बहोत देर कर दी.. हुजूर आते आते!

शरद पवार या नेत्याबद्दल त्यांचे सर्मथक, चाहते आणि अगदी विरोधकसुद्धा आदराने बोलतात. देशातील असा एकही प्रश्न नाही की ज्याबद्दल पवार साहेबांना माहिती नाही, असं कौतुकमिश्रित  स्वरात त्यांच्याबद्दल बोललं जाते. ते खरंही आहे. राजकारणापासून शेती, पैसा, कारखानदारी, सहकार, क्रिकेट, साहित्य, सनातन अशा सगळ्या विषयातील इत्थंभूत माहिती त्यांच्याजवळ असते. सर्वच विषयांबाबत कायम अपडेट असणारा हा नेता आहे. त्यामुळेच अगदी ‘जाणता राजा’ वगैरे बिरुद त्यांच्या पाठीमागे लागलं आहे. अशा या नेत्याला शेतकरी आत्महत्यांच्या विषयातील भयावहता आणि त्यातील गंभीरता माहीत नसेल, हे शक्यच नाही. तरीही एवढी वर्षे हा विषय गांभीर्याने घेतला नाही याबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असताना त्या काळात त्यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट द्यायला वेळ मिळाला नाही. आता सत्ता गेल्यावर कशाला तोंड दाखवले, असा प्रश्न विचारला जात आहे. शरद पवारांवरील ही टीका बिलकूल अनाठायी नाही. यूपीए सरकारच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पवारांनी या प्रश्नाबाबत प्रचंड

अनास्था दाखविली, ही वस्तुस्थिती आहे. पवार साहेबांचे भाट त्यांच्या कृषिमंत्र्याच्या कार्यकाळात शेतकरी हिताचे जेवढे निर्णय झालेत, तेवढे कधीच झाले नाहीत, असे सांगताहेत. कुठल्या शेतकर्‍यांसाठी हे निर्णय झालेत, (कदाचित बारामतीच्या शेतकर्‍यांसाठी असावेत.) माहीत नाही. मात्र विदर्भातील शेतकर्‍यांसाठी खचितच झाले नाहीत. विदर्भाबद्दल त्यांच्या मनात आकस असावा, एवढय़ा रुक्षपणे ते त्या काळात वागलेत. क्रिकेट, लवासा, साखर कारखानदारी या विषयांकडे लक्ष द्यायला भरपूर वेळ असताना विदर्भातील शेतकरी किड्यामुंग्यासारखा मरतो आहे याकडे सपशेल दुर्लक्ष करणार्‍या पवारांबद्दल विदर्भाच्या मनात चीड असणं स्वाभाविक आहे. शेतकरी कुटुंबाला भेट देणे, त्यांचे सांत्वन करणे अशा उपचारात त्यांना रस नसेल हेही समजून घेता येईल, पण कृषिमंत्री म्हणून शेतीविषयक धोरणात काही बदल करणे, कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांचं
आयुष्य किमान काही अंशी सुखकर होईल असे निर्णय घेणे हेसुद्धा पवारांनी त्यांच्या सत्ताकाळात केले नाहीत.
पवार असे का वागलेत कळायला मार्ग नाही. कुठल्याही किचकट समस्येवर मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यात शेती हा त्यांचा आवडता विषय. असे असताना एखाद्या दंगलीत, युद्धात मरणार नाहीत एवढी माणसं १0-२0 वर्षांत स्वत:ला संपवून घेतात आणि पवारांसारखा चतुरस्त्र नेता या समस्येला भिडण्याऐवजी त्याकडे पाठ फिरवताना विदर्भाने पाहिले आहे. हे असं का झालं असावं? केवळ पवारच नव्हे, तर अनेक कार्यक्षम, धडाडीचे मंत्री शेतकरी आत्महत्यांचा विषय निघाला की खांदे झटकतात. नितीन गडकरीसारखा कर्तबगार मंत्रीही याला अपवाद नाही. ही समस्या सुटणे नाही. या प्रश्नावर काहीही इलाज नाही, अशीच मानसिकता लोकप्रतिनिधींसह बहुतांश जनतेची झाली आहे. घरातील एखाद्या वृद्धाचं सततचं दुखणं घरातल्या मंडळींना जशी कटकट वाटते तसा दृष्टिकोन शेतकरी आत्महत्यांबाबत अनेकांचा झाला आहे. ही अशी मानसिकता होण्यामागे काही गृहितकही आहेत. शेतकरी हा आळसी आहे. व्यसनी आहे. काही नवीन प्रयोग करण्याची त्याची तयारी नाही. त्याच्याजवळ धडाडी नाही. त्यामुळे हे असंच होणार. एवढं वरवरच विश्लेषण करून हा विषय संपविला जातो. शेतकरी आत्महत्यांच्या विषयात अनेक वर्षांपासून काम करणारे शेतकरी आंदोलक, कार्यकर्ते जी वस्तुस्थिती सांगतात ती समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. शेतकरी हा प्रचंड मेहनत करतो. तो भरपूर आशावादी असतो. शेकडो प्रयोग करतो. शेवटपर्यंत धडपड करतो. मात्र सगळं काही करूनही सारे पर्याय संपतात तेव्हाच तो गळफास लावतो ही बाब अनेक आत्महत्यांच्या अभ्यासातून पुढे आली आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ज्याच्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला त्या वाशीम जिल्ह्यातील दत्ता लांडगे या तिशीतल्या तरुण शेतकर्‍याच्या आत्महत्येचीही हीच कहाणी आहे. मरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांपासून ठाणेदारापर्यंत आणि आपल्या तरुण पत्नीपासून पाच वर्षांच्या मुलापर्यंत सर्वांना काळीज पिळवटून टाकणारी पत्र लिहून दत्ताने गळफास लावून घेतला. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘साहेब, शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही, पण शेतीसाठी लागणारी साधनं, भांडवलं यामुळे तो वैतागला आहे. मी माझ्या शेतात दोन वर्षांपासून पाईपलाईन टाकली, पण आजपर्यंत एकदाही मी माझं शेत भिजवू शकलो नाही. पाणी आहे, पण वीज नाही. मेहनत करायची ताकद आहे, पण शेतीसाठी पुरेसे भांडवल नाही. या गोष्टींचा विचार करायचा कुणी… तुम्ही शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांना भरघोस पगार, भत्ते, वेतन आयोग देता. उद्योगपतींना भरघोस मदत करतात मग तेच नियम शेतकर्‍यांसाठी का लावत नाही…’ असे खूप सारे अंतर्मुख करणारे प्रश्न दत्ताने विचारले आहेत. जाणतेपणाने मृत्यूला कवटाळण्याच्या काही क्षण आधी दत्ता लांडगेने शेतकरी आत्महत्या का करतात या प्रश्नाचे नेमके उत्तर दिले आहे. दत्तासारख्या तरुण शेतकर्‍याला जे कळतं ते शरद पवार, नितीन गडकरी व इतर नेत्यांना नक्कीच कळत असणार. मग उपाययोजना का होत नाही? शेती या विषयातील पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यासाठी कारणीभूत आहे. शेती हा तोट्याचा धंदा आहे, ही ठाम समजूत नोकरशहा व राजकारण्यांमध्ये आहे. त्यामुळे उद्योगातूनच देशाचे भले होणार आहे, हा नवीन मंत्र आता मोदी, गडकरी, फडणवीस आणि सार्‍याच पक्षाचे नेते देत आहेत. त्यामुळे शेती, शेतकरी आत्महत्यांचा विषय काढला की, हे नेते म्हणतात, ‘शेतकर्‍यांच्या करुण कहाण्या आता खूप झाल्यात. काही ठोस उपाय सांगा.’ शेतकरी आत्महत्यांच्या विषयात केंद्र व राज्य सरकारने डझनभर आयोग, समित्या नेमल्या. त्यांनी आपल्या अहवालात शेकडो उपाय दिले आहेत. हंगामापूर्वी पीककर्ज, वन्य व पाळीव प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणाची सोय, सिंचनाच्या सोयी, बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीत होणारी लूट थांबविणे, पिकाच्या साठवणुकीची सोय, शेतमालाला रास्त भाव, शेतमाल विक्रीची योग्य व्यवस्था…अशा अनेक सूचना पुढे आल्या आहेत. यातील दोन-चार उपाययोजना जरी अंमलात आणल्या असत्या तर शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात घट झाली असती, पण तेव्हा शरद पवार साहेबांना जाग आली नाही. आता सत्ता गेल्यानंतर जाग आली खरी, पण आता देर आये, दुरुस्त आये.. म्हणण्याचीही वेळ निघून गेली आहे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top