मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री
पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटरवरील शेरेबाजीची सध्या माध्यमांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. संवादाची सर्व आधुनिक साधनं हाताशी असताना प्रत्यक्ष बोलण्याऐवजी युवापिढीच्या एक नेत्या ट्विटरवरून नाराजी व्यक्त करत होत्या. दुसरा त्यांची समजूत काढत लिपापोती करत होता. हा सर्व प्रकार मनोरंजक तर होताच; पण राजकारणाच्या शाळेत हे दोन्ही नेते अद्याप बालवाडीतच आहेत, हे सांगणाराही होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून घेण्याचा प्रकार पंकजांनाच नव्हे, तर त्यांच्या सर्मथकांनाही चांगलाच दुखावून गेला, असे दिसते आहे. त्यामुळेच काल-परवापर्यंत ज्या देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांना ममत्व होतं, त्यांचे पुतळे जाळण्याचा आततायीपणा करण्यात आला. दुसर्या दिवशी काही जुने फ ोटो सोशल मीडियावर व्हायरल करून जे देवेंद्र फडणवीस एकेकाळी पंकजांची बॅग उचलत होते ते आता आपल्या र्मयादा विसरत चालले आहेत, अशी शेरेबाजी करण्यात आली. अर्थात पंकजा मुंडेंनी हे नक्कीच सांगितलं नसणार. पण अशा अतिरेकी भावना प्रदर्शनामुळे आपल्या नेत्या अडचणीत येऊ शकतात, याचं भान मुंडे सर्मथकांना नक्कीच नव्हतं, हे सांगणार्या या घटना होत्या. अमुक एक खातं काढल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाराजी दाखविणार्या पंकजा व त्यांच्या सर्मथकांना भाजपा व संघाची कार्यपद्धती अद्याप समजू नये, याचं नवल वाटतं. मंत्रिमंडळाबाबतच्या कुठल्याही निर्णयासाठी मुख्यमंत्री जबाबदार असले तरी भाजपात या विषयात पडद्यामागून कसे निर्णय होतात, हे एव्हाना पंकजांना कळायला हवे होते. खरंतर या विषयात फडणवीसांबद्दल रोष बाळगण्याचे कारण नव्हते. देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत मुंडे कुटुंबाला ताकद देण्याचंच काम केलं आहे. नितीन गडकरींच्या गडात राहूनही काल-परवापर्यंत मुंडे सर्मथक अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गोपीनाथ मुंडेंनी अतिशय चतुराईने ‘देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा केली होती. ही अशी घोषणा करून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारले होते. एकीकडे गडकरींना चेकमेट केले होते. दुसरीकडे संघालाही खूश केले होते. मुंडे आज हयात असते, तर भाजपाचं राजकारण बघणं मोठं रंजक राहिलं असतं. दुर्दैवाने ते नाहीत. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर फ डणवीसांनी सार्वजनिकपणे पंकजा यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. चिक्की खरेदी प्रकरण जोरात गाजत होतं, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ठामपणे त्यांचा बचाव केला. मुंडे साहेबांचं भाजपाच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी पंकजांना उचित सन्मानही दिला. त्या पार्श्वभूमीवर घडलेले प्रकार या दोघांच्या संबंधात तणाव निर्माण करू शकतात. सोबतच पक्षनेतृत्वाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रकारही मानला जाऊ शकतो. पंकजा मुंडे व त्यांच्या सर्मथकांनी काही गोष्टी शांतपणे समजून घेतल्या पाहिजेत. पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडे नाहीत, हे सर्वात प्रथम त्यांनी डोक्यात भिनविलं पाहिजे. गोपीनाथ मुंडेंनी जवळपास ३0 वर्षे अथक मेहनत करून, महाराष्ट्राचा कानाकोपरा फि रून, राज्यातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करून स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले होते. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भाजपात व भाजपाबाहेर त्यांना मानणारे हजारो कार्यकर्ते होते. समाजातील वेगवेगळे दबाब गटांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. राजकारणात कुठपर्यंत ताणायचं आणि कुठे सैल सोडायचं, याचं त्यांना भान होतं. विशेष म्हणजे संघ नावाचा प्रकार काय आहे, हे त्यांना नेमकं माहीत होतं. