नेताजींच्या रहस्यावरील पडदा आता तरी उठणार का?

जगाच्या इतिहासात असे काही रहस्य आहेत की, ज्याचा उलगडा कधीच होत नाही. उलट नवनवीन माहितीने ते रहस्य अधिक गडद होतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूचा विषय असाच आहे. दोन महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘नेताजी १९५३ पर्यंत जिवंत होते. रशियाचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष स्टॅलीन यांनी त्यांना सैबेरियात फाशी दिली. तो संपूर्ण घटनाक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहीत होता,’ असा गौप्यस्फोट केला होता. त्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच आता पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाची हेरगिरी केली, अशी नवीन माहिती समोर आहे. ही माहिती एखाद्या बाष्कळ नेत्याचा आरोप वा खळबळ माजविण्यासाठी केलेला स्टंट नाहीय. देशाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने नेताजीसंदर्भातील काही दस्तऐवज जाहीर केले आहेत. त्यातील ही अधिकृत माहिती आहे. ‘गुप्तचर विभागाचे अधिकारी १९४८ ते १९६८ या काळात नेताजींच्या कुटुंबांची हेरगिरी करत होते. एवढंच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांचा आपसातील पत्रव्यवहारही ते नजरेखालून घालत