरेंना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन सोहळयाचं आमंत्रण न देऊन शिवसेनेच्या अपमानाची चरमसीमा गाठली़ ज्या मुंबईत शिवसेनेच्या मर्जीशिवाय काहीही होऊ शकत नाही असे मानले जाते, शिवसेनेने अनेक वर्ष ज्या शहरावर निर्विवाद वर्चस्व गाजविलं, त्या शहरात भाजपाने त्यांचा जबरदस्त अपमान केला़ हे गफलतीने झाले असं मानण्याचं काही कारण नाही़ भाजपाला शिवसेनेला त्यांची जागा दाखवायची आहे़ देशात भाजपाचं लक्ष्य  कॉंग्रेसमुक्त भारत असू शकेल़ मात्र, महाराष्ट्रात त्यांना कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेचा सफाया करण्यात जास्त इंटरेस्ट आहे़ त्याची संपूर्ण तयारीही भाजपाने केली आहे़ प्रश्न हा आहे की, हे सगळं राजकारणाची समज नसलेल्या सामान्य माणसांना समजत असताना शिवसेना एवढा अपमान का सहन करते? कायम स्वाभिमानाच्या गप्पा करणारी शिवसेना वारंवार अब्रू घालवणारा अवमान, अवहेलना वारंवार सहन करते, हे शिवसेना चाहत्यांच्या आकलनापलीकडची गोष्ट आहे़ बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उभे करणे, सुधींद्र कुळकर्णीच्या चेहºयाला शाई फासणे, गुलाम अलीचा कार्यक्रम होऊ न देणे या प्रकारातून शिवसेना आपला चडफडाट व्यक्त करत असली तरी भाजपावर याचा कवडीचाही परिणाम होणार नाही़ उलट शिवेसेनेचं यात हसं होत आहे़ अर्थात शिवसेनेने हे असे प्रकार बाळासाहेब असतानाही अनेकदा केले आहेत़ मात्र फरक हा आहे तेव्हा त्या प्रकाराची किमान भाजपाकडून गंभीर दखल घेतली जात असे़ आता शिवसेना हा किती अपरिपक्व व उथळ पक्ष आहे, हे दाखवून देण्यासाठी भाजपा या प्रसंगांचा वापर करते आहे़
शिवसेना आणखी किती काळ भाजपाकडून होणारा अपमान सहन करते हे पाहणे रंजक ठरणार आहे़ बाळासाहेब आज असते आणि अपमानाचे एवढे प्रसंग घडले असते तर त्यांना केव्हाच सत्तेला लाथ घातली असती आणि भाजपाची पार एैसीतैशी केली असती़ उद्धव ठाकरेंची ती हिंमत होत नाहीय, हे स्पष्ट दिसते आहे़ विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवूनही सत्तेशिवाय आपण शिवसेनेचा रुबाब टिकवू शकू, ही खात्री त्यांना दिसत नाही़ त्यातही राज्यातील सत्तेपेक्षा त्यांचा जीव मुंबई पालिकेतील सत्तेत अधिक अडकलेला दिसतोय़ मुंबई हातची गेली तर शिवसेना संपण्याची ती सुरुवात असेल अशी भिती त्यांना वाटत असावी़ मात्र यावेळी तशीही मुंबई पालिकेची सत्ता सहजासहजी भाजपा त्यांच्या हाती लागू देणार नाही़ शिवसेनेचा जीव कशात आहे, हे एव्हाना साºयांच्या लक्षात आलं आहे़ मुंबईचे सारे पुंजीपती यावेळी भाजपाकडे तिजोरी रिकामी करणार आहे़ राष्ट्रवादीची आतून साथ आहेच़ त्यामुळे पालिका निवडणुकीपर्यंत कळ सोसू, त्यानंतर निर्णय घेऊ असा विचार उद्धव ठाकरे करत असतील, पण तोपर्यंत   शिवसेनेचा मानभंग करणारे असे प्रसंग भाजपा वारंवार घडवून आणेल़ खरं  तर अब्रू घालविणारा अपमान सहन करुन सत्तेसाठी सरकारमध्ये टिकून राहायचं की स्वाभिमान, सत्व जपून बाहेर पडायचं, हा निर्णय शिवसेनेला लवकर घ्यावा लागणार आहे़ नाहीतर आगामी काही दिवसात भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वाघाचा सारा रुबाब उतरवून त्याला आणखी केविलवाणा केल्याशिवाय राहणार नाही़ 
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)

8888744796

Scroll to Top