बापू, महाराज, स्वामी आणि श्रद्धेची झापडं लावलेले भक्त

संत आसारामबापूंना परमेश्‍वर मानणार्‍या लाखो भाबड्या भक्तांसाठी त्यांची अटक प्रचंड धक्कादायक आहे. अलौकिक शक्तीचा दावा करणार्‍या बापूंची कुठलीही शक्ती त्यांना मदत करूशकत नाही, हे पचविणं भक्तांना चांगलंच जड जात असेल. सत्संग आणि प्रवचनांमध्ये ‘निर्भय बनो’चा उपदेश करणारे बापू अटक टाळण्यासाठी पळापळ करतात. डीआयजी, कलेक्टर अशा वरिष्ठ अधिकार्‍यांना विनवणी करतात हे त्यांच्या कल्पनाशक्तीपलीकडचं असेल. ‘मोह-मायासे दूर रहो’ सांगणारे बापू आणि त्यांचे चिरंजीव अब्जावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत, शेकडो स्त्रियांना, तरुणींना ते एकांतात भेटतात, अशा गोष्टी त्यांचे हृदय विदीर्ण करून टाकत असतील. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे बापूंच्या भक्तांचा त्यांच्याबद्दल भ्रमनिरास झाला असेल, असे जर कोणी मानत असेल, तर ते चूक आहे.

 बापूंच्या अटकेनंतर देशभरातील त्यांच्या परमभक्तांनी जे तमाशे केलेत ते पाहता त्यांची बापूंवरील श्रद्धा अढळ आहे, हेच लक्षात येते. तुम्ही त्यांच्यासमोर हजारो पुरावे फेका, त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. श्रद्धेच्या नावाखाली डोकं गहाण ठेवून बसलेली ती माणसं आहेत. त्यामुळेच आसारामच काय, या देशातील कुठल्याही बुवा महाराजांचा भंडाफोड करा, त्याला अटक करा, पुराव्यासह त्याचे कारनामे उघडकीस आणा… त्यांची दुकानदारी कधीही थांबत नाही, हा इतिहास आहे. आसारामबापूंच्या विषयातही तेच होणार आहे. त्यांना तुरुंगातून बाहेर येऊ द्या, पुन्हा हजारो-लाखो माणसं त्यांच्यापुढे वाकायला सुरुवात करतील.

माणसांचं डोकं ताब्यात घेण्याची यंत्रणा निर्माण केलेल्या या बुवा-महाराजांचं सर्वात मोठं हत्यार हे असे भाबडे भक्तच असतात. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘देऊळ’ या चित्रपटात एक छान वाक्य होतं. गावात देऊळ उभारणीच्या नावाखाली दुकानदारी सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झालेलं दिलीप प्रभावळकर एक दिवस कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोहोचतील, असा इशारा नाना पाटेकरला देतात. तेव्हा तो म्हणतो, ”अण्णा, असं होणार नाही. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये भक्तांची भलीमोठी रांग आहे. ती रांग त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही.” मोठं बोलकं वाक्य आहे हे. आपल्या परंपरेने श्रद्धेच्या नावाखाली भक्तांचं डोकं जायबंदी करणारं हत्यारचं धर्माचा-देवाचा वापर करणार्‍यांच्या हाती दिलं आहे. त्याचा वापर करून आसारामसारखे अनेक बुवा-महाराज विवेकबुद्धी आणि विचारशक्ती गमावलेल्या माणसांचे जत्थेच्या जत्थे निर्माण करीत असतात. ही अशी माणसं स्वत:ला त्या महाराजांचे परमभक्त म्हणवितात. सारंकाही डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असूनही सामान्य माणसं या महाराजांच्या नादी का लागतात, याचं कोड भल्याभल्यांना उलगडत नाही. या प्रश्नाचं मानसशास्त्रीय विश्लेषण अनेकदा झालं आहे. ‘अँटलास श्रग्ड’ या जगप्रसिद्ध कादंबरीची लेखिका आयन रँड हिने आपल्या कादंबरीत यामागची नेमकी कारणं मांडली आहेत. ती म्हणते, ”लोकांना विचार करायला नकोच असतो आणि त्यांच्यापुढे जगण्याचे प्रश्न वाढले की, त्यांची विचार करण्याची वृत्ती आणखी कमी कमी होत जाते, पण विचार येणं थांबत नाही. शेवटी ती सहजप्रवृत्ती आहे. त्यांना वाटू लागतं की, त्यांनी विचार करायला हवा, मग त्यांना अपराधी वाटायला लागतं. त्यामुळे जे कोणी त्यांची विचार करण्याच्या गरजेतून सुटका करतील त्यांच्यावर ते खूश असतात. विचार न करण्याचं सर्मथन करणार्‍यांच्या मागे ते जातात. कच्छपी लागतात. आपलं पाप हेचं आपलं सत्कर्म, आपल्या चुका हेच आपले सद्गुण, आपलं दौर्बल्य हीच आपली शक्ती असं कोणी सांगणारा त्यांना भेटला की ते विश्‍वासानं त्याच्या भजनी लागतात.”

