ऐनकेन प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण आपल्याभोवती केंद्रित
ठेवायचं हे तंत्र शरद पवारांना चांगलं साधतं. शिवसेना-भाजपातील धुसफूस सोडली तर राजकीय आघाडीवर सामसूम असताना ‘आधी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि पेशवे फडणवीसांची नेमणूक करायचे़ आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करतात’, असे वक्तव्य करून पवारांनी सर्वांना कामाला लावून दिले़. शरद पवार हा ‘जाणता राजा’ आहे़ त्यांना जगातील सर्वच विषयातील कळतं आणि ते कधीच चूक करू शकत नाही, असं मानणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी असल्याने साहेबांनी भाजप-संघाच्या नेमक्या वर्मावर बोटं ठेवलं, असं कौतुकाने सांगणाऱ्यांची संख्या कमी नाही़. मात्र इतिहासाचे दाखले देत पवार परवा जे बोललेत, त्यात कौतुक करावं असं काही नाही़ पवारांचं ते वक्तव्य अतिशय खोडसाळ व जातीयवादी तर आहेच, पण पवारांच्या पोटात काहीतरी दुखलं, हे सांगणारंही आहे़.
काय दुखलं, हे स्पष्ट आहे़ भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवलं, ही गोष्ट पवारच नव्हे, तर महाराष्ट्रात अनेकांच्या पचनी पडत नाहीय़ छत्रपतींचा वारसदार प्रतिगामी, जातीयवादी, मनुवादी अशा भाजप-संघ परिवाराच्या माध्यमातून खासदार होतो कसा, ही ती पोटदुखी आहे़ बरं छत्रपती पडलेत मराठा, त्यांच्यावर उघडपणे टीका कशी करायची? त्यापेक्षा फडणवीस हे सॉफ्ट टारगेट. बरं त्यामुळे अगदी मोक्याच्या वेळीच पवारसाहेबांना पेशवे-फडणवीस इतिहासाचं स्मरण झालं. आता पवारांच्या जातीयवादी वक्तव्याबाबत टीका व्हायला लागली असताना त्यांचे ठिकठिकाणी पेरून ठेवलेले ढोंगी पुरोगामी समर्थक पवार साहेब कधीच जातीयवादी नव्हते़. त्यांच्याइतका पुरोगामी नेता आजपर्यंत महाराष्ट्रात झाला नाही, अशी वकिली करत आहेत़. प्रत्यक्षात वास्तव काय आहे? शरद पवार वेगवेगळ्या बुवा-महाराजांपासून, कर्र्मकांडापासून दूर असतात़ नामांतराच्या आंदोलनात त्यांची भूमिका निर्णायक होती वगैरे खरं आहे़. पण ते तोपर्यंतच पुरोगामी असतात, जोपर्यंत त्यांच्या हितसंबंधाना धक्का लागत नाहीत़.
आपल्या हक्काचे मतदार वा अनुयायांना इतर कोणाची मोहिनी पडते आहे हे लक्षात येताच पवारांचा तोल जातो, हे अनेकदा लक्षात आले आहे़. मराठा समाज व शेतकरी या दोन घटकांवर जणू आपली मालकी आहे, असे पवारांना वाटत असते़. त्यामुळे या दोन घटकांना कोणी गळाला लावण्याचा प्रयत्न केला की, पवार काहीतरी चित्रविचित्र बोलतात, याची उदाहरणं आहेत़ शरद जोशी जेव्हा ऐन भरात होते व त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमत असे, तेव्हा आता कुठल्या जोशीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करतील काय, अशी फुसकी पवारांनी सोडली होती़. अलीकडच्या काळात पवारांच्या साखर पट्ट्टयातील शेतकरी खासदार राजू शेट्ट्टींना जोरदार प्रतिसाद देत आहेत, हे पाहून त्यांनी शेट्ट्टींचीही अप्रत्यक्षपणे जात काढली होती़. त्यामुळे शरद पवार जातीचं राजकारण वगैरे करत नाही म्हणणारे नमोभक्तांएवढेच भाबडे आहेत़ शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष वगैरे करत नाही, हे खरं आहे़ ब्राह्मणांबद्दl त्यांच्या मनात काही पूर्वग्रहही नाहीत़. कारण ब्राह्मण त्यांना व्यवहारात चालतो़ सेवेतही चालतो़ (खरं तर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठा व ब्राह्मण या समाजानेच महाराष्ट्रावर राज्य केलं आहे़ मराठा सत्तेत आणि ब्राह्मण प्रशासनात असा मामला आता-आतापर्यंत होता़ दलित, आदिवासी, ओबीसी केवळ तोंडी लावण्यापुरते होते़) पवारच नाही, अनेक मराठे नेते असा दुटप्पीपणा करतात़ मात्र ब्राह्मण वरचढ व्हायला लागली की, महाराष्ट्राला विशेषत: मराठा समाजाला त्याच्या ब्राह्मणत्वाची आठवण पवार खुबीने करून देतात़.
पवारांना आताही पेशवे-फडणवीस आठवायचं कारण म्हणजे एवढे वर्ष ते जे सोशल इंजिनिअरिंग राजकारण करून महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवतं होते, ते आता फडणवीस आणि भाजपा करत आहे, याचा तो तडफडाट आहे़ मराठा समाजाचा मानबिंदू वगैरे मानले जाणारे आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय असलेले छत्रपती संभाजीराजे जर भाजपाच्या तंबूत जात असतील, तर आपल्या राजकारणाचं काय, एवढी वर्ष सांभाळून ठेवलेल्या जहागिरीचं काय, ही चिंता स्वाभाविक आहे़. केवळ पवारच नव्हे तर अनेक मराठा नेते संभाजीराजे प्रकरणामुळे भयंकर अस्वस्थ झाले आहेत़ त्यामुळे ते भाजपावर तर टीका करतच आहेतच, पण छत्रपती शिवाजीमहाराज, शाहू महाराज व फुले, आंबेडकरांचे दाखले देऊन संभाजीराजांनाही अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहे़ खरं तर संभाजीराजे भाजपाच्या माध्यमातून राज्यसभेत गेलेत यामुळे बिथरून जावं असं काही नाही़ संघ परिवाराचा मूळ विचार हा विषमतावादी आहे़. त्यांना स्वातंत्र्य, समता, विवेकवादाचं वावडं आहे, हे जरी खरं असलं तरी एवढ्या वर्षाच्या तीव्र विरोधानंतर त्यांच्या राजकीय शाखेला भारतीय जनता पक्षाला बदलावे लागत आहे़ देशातील वेगवेगळ्या घटकांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळू शकत नाही, हे व्यवहारी शहाणपण भाजपाला केव्हाच आलं आहे़.
त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कितीही आकांडतांडव केलं तरी देशात आज अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील सर्वाधिक खासदार-आमदार त्यांच्या पक्षाचे आहे, हे वास्तव नाकारता येत नाही़ केंद्रातील व अनेक राज्यातील सत्ता आज भाजपाजवळ आहे़ सत्ता आणि मूल्यांच्या लढाईत अपवाद वगळता सत्ताच जिंकली आहे़ सत्तेच्या मोहापासून दूर राहणं भल्याभल्यांना जमत नाही़ त्यातही सत्तेचा मलिदा चाखण्यात हयात गेलेल्यांना तर आणखी कठीण आहे़ त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून संभाजीराजे खासदार झाल्यामुळे थयथयाट करण्यात अर्थ नाही़ केवळ मराठाच नव्हे, तर इतर समाजाचेही नेते भाजपाच्या गळ्याला लागत असतील, तर तो केवळ राजकीय व्यवहार आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे़ शरद पवारांना हे कळत नाही, अशातला भाग नाही़. पण एवढी वर्ष सांभाळून ठेवलेल्या दुकानांना धडका बसताहेत हे पाहून ते अस्वस्थ झाले आहेत आणि त्यातून सोयीचं राजकारण करण्याचा त्यांचा चेहरा पुन्हा एकदा ठसठशीतपणे उघडा पडला़
जाता जाता – बाकी या निमित्ताने महाराष्ट्रातील पुरोगामी म्हणविणाऱ्या सामाजिक कार्यकत्र्यांचा ढोंगीपणाही बऱ्यापैकी उघडकीस आला़ भाजप-संघ परिवारातील कोणी काही अतिरेकी बोललं, तर संपूर्ण माध्यमं डोक्यावर घेणारे पुरोगामी ‘पवारांचं हे वक्तव्य मिश्किल स्वरूपाचं होतं. ते जातीयवादी असूच शकत नाही’, अशी सर्टिफिकेटं देत आहेत़’ हे असे ते यापूर्वीही वागले आहेत़ मनोहर जोशी जर आपल्या घरचा गणपती दूध पितो असे सांगत असेल तर त्यांच्या नादानपणाबद्दल बोललंच पाहिजे, मात्र त्याचवेळी अशोक चव्हाणांच्या शासकीय निवासस्थानी सत्य साईबाबांची पाद्यपूजा होते़ विलासराव देशमुखांपासून अनेक बहुजन नेते त्या बाबांच्या चरणी लीन होतात, त्यावरही तेवढेच तीव्र आसूड ओढले पाहिजेत, याचं भान या सामाजिक कार्यकत्र्यांना तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही़. एखाद्याचं पुरोगामित्व तो कुठल्या जातीत जन्मला आहे यावरून ठरविलं जात असेल, तर ही बदमाशी आहे़. भामटेगिरी आहे़. या अशा दुटप्पी व्यवहारामुळेच पुरोगाम्यांची कुठलीही गोष्ट हा देश गंभीरतेने घेत नाही़.