परिवर्तनाचे चक्र उलटे फिरविणारा खुजेपणा

बातम्यांच्या गर्दीत काही बातम्यांकडे दुर्लक्ष होतं. राजेश खन्नाचं जाणं, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, टीम अण्णाचं उपोषण, ऑलिम्पिकचा धूमधडाका या बातम्यांच्या गदारोळात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी सात जिल्ह्यांची नावं बदलल्याची बातमी दडपल्या गेली. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी गेल्यावर्षी ज्या जिल्ह्यांची नाव बदलली होती, त्या जिल्ह्यांची जुनी नावं अखिलेखकुमारांनी पुन्हा बहाल केली. वरकरणी हा उत्तर प्रदेशच्या कुरघोडीच्या राजकारणातील एक अध्याय वाटतो. मात्र ज्या जिल्ह्यांची नावं बदलली ती जर तपासली, तर जयप्रकाश नारायण व राममनोहर लोहियांचे समाजवादी शिष्य म्हणवून घेणार्‍या मुलायमसिंह यादवांचे चिरंजीव उत्तरप्रदेशला वर्षानुवर्षाच्या जातीय व सरंजामशाही मानसिकतेत कायम ठेवू इच्छितात की काय, असं वाटायला लागतं. अखिलेखकुमारांनी ज्या जिल्ह्यांची नाव बदलली त्यामध्ये छत्रपती शाहूजी महाराज नगर, रमाबाई नगर, भीम नगर, प्रबुद्ध नगर, पंचशील नगर, कांशीराम नगर, महामाया नगर व जेपी नगरचा समावेश आहे. यासोबतच छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय विद्यापीठाचंही नाव बदलण्यात आलं आहे. या विद्यापीठाला पुन्हा एकदा किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ असं नाव देण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाची मायावतींसोबतची खुन्नस लक्षात घेता कांशीराम नगर व महामाया नगरचं नाव बदलणं समजून घेता आलं असतं. मात्र बाकी जिल्ह्यांच्या नाव बदलण्याचा प्रकार अखिलेखकुमारांचं मडकं किती कच्चं आहे, हे सांगणारा आहे. त्यांना थोडी जरी सामाजिक जाण आणि भान असतं, तर ही नाव बदलण्याच्या भानगडीत ते पडले नसते. शाहू महाराजांपेक्षा त्यांना किंग जॉर्ज जवळचे वाटावे यावरून एकंदरितच त्यांचा आवाका लक्षात येतो. केवळ मायावतींच्या व्देषातून अखिलेशकुमार व त्यांच्या पक्षाने संपूर्ण देशातील दलित व ओबीसी समाजाला आत्मभान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराजांचे नाव असलेल्या जिल्ह्यांचं नाव बदलविलं आहे. हा प्रकार निव्वळ पोरकटपणाचा आहे. एक राजकारणी म्हणून मायावती देशातील इतर कुठल्याही राजकारण्याप्रमाणेच भ्रष्ट, नीतीशून्य, कुठलाही विधीनिषेध न पाळणार्‍या आहेत, हे त्यांच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार कार्यकाळावरून सिद्ध झालं आहे. एकीकडे स्वत:ला ‘दलित की बेटी’ म्हणवून घेत असताना त्यांची ऐषआरामी राहणी, कोटय़वधीची संपत्ती, ठिकठिकाणी असलेले बंगले, प्रत्येक शहरात उभारलेले पुतळे हे कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. गेल्या वर्षी केवळ नवीन सॅंडल आणण्यासाठी मुंबईला खास विमान पाठविण्याचा त्यांचा किस्सा प्रचंड गाजला होता. मायावतींचं सगळंच वाईट असं मानणार्‍यांचा एक मोठा वर्ग देशात, विशेषत: मीडियात आहे. या वर्गाला मायावतींचं हे एवढंच एक रूप दिसते. मात्र त्याचं दुसरं रूप अतिशेय लक्षवेधी आहे. ते समजून घेण्याची गरज आहे.भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आणि कायम वेगवेगळ्या वादात अडकल्या असतांनाही उत्तरप्रदेशची जनता त्यांच्यावर विश्वास का टाकते, याची काही कारणं आहेत. शेकडो वर्ष सवर्ण व इतर उच्च जातीच्या वर्चस्वाखाली दबलेल्या दलित समाजाला जागं करून त्यांनी ज्या प्रकारे सत्तेत आणलं, सत्तेचे फायदे मिळवून दिले, त्याची कृतज्ञ जाण तेथील दलित व मागास जनतेला आहे. त्या समाजाला स्वत:च्या ताकदीची, अस्तित्वाची जाणिव करून देतानांच त्या समाजाची वैचारिक मशागत करण्याचं अतिशय महत्वाचं काम कांशीराम, मायावती आणि त्यांच्या पक्षाने केलं आहे. बहुजन समाज पक्ष, त्या पक्षाचे संस्थापक कांशीराम आणि मायावती यांचं सर्वात मोठं योगदान काय असेल, तर फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार हा पुस्तकातून काढून लोकांच्या डोक्यात रूजविला. या तिघांचे विचार त्यांनी उत्तरप्रदेशातील घरांघरात पोहोचविले. त्यासाठी जाणिवपूर्वक त्यांनी मेहनत घेतली. महाराष्ट्रात जन्मलेल्या या महापुरूषांच्या विचार खर्‍या अर्थाने व्यवहारात कोणी आणले असतील, तर ते कांशीराम आणि मायावतींनीच आणले. महाराष्ट्रातील दलित नेते केवळ या तीन नावांचा गजर करण्यात धन्यता मानत आले, मात्र बहुजन समाज पक्षाने फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हा सत्ता मिळवून देऊ शकतो आणि समाजातील शेवटच्या घटकाला सत्तास्थानी पोहोचवू शकतो, हे दाखवून दिले. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी सत्ता कशी राबवायची असते, याचे धडेही त्यांनी घालून दिले. मायावतींनी आपल्या मागील कार्यकाळात उत्तर प्रदेशातील केवळ जिल्हेच नाही, तर वेगवेगळ्या शासकीय संस्था, विद्यापीठ, संशोधन संस्था यांचे नामांतर ओबीसी, दलित व बहुजन समाजातील महापुरूषांच्या नावाने घडवून आणले. गेल्या वर्षी त्यांनी एकाच झटक्यात शाहू महाराज नगर, रमाबाई नगर, कौसंबीनगर, महात्मा फुले नगर, जयभीम नगर, संत रोहिदास नगर, असे जवळपास 15 जिल्ह्यांचे नामकरण केले. अनेक विद्यापीठाची नावंही त्यांनी बदलविली. केवळ नाव बदलून त्या थांबल्या नाही, तर शालेय व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा समावेश केला. सामाजिक क्रांती ही अशी घडवायची असते. महाराष्ट्रात एका मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार (नामांतर नाही) करण्याचा निर्णय काय झाला, तर शेकडो दलितांचे जीव घेण्यात आले, त्यांची घरं जाळण्यात आली. या पाश्र्वभूमीवर उत्तरप्रदेशासारख्या कर्मठ राज्यात केवळ काही महिन्यात शेकडो संस्थांचं नामकरण करण्याचा, अनेक संस्थांचं वैचारिक स्मारकं करण्याचा पराक्रम मायावतींनी करून दाखविला. विशेष म्हणजे हे सारं करताना रक्ताचा एक थेंबही उत्तरप्रदेशात सांडला गेला नाही. (महाराष्ट्रात या पराक्रमाची फार दखलही कोणाला घ्यावीशी वाटली नाही, हा आपला कर्मदरिद्रीपणा.)

