नेते, अभिनेते, महाराजांच्या अनुयायांची अंधभक्ती धोकादायक

                                     

.भारतीय जनमानस समजून घेणं अतिशय कठीण आहे. एकीकडे त्याग, साधेपणा, मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा या मूल्यांची त्याला ओढ असते. ही मूल्ये घेऊन जगणार्‍या माणसांना तो आदर्श मानतो. त्यांची पूजा बांधतो. त्यांचा जयजयकार करतो. दुसरीकडे राजेशाही पद्धतीने सार्‍या सुखोपभोगात रमणार्‍या, कुठल्याही नीतिमूल्यांची चाड न बाळगता स्वैर जगणार्‍या, झगमगाटी दुनियेत राहणार्‍या माणसांचंही त्याला तेवढंच आकर्षण असतं. नैतिकतेच्या कल्पनांचंही तसंच. एकीकडे घरच्या बाईकडे दोन क्षण कोणी रोखून पाहिलं, तर भांडायला निघणारी, घरच्या पोरीने बाहेरील जातीत लग्न केलं, तर तिचा जीव घेणारी माणसं हजारो बायांचा भोग घेणार्‍या बुवा-महाराजांना पूज्य मानतात. त्यांच्यासमोर लोटांगण घालतात. नाना प्रकारची लफडी करणार्‍या सिने अभिनेते-अभिनेत्रींची मंदिरं बांधतात. त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होतात. आपला नेता नालायक आहे, भ्रष्ट आहे, हे माहीत असतानाही त्याच्यासाठी ते संरक्षक कवच बनतात. त्यागाचं आणि भोगाचं हे अनिवार आकर्षण अनादीकाळापासून चालत आलं आहे. 


आता हेच पाहा ना…तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता कुठल्या भव्य-दिव्य कारणांसाठी तुरुगांत गेल्या नाहीत. उत्पन्नापेक्षा कित्येकपट संपत्ती जमविण्याच्या आरोपाखाली १८ वर्षांनंतर त्यांना शिक्षा झाली आहे. एखादा मुख्यमंत्री पदावर असताना त्याला तुरुंगात जावं लागण्याची देशातील ही पहिली वेळ आहे. तब्बल चार वर्ष तुरुंगवास, सर्व मालमत्तांवर टाच, खासगी रुग्णालय सेवेवर प्रतिबंध आणि सोबतीला १00 कोटींचा दंड, असा हा ऐतिहासिक निकाल आहे. कायद्याचं राज्य मानणार्‍या प्रत्येकाने स्वागत करावं असा हा निकाल आहे. मात्र या शिक्षेने आनंद वाटण्याऐवजी तामिळनाडूत मातम आहे. सारा प्रदेश ऊर बडवून घेत आहे. जयललिता तुरुंगात गेल्यानंतर सोळा स्त्री-पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी बोटं कापून घेतलीत. अनेकांना हदयविकाराचा झटका आलाय. राज्यातील शाळा-कॉलेजेस बंद आहेत. अनेक शहरांत तोडफोड सुरू आहे. सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तू मिळणं कठीण झालंय. सामूहिक वेडाचार कसा असतो, हे यानिमित्ताने देश पुन्हा एकदा अनुभवतोय.

टोकाचं व्यक्तिस्तोम माजविण्याच्या प्रवृत्तीतून हे असे प्रकार घडतात. जयललितांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर त्यांचे अनुयायी जरी त्यांना पुरातची तलाईवी (क्रांतिकारी नेता) म्हणत असले, तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडेल, असं काही क्रांतिकारक काम त्यांनी केलं, अशातला भाग नाही. अतिशय महत्त्वाकांक्षी, लहरी, भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राजकारण करणार्‍या नेत्या असाच त्यांचा लौकिक आहे. असं असतानाही त्यांना कायद्याच्या वर ठेवावं, त्यांना सामान्य माणसांच्या जगातील कुठलेच नियम लागू पडू नये, अशी त्यांच्या अनुयायांची अपेक्षा आहे. लोकांची ही मानसिकता मोठी विचित्र असते. आपणच निर्माण केलेल्या भस्मासुराच्या बचावार्थ ते अशा काही हिरीरीने लढतात की, त्यामुळे कायद्याच्या राज्यावर आधारित लोकशाही व्यवस्थाच पांगळी होण्याचा धोका निर्माण होतो. अभिनेते, बुवा-महाराज किंवा कुठल्याही क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींच्या बाबतीत हा प्रकार हमखास घडतो. गेल्या वर्षी आसारामबापूंच्या विषयातही देशाने हे अनुभवले होते. आसारामने अनेक तरुणींवर अत्याचार केले, लहान मुलांचे लैंगिक शोषण केले, हे पुराव्यासहीत समोर आले असतानाही हजारो महिला बापू निर्दोष आहेत, हे सांगणारे पोस्टर्स घेऊन अनेक शहरात रस्त्यावर उतरल्या होत्या. बापू तुरुंगात गेल्यानंतर जोधपूर सेंट्रल जेलच्या प्रमुख दरवाज्यासमोर अजूनही दररोज शेकडो आसारामभक्त लोटांगण घालतात. उद्या आसाराम सुटून आला, तर पुन्हा एकदा लाखोंची गर्दी उसळून परत एकदा त्यांचं दुकान नव्या जोमाने बहरेल, यात शंकाच नाही.

भक्त, अनुयायी व चाहत्यांची अशाप्रकारची अंध भक्ती निकोप समाजनिर्मितीच्या दृष्टीने चिंता वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध व्यक्तींना सारे गुन्हे माफ करून टाकण्याची मोठी उदार प्रवृत्ती आपल्याकडे आहे. समूहाची स्मृती तशीही अल्पजीवी असते. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी असलेला कुठलाही नेता तुरुंगातून बाहेर आला की, जणू देशाच्या सीमेवर लढून आलेल्या वीर सैनिकासारखं त्याचं स्वागत होतं. तिच गोष्ट अभिनेते व महाराजांची. काही वर्षांपूर्वी सलमानखानने फुटपाथवर दारूच्या नशेत काही जणांना उडविलं, हे सारं विसरून लोक त्याच्या सिनेमाला गर्दी करतात. संजय दत्तच्या तुरुंगवासाबद्दलही गळा काढणारे अनेकजण आपल्याकडे आहेतच. लालूप्रसाद तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर लोकांनी पोटनिवडणुकीत त्यांना भरभरून यश दिलं. अशोक चव्हाणांचं आदर्श, पेड न्यूज प्रकरणंही लोक विसरलेत. आपल्याकडे प्रसिद्ध व्यक्तींना स्वत:चं निर्दोषत्व सिद्धच करावं लागतं नाही. त्यांचे चाहते, अनुयायी ते परस्परच करून टाकतात. अशा विचारशून्य अनुयायांचा भरणा असलेल्या देशात जयललिता, लालूप्रसाद यादव, राजा, कलमाडी, आसारामबापू, ओमप्रकाश चौटाला अशांना शिक्षा झाल्यामुळे तात्पुरतं बरं वाटत असलं तरी यांना वाचविण्यासाठी राम जेठमलानींसारखे बुद्धिविक्रय करणारे सज्ज असतातच. त्यामुळे आणखी काही काळानंतर जयललिता जुन्या टेचात पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यात तर नवल वाटायचं काही कारण नाही.

1 thought on “नेते, अभिनेते, महाराजांच्या अनुयायांची अंधभक्ती धोकादायक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top