आपल्याकडील सार्‍या बुवा-महाराजांची कार्यपद्धती तपासली, तर सामान्य माणसांच्या याच कमकुवतपणाचा फायदा घेऊन त्यांनी आपली दुकानं थाटली असल्याचं लक्षात येईल. माणसाची विचार करण्याची आणि मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता या दोन्ही क्षमता हे बुवा-महाराज श्रद्धेच्या नावाखाली अलगद काढून घेतात. ‘गुरू की चिकित्सा नही’ हेच त्याच्या मनावर सातत्याने बिंबविलं जातं. त्यामुळे आपले गुरू, बापू, महाराज चुकीचं वागूच शकत नाही, अशी त्यांची ठाम समजूत होऊन जाते. त्यामुळे त्यांच्या शेकडो भक्तांच्या डोळ्यासमोर एखादा महाराज एकट्या स्त्रीला एकांतात घेऊन जातो. तिला दीक्षा देण्याच्या नावाखाली तासन्तास बंद दाराआड राहतो. यात कोणालाच चुकीचं काही वाटत नाही. एखाद्यावेळी प्रत्यक्ष डोळ्यांना काही दिसलं तरी बाबा, महाराज आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतील एवढा प्रगाढ विश्‍वास त्यांचा बाबांवर असतो. आसारामबापू ज्या प्रकरणामुळे तुरुंगात गेले आहेत, त्यात तक्रार करणारी ती मुलगी कुटिया सेवेच्या नावाखाली आपल्यासोबत बापूंनी काय-काय केलं हे जिवाच्या आकांताने सांगत असतानाही त्यामुळेच बापूंचे भक्त त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाही. उलट हा बापूंविरुद्ध कट आहे, त्यांना फसविण्याचा प्रय▪आहे, असेच ते सांगत आहेत. एक सर्वसामान्य १६ वर्षांची पोरगी सर्वशक्तिमान बापूंविरुद्ध कट कसा रचेल, हा साधा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. याचं कारण गुरूची चिकित्सा करायची नाही, ही डोक्यात भिनवलेली चुकीची मानसिकता आहे. आपली श्रद्धा तपासली पाहिजे. किमान काही पुरावे समोर आले, नवीन माहिती मिळाली की, त्याची तपासणी केली पाहिजे हेसुद्धा न कळण्याइतपत झापडं त्यांनी लावून घेतली असतात.

हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत.कुठल्याही स्त्रीवर, तरुणीवर हात टाकण्याचं बुवा, महाराज, तांत्रिकांचं निर्ढावलेपण आणि त्यातून सहीसलामत सुटण्याची किमया विदर्भाने, महाराष्ट्राने अनेकदा अनुभवली आहे. काटोलचा गुलाबराव महाराज, बुलडाण्यातला शुकदास महाराज, स्वामी विद्यानंद ऊर्फ आनंदस्वामी, वाघमारेबाबा, व्यंकटनाथ महाराज, मांत्रिक डी. आर. राऊत, कधीकाळी नागपुरात येऊन अनेक स्त्रियांचं शोषण करून गेलेला सुंदरदास महाराज, कृपालू महाराज, दिल्लीचा सदाचारी साईबाबा अशी असंख्य नावं घेता येईल. यांचा भंडाफोड झाल्यानंतर त्या त्या वेळी त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेला तात्कालिक असंतोष सोडला, तर त्यांचं काही फारसं बिघडलं नाही. काहींनी शहर बदलून, कार्यपद्धतीत काहीसा बदल करून आपला शोषणाचा धंदा पूर्वीसारखाच सुरू ठेवला आहे. हे शोषण सर्वस्तरातील स्त्रियांचं होतं. यामध्ये श्रीमंत स्त्रियांपासून, मध्यमवर्गीय, कष्टकरी व अगदी महाविद्यालयीन तरुणी सार्‍याच फशी पडतात. या सगळ्या विषयाचा सखोल अभ्यास केल्यानंतर जी कारणं समोर येतात ती अतिशय धक्कादायक आहेत. आपल्या नैतिक कल्पनांचा चकनाचूर करणारी आहेत.(जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी श्याम मानव यांचं ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा’ हे पुस्तक अवश्य वाचावं) कालपरवाच बुलडाण्यातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राजूरच्या पारस नंदागिरी महाराज ऊर्फ इंजेक्शनबाबाचा भंडाफोड केला, तेव्हा अपत्यप्राप्तीसाठी अनेक चांगल्या घरातील स्त्रिया तेथे नियमित येत असल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. नामवंत लेखिका कविता महाजन यांनी आसारामबापू प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या फेसबुक वॉलवर एक कॉमेंट्स टाकली आहे. त्या म्हणतात, ”सगळे आश्रम बंद करू नयेत. पुरुषांसाठी रेड लाईट एरिया असतो, तशी समांतर व्यवस्था जोवर बायकांसाठी होत नाही, तोवर ते राहू द्यावेत.” या कॉमेंट्समधला गर्भितार्थ लक्षात घेतला, तर तो अतिशय धक्कादायक आहे, पण दुर्दैवाने तो खरा आहे. अतिरेकी श्रद्धा, नैतिकतेच्या चुकीच्या कल्पना, लैंगिक शिक्षणाचा अभाव, बंदिस्त समाजजीवन, स्त्रियांना समान दर्जा नसणं, योनिशुचितेचा पराकोटीचा आग्रह अशा अनेक गोष्टींमुळे अनेक स्त्रिया बाबा-महाराजांची शिकार होतात. त्यामुळेच पुढे महाराजांची हिंमत वाढते. हे असे प्रकार थांबवायचे असतील त्यामागची नेमकी कारण समजावून घेण्यासोबत सत्य पचविण्याची ताकद आपण ठेवली तरच काही बदल होऊ शकतो. नाहीतर ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते परमपूज्य, स्वामी, बापू, महाराज या आवरणाखाली आपल्या स्त्रियांचं शोषण करतच राहतील.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Scroll to Top