माणूस बहुजन असला म्हणजे त्याला काहीही करण्याचा परवाना मिळतो का? भुजबळ असो वा खडसे, या दोघांनीही ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून अमर्याद संपत्ती जमविली, आपल्याच कुटुंबातील सदस्यांना सत्तेचा लाभ दिला, अनेक बेकायदेशीर कृत्ये केलीत, ती केवळ बहुजन असल्यामुळे समर्थनीय ठरतात का? फुले-शाहू-आंबेडकरांचे नावं घेतली, त्यांच्या नावानं स्मारक उभारलीत की, कुठलीही पाप करायला बहुजन मोकळे असतात का?
…………………………………………………………………………………………………………………………………………
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याला आता पाच दिवस लोटलेत़ तरी राजीनामा महात्म्य
सुरूच आहे़. खरं तर त्यांच्या राजीनाम्याबद्दल ते सोडून कोणालाही वाईट वाटायचं कारण नाही़. नाथाभाऊंचे पराक्रमचं एवढे तगडे आहेत की, त्याबद्दल इतर कोणाला दोषी ठरविण्यात अर्थ नाही़. त्यांच्या अधोगतीला संपूर्णत: तेच जबाबदार आहे़. मात्र ते बहुजन असल्यामुळेच त्यांना टारगेट करण्यात आलं, ही टेप वाजणं काही बंद होत नाहीय़. नारायण राणेंपासून राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत सोयीप्रमाणे स्वत:ला कधी मराठा तर कधी बहुजन म्हणविणारे नेते बहुजनांच्या अस्मितेला हात घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत़. आपल्याकडे हे नेहमीचं नाटक आहे़. एखादा मोठा नेता अडचणीत आला की, त्याच्याविरोधात कटकारस्थान सुरू आहे, असं सांगण्याची शर्यत आपल्याकडे नेहमीच लागते़. नाथाभाऊच्या प्रकरणातही पहिला आरोप झाला तेव्हापासून बहुजन नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भाषा सुरू झाली़. हे बोलणाऱ्यांचा रोष उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरूद्ध होता, हे स्पष्ट आहे़. फडणवीसांच्या नावावर कोटी करत, पेशवाईचे दाखले देत मूळ मुद्द्यापासून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाला़. नाथाभाऊंची लोकप्रियता सहन न झाल्याने, नाथाभाऊ भविष्यात आव्हान देऊ शकतात, या भितीने फडणवीसांनी त्यांचा गेम केला, असं सांगणाऱ्यांचीही कमी नाही़ .
हे प्रकार नवीन नाहीत़. बहुजन समाजातला कुठलाही नेता अडचणीत आला की, आपण बहुजन असल्यामुळे आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला जातो, असा कांगावा केला जातो़. छगन भुजबळांच्या प्रकरणात महाराष्ट्राने हे जवळून पाहिले़. राष्ट्रवादीतील मराठा नेत्यांना ओबीसी असलेल्या भुजबळांची लोकप्रियता सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी भुजबळांना अडचणीत आणले, अशी मोहीम अनेक महिने सुरू होती़. विशेष म्हणजे भुजबळ आता तुरूंगात असतानाही हे असंच सांगितलं जात आहे़. भुजबळांनी सत्ता आणि गैरमार्गाचा वापर करून जमविलेल्या कोट्यवधीच्या संपत्तीबद्दल भुजबळभक्तांना काहीही आक्षेप नाही़. नाथाभाऊंच्या समर्थकांचं वागणंही असंच आहे़. प्रस्थापितांविरूद्ध लढायचं असल्यास साम-दाम-दंड-भेद अशी सारी साधनं वापरून भक्कम व्हावं लागतं, असा युक्तिवाद यासाठी केला जातो़. याअगोदरच्या लोकांनी हेच केलं, आम्ही ते केलं, तर काय बिघडलं, असा त्यांचा सवाल असतो़. त्यांनी शेण खाल्लं, मग आम्ही खाल्लं तर बिघडलं कुठे, असा युक्तिवाद करण्याचा नवीन ट्रेण्ड आता देशभर पसरत चाललाय़. नाथाभाऊंसमोरही तोच आदर्श असावा़ त्यांचं वा त्यांच्या समर्थकांचं काम भुजबळांपेक्षा तसं सोपं. ज्यांच्याविरूद्ध कटकारस्थान केल्याचे आरोप करायचे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने ब्राह्मण़. म्हणजे सॉफ्ट टारगेट़. ब्राह्मणांनी काहीही केलं तरी त्यांच्याविरूद्ध गैरसमज पसरविणं अतिशय सोपं. कोणत्याही विषयात सरसकट सगळ्या ब्राह्मणांना खलनायक ठरविणारी मोठी जमात महाराष्ट्रात तयार झाली असल्याने त्यांच्यावर कटकारस्थानाचे आरोप केले की, आपली पाप झाकली जातात, असा अनेकांचा ग्रह आहे़. एकनाथ खडसे ज्यांच्या नावाने …साहेब, आज तुमची उणीव महाराष्ट्राला भासते आहे म्हणून गळा काढताहेत त्या गोपीनाथ मुंडेंनीही या शस्त्राचा वापर केला होता़. राजकीयदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात असेच वातावरण तयार केले होते़. खेदाची गोष्ट ही की, सारासार विचारशक्ती नसलेले कार्यकर्ते या जातीय राजकारणाला लगेच बळी पडतात़. मुंडे साहेबांच्या अंत्यसंस्कारात कारण नसताना नितीन गडकरी मुर्दाबादच्या घोषणा लागल्या होत्या, ती गोष्ट फार जुनी नाही़.
येथे प्रश्न हा निर्माण होतो की माणूस बहुजन असला म्हणजे त्याला काहीही करण्याचा परवाना मिळतो का? भुजबळ असो वा खडसे, या दोघांनीही ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून अमर्याद संपत्ती जमविली, आपल्याच कुटुंबातील सदस्यांना सत्तेचा लाभ दिला, अनेक बेकायदेशीर कृत्ये केली ती केवळ बहुजन असल्यामुळे समर्थनीय ठरतात का? २४ तास फुले-शाहू-आंबेडकरांचे नावं घेतली, त्यांच्या नावानं स्मारक उभारलीत की, कुठलीही पाप करायला बहुजन मोकळे असतात का? कोणताही नेता आपल्या जाती, धर्माचा वापर आपल्या गैरकृत्यावर पांघरूण घालण्यासाठी जर करत असेल, तर तो बनेल असतोच शिवाय न्यूनगंडाने पछाडलेला असतो, हे समजून घेतलं पाहिजे़. भाजपामध्ये बहुजन समाजाच्या नेत्याने चुका केल्या तर त्याला संपविले जाते़ त्याच चुका जर ब्राह्मण वा उच्चवर्णीय जातीतील नेत्यांनी केल्या, तर त्याकडे कानाडोळा केला जातो, असाही एक सूर खडसेंच्या राजीनाम्याच्या निमित्ताने उमटतो आहे़. त्यामध्ये अजिबातच तथ्य नाही, असं नाही़ .मात्र असे आरोप करणारे खडसेंना स्वत:च्या मस्तीमुळे जावे लागले, हे विसरतात़. विरोधी पक्षात असताना जो नेता तोडपाणीसाठी प्रसिद्ध होता, त्याच्या राजीनाम्याला जर कोणी जातीय रंग असेल, तर त्यासारखा दुसरा हलकटपणा नाही़.
बाकी खडसे प्रकरणामुळे गेल्या २० महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पहिल्यांदा सत्वपरीक्षेला सामोरं जावं लागलंय़. तसं याअगोदर पंकजा मुंडे, विनोद तावडे, रणजित पाटील, बबनराव लोणीकर यांच्या लहानमोठ्या प्रकरणामुळे त्यांच्यासमोर प्रॉब्लेम निर्माण झाले होते़. पण ती सारी प्रकरणं पेल्यातील वादळं ठरलीत़. फडणवीस सत्तेत आल्यापासून विरोधकांपेक्षा स्वकीयांच्या भानगडीमुळेच ते जास्त त्रस्त आहे़. या प्रकरणांमुळे एवढी वर्ष प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या त्यांच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला आहे़. विरोधी पक्षात असताना कुठलंही भ्रष्टाचाराचं प्रकरण आलं की, फडणवीस आकाशपाताळ एक करत असे़. मात्र सत्तेत गेल्याबरोबर आता राजकीय सोय-गैरसोय पाहून त्यांना बोलावं लागत आहे़. पंकजा मुंडे चिक्की प्रकरणात अडचणीत आल्या होत्या तेव्हा फारसं खोलात न जाता फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली होती़. खडसे, पाटील, लोणीकर प्रकरणात ते काही बोलले नसले तरी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. मात्र खडसेंची केस नाजूक असल्याने आणि येथे काळजीपूर्वक निर्णय घेतला नाही, तर आपली जात काढली जाईल, याची जाणीव असल्याने त्यांनी हे ऑपरेशन दिल्लीवरून केलं. खडसे आता मंत्रिमंडळातून उडाले असले तरी फडणवीसांना यापुढे सावध राहावं लागणार आहे़. या प्रकरणातून त्यांनी पक्षातील इतर नेत्यांना इशारा मिळाला असला तरी भाजपातील बहुजन लॉबी भविष्यात त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न करणारच नाही, असे नाही़. व्यक्तिश: देवेंद्र फडणवीस स्वत: स्वच्छ असले तरी इतरांच्या नालायकीमुळे आपल्यावर कुठले शितोंडे आपल्यावर उडणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे़. राजकारणातले दलाल जवळच्या नातेवाईकांच्या माध्यमातून कलाकारी करतात, हे देवेंद्र फडणवीसांना माहीत असणाऱ. त्यामुळे पत्नी, भाऊ, मामा, मामेभाऊ , त्यांचे नातेवाईक या जवळच्या गोतावळ्यातून काही भानगड निर्माण होणार नाही, यावर फडणवीसांना बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे़.
जाता जाता- ‘मी स्वत: खाणार नाही आणि इतरांना खाऊ देणार नाही’, या पंतप्रधान नरेद्र मोदींच्या वाक्याचा हवाला देत भाजपातले काही नेते खडसे प्रकरणात भाजपाने नैतिकतेला कसं महत्व दिले, हे सांगताहेत़. पण ते काही खरं नाही़. राजकारणात नैतिकता ही परिस्थिती आणि सोयीप्रमाणे ठरते़ खडसेंजवळ ३०-४० हक्काचे आमदार असते आणि पक्षाला झटका देण्याची ताकद त्यांच्याजवळ असती, तर भाजपा ही हिंमत दाखवू शकला असता का, याबद्दल शंकाच आहे़.