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे अद्याप नवख्या आहेत. त्यांना राजकारणात ‘लंबी रेस का घोडा’ बनायचं असेल, तर भरपूर शिकावं लागणार आहे. सध्या गोपीनाथ मुंडेंची पुण्याई हे एकमेव भांडवल त्यांच्याजवळ आहे. ते फ ार काळ पुरणार नाही. राजकारणात उतावीळपणा व प्रसिद्धीचा सोस या दोन्ही गोष्टी खूप घातक आहेत, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असणं, यात काहीच चूक नाही. मात्र केवळ गोपीनाथजींची कन्या या क्वॉलिफिकेशनच्या जोरावर त्यांना तिथे पोहोचणं अशक्य आहे. त्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. बीड जिल्ह्याच्या बाहेर आपलं नेतृत्व प्रस्थापित करावं लागणार आहे. सर्वात प्रथम त्या ज्या पक्षात काम करत आहेत त्याची कार्यपद्धती समजून घेण्यासोबतच आपले वडील व मामांना संघाने कशी वेसण घातली होती, हा इतिहासही जरा जाणत्यांकडून त्यांना समजावून घ्यावा लागेल. संघाच्या दृष्टीने संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यकर्ता वा नेता हे एक साधन आहे. नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला त्यांच्या दृष्टीने कवडीचाही अर्थ नाही. त्या त्या परिस्थितीत कुठला माणूस कुठल्या कामासाठी योग्य आहे, हे ठरवून त्याला त्या दृष्टीने प्रोजेक्ट करायचं काम संघ परिवार करतो. या प्रक्रियेत एखाद्याच्या डोक्यात हवा गेली की त्याला अलगद जमिनीवर आणण्याचं कामही तो करतो. त्यामुळेच कोण पूर्वी काय होतं आणि कोणाच्या बॅगा उचलत होतं, अशा निर्थक उचापती केल्या तर मुंडे सर्मथकांची निराशाच होण्याची शक्यता आहे. फ ार जुनी गोष्ट नाही. जेव्हा नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणींचे हरकाम्या होते. रथयात्रा आणि नंतरच्या काळातही मोदींची भूमिका हे अडवाणींच्या पीएपेक्षा जास्त नव्हती. आता वर्षानुवर्षे बाळगलेलं पंतप्रधानपदाचं स्वप्न विसरून अडगळीत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. संघाचा अजेंडा जे नेते व्यवस्थित राबवू शकतील, त्यांचीच निवड संघ करत असतो. संघ एका र्मयादेच्या वर एखाद्याला स्टार होऊ देत नाहीत. प्रमोद महाजनांसारख्या ताकदवर नेत्याला २00४ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कसे जमिनीवर आणले होते, हा इतिहास फ ार जुना नाही. एवढंच कशाला संघ परिवाराचे लाडके मानले जाणार्या नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या सर्मथकांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रय▪केला. फडणवीसांऐवजी गडकरीच नेते म्हणून योग्य राहतील अशा वातावरणनिर्मितीचा प्रय▪केला, तेव्हा २४ तासाच्या आत संघाने त्यांचे कान टोचले होते. त्यानंतर शहाणे गडकरी निमूटपणे दिल्लीत रमलेत. संघ सत्तेवर कसं नियंत्रण ठेवतो, हे समजून घ्यायचं असेल, तर नवे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांकडे जरा पाहा. पदवीधर मतदारसंघात निवडून आलेले, कुठलंही भरीव राजकीय कर्तृत्व नसलेले दादा मंत्रिमंडळात एकदम नंबर दोनच्या पदावर पोहोचतात, यामागची समीकरणं ज्यांना कळतात तेच भाजपात सुरळीतपणे काम करू शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळी केंद्र आणि जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे, त्या राज्यातील सत्ताकारणावर जबरदस्त नियंत्रण ठेवून आहे. कुठे काय आणि कसं घडावं, हे ते ठरवीत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे असो वा विनोद तावडे यांचे पंख छाटण्यामागचे कर्तेधर्ते कोण आहेत, हे त्यांच्या सर्मथकांनी समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत संघ, मोदी फडणवीसांच्या पाठीमागे आहेत, तोपर्यंत कोणाला आवडो न आवडो त्यांचा ‘बाल बाका’ होणार नाही, हे निश्चित. |