आता उत्तर प्रदेशात सत्ता बदल झाल्यानंतर अखिलेश यादव परिवर्तनाचं हे चक्र उलटं फिरवायला निघाले आहेत. मायावतींनी जिल्हा व संस्थांची जी नाव बदलली त्याकडे ते जातीच्या राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहे, हे उघड आहे. आता हे खरं आहे की, उत्तरप्रदेशात जातीचा विचार केल्याशिवाय काहीच होत नाही. मायावती दलित व ओबीसींना घेऊन चालतात, तर मुलायमसिंह यादव आणि मुसलमानांचं राजकारण करतात. मात्र राजकारण करतांना कोणत्याही जाती समूहाच्या माणसासाठी ज्यांचं कर्तृत्व प्रेरणादायी आहे, अशा मोठय़ा माणसांना जातीच्या कुंपणात अडकविण्याचा नादानपणा व्हायला नको. मात्र उत्तर प्रदेशात तो झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा शाहू महाराज यांना एका कुठल्या एका जातीसमूहाशी जोडलं जाणं, हे वैचारिक दिवाळखोरीचं लक्षणं आहे. या तिघांनीही सर्व समाजातील वंचित, अशिक्षित, परंपरेच्या जोखडाखाली हजारो वर्ष अडकून पडलेल्या माणसांना ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग दाखविला आहे. त्या मार्गावर वाटचाल करून देशातील कोटय़वधी माणसांनी स्वत:च्या आयुष्यात परिवर्तन घडविलं आहे.सामान्य माणसाच्या आयुष्यात अंतर्बाह्य बदल घडविण्याच्या विचारामुळेच फुले-शाहू-आंबेडकर इतिहासात अमर झाले आहेत. अशा महापुरूषांची नावे पुसण्याचा करंटेपणा करून अखिलेख यादवांनी मात्र स्वत:ला खुजं करून घेतलं आहे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

मो.8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top