प्रकाशाचं झाड

व्यवस्थेच्या चौकटीत राहून जी माणसं उत्तम शिक्षण घेतात, करिअर करतात, त्यानंतर चांगली नोकरी वा व्यवसाय करतात, मनाजोगतं घर बांधतात, पु. ल. देशपांडेंच्या ‘चौकोनी कुटुंब’ कथेप्रमाणे सुखी संसार करतात, अशा माणसांना आपल्याकडे ‘शहाणी माणसं’ म्हणतात. विजय यशवंत विल्हेकर अशा शहाण्या माणसांपैकी एक नक्कीच नाही. ज्या वयात माणसं शिकतात, त्या वयात या माणसाने जयप्रकाश नारायणांची चळवळ व नंतर नामांतराच्या आंदोलनात उतरून शिक्षणाला रामराम ठोकला. ज्या वयात माणसं करिअर करतात तेव्हा हा शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून सत्ताधार्‍यांशी भांडला. त्यासाठी पोलिसांचा मार खाल्ला. जेव्हा माणसं घर बांधतात तेव्हा याने शेतकर्‍यांच्या चळवळीत झोकून देताना आपल्या घरची शेती व आईचे दागिने गहान ठेवले. गेली 30-35 वर्ष या माणसाचा प्रवास हा असाच प्रवाहाविरूद्ध चाललाय. आजच्या करिअरिस्टिक पिढीसाठी हे सारं आकलनापलीकडचं, काहीसं वेडेपणाचं आहे. पण हा वेडेपणा, कलंदरपणा हीच विजय विल्हेकरांची खरी ओळख आहे.

विजय विल्हेकरांनी आयुष्यभर आपलं कार्यकर्तेपण लख्खपणे जपलं. नेता होण्याच्या फंदात ते कधी पडले नाहीत. ‘आंदोलक कार्यकर्ता’ या शब्दाचा जन्म जणू त्यांच्यासाठीच झाला असावा एवढी आंदोलनं या माणसानं आयुष्यात केली. विदर्भातील शेतकरी व सामाजिक चळवळीतील माणसांना त्यांचं हे रूप चांगलंच परिचित आहे. आज त्यांच्या सत्काराच्या दिवशी अनेक ठिकाणी त्याबद्दल लिहूनही येईल. मात्र विजुभाऊतील माणूसपण आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील अष्टपैलूत्व याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. स्वत: प्रचंड अभावात जगत असताना इतरांना उभारी देण्याची त्यांची ताकद अफाट आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक पुरस्कार मिळाला. त्या पुरस्काराची रक्कम त्यांनी त्याच कार्यक्रमात एका आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नीला देऊन टाकली. माझ्यापेक्षा त्या घरची गरज अधिक, हे त्यांचं यावरचं उत्तर. या परोपकारी वृत्तीबद्दल ते आपल्या जवळच्या माणसांची बोलणीही खातात. मात्र त्यांच्यात फरक पडत नाही. व्यक्तिमत्वात फकिरी वृत्ती ठासून भरलेली. आपल्यापाशी जे आहे ते देऊन टाकणं हे त्यांचं सतत सुरु असतं. त्यामुळे खांद्यावरच्या शबनममध्ये कागदाशिवाय दुसरं काही मिळत नाही. लौकिक अर्थाने हा माणूस भणंग असला तरी याच्या जवळच्या प्रसन्नतेची समृध्दी भल्याभल्यांना हेवा वाटावा लावणारी आहे. तुम्ही कितीही उदास असा, विजुभाऊ जवळ आले की ती उदासी पळून जाणार हे निश्चित. आपल्यापेक्षा वयाने वा लौकिकाने मोठा असलेल्या माणसाला सॅल्युट, तर बरोबरीच्या वा छोटय़ा माणसाला ‘जादू की झप्पी’ (जवळ घेऊन अलिंगन देणे) देऊन ते ही किमया करतात. उत्साह ही मानसिक वृत्ती आहे, असे मानणारे विजुभाऊ लहानथोर सार्‍यांचंच मनापासून कौतुक करतात. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी काही वर्षापूर्वी विदर्भात एका लगAसमारंभासाठी आले होते. अर्धागवायूच्या झटक्यातून नुकतेच सावरल्यामुळे त्यांच्या हातात काठी होती. विजुभाऊंनी स्वत:च रुजविलेल्या शिरस्त्याप्रमाणे त्यांना कडक सॅल्युट ठोकला. शरद जोशी ते पाहून म्हणाले, ‘अरे, तुझ्या सॅल्युटला मी प्रतिसाद देऊ शकत नाही. माझे अवयव आता काम करत नाही.’ विजुभाऊ ताडकन म्हणाले, ‘अवयवाचं काय घेऊन बसलाय? लाखो लोकांना जागविणारा तुमचा मेंदू शाबूत आहे ना.. तेवढं पुरेसं’. या वाक्याने खुद्द शरद जोशींच्या चेहर्‍यावर उत्साह निर्माण झाला होता. लोकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची ही अनोखी ताकद या माणसाजवळ आहे.

या माणसाचे असे खूप पैलू आहेत. हा माणूस चळवळीत आला नसता, तर चांगला अभिनेता वा गायक नक्की झाला असता. विजुभाऊंच्या नकला पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. दर्यापूरच्या जे. डी. पाटील महाविद्यालयात बंद पडलेली नाटय़ चळवळ त्यांनीच पुन्हा सुरू केली होती. त्या काळात जवळपास डझनभर नाटकात काम करण्यासोबतच त्याचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. नाटकाप्रमाणे गायन हा सुद्धा त्यांचा आवडीचा प्रांत. कुठलंही गाणं एकदा ऐकलं की त्यांना तोंडपाठ होऊन जातं. हे असं एकपाठी असणं ही सुध्दा त्यांची आणखी एक खासियत. दिवसा मोर्चामध्ये कंठ फुटेपर्यंत घोषणा देणारा हा माणूस रात्री मित्रांच्या मैफिलीमध्ये नारायण सुर्वेपासून लोकनाथ यशवंतपर्यंत एकेका कवींच्या कविता जेव्हा गातो, तेव्हा तो अनुभव रोमांच निर्माण करणारा असतो. अलीकडच्या काळात लेखक म्हणूनही त्यांची नवीन ओळख विदर्भाला झाली आहे. गेल्या वर्षी एका दैनिकात ‘अंबर हंबर’ या नावाने त्यांनी स्तंभ चालविला. त्या स्तंभाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसांचं असामान्यत्व लोकांसमोर आणलं. शकुंतला रेल्वेला ‘शकुंतला’ हे नाव कसं पडलं इथपासून तर बनोसा येथील तेल विश्वाचा संशोधक जगदीश भैया चुलेट, अल्पशिक्षित गणिततज्ज्ञ धनंजय गुप्ता, तंटय़ा भिल्ल अशी अनेक कर्तृत्ववान माणसं जगासमोर आणली. त्या माणसांचे भावविश्व व त्यांच्या कथा हे सारंच अद्भुत होतं. या स्तंभाच्या माध्यमातून रडतांडव, रडकुंडत, युध्द योजना पीठ, किसान एन्कांउटर, सरण सन्नाटा, मरण विचार, शब्द वेदनेचा नाद, त्रासलकेर, जीवलहरी असे अनेक नवीन शब्द त्यांनी मराठी भाषेला दिले. (आज त्याच लेखांच्या संग्रहाचं ‘अंबर हंबर’ याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशन होणार आहे.)

मेकॅनिझम हा विजुभाऊंचा आणखी एक आवडीचा विषय. कुठलीही गाडी बंद पडली की विजुभाऊ कुशल कारागिरासारखे काही मिनिटात तिला दुरूस्त करणार. आपण कौतुकाने हे कुठे शिकले हे विचारणार, तर ते सांगतात. ‘भाऊ, एकापेक्षा एक भंगार गाडय़ा चालविल्या. कुठंही बंद पडायच्या. प्रत्येकवेळी मेकॅनिक कुठून आणणार? त्यामुळे काडय़ा करता करता शिकलो.’ कुठल्याही प्रसंगात हात गाळून बसलेले विजय विल्हेकर तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही. आंदोलनं आणि चळवळी हेच आयुष्य होऊन बसलेल्या विल्हेकरांच्या कुटुंबावरही स्वाभाविकच त्याचा प्रभाव आहे. घरी कितीही माणसं आलीत तरी पत्नी सिंधूताई आणि मुलांच्या चेहर्‍यावर आठी उमटल्याचं कधी दिसणार नाही. रात्री दीड वाजताही गरमागरम जेवू घालण्याचा दिलदारपणा या घराने जपला आहे. विजुभाऊ व सिंधूताईंच्या मुलांची नावंही चळवळीशी नातं सांगणारी. मुलीच नावं आहे ऋणमुक्ती. 1988 मध्ये शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करत असताना व्ही. पी. सिंग सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. त्याचवेळी जन्म झालेल्या मुलीचं त्यांनी लगेच ‘ऋणमुक्ती’ असं नामकरणं केलं. तर मार्कोनी या प्रख्यात शास्त्रज्ञाच्या नावावरून मुलाचं नाव मार्कोनी ठेवलंय. त्याचा अपभ्रंश होऊन ते आता ‘मार्कोस’ झालंय.

सांगण्याजोगं खूप काही आहे. मात्र माणसं मापण्याची आपली मापंच बदलली असल्याने विजय विल्हेकरसारख्या माणसांच मोलं आपल्याला कळत नाही. तसंही आपल्या आजूबाजूला जाणतेपणानं जगणारी माणसं मोठी असू शकतात, याचं भान आपल्याला कधीच नसतं. व्यवस्थेच्या चौकटीत लौकिक मोठेपणा मिरविणारी माणसंच आपण मोठी मानतो आणि त्यांचे सत्कारावर सत्कार करतो. अर्थात विजुभाऊंना त्याची खंत नाही. आजपर्यंत जे आयुष्य जगलो त्याचा त्यांना अभिमानच आहे. निराशा दूरपर्यंत कुठेच नाही. ‘साजर्‍या (चांगल्या) माणसांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्याने सार्‍या समस्या निर्माण झाल्या आहेत. साजर्‍या माणसांची रांगोळी घातली, तर बघा कसा चमत्कार होतो’, हा त्यांचा आशावाद उभारी देणारा असतो. आज अमरावतीत ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनच्यावतीने सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी धडपडणार्‍या या प्रकाशाच्या झाडाला ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. आपला सारा शहाणपणा थोडा बाजूला ठेवून या ‘सर्किट’ कार्यकत्र्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आपण नक्की या.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-8888744796

Scroll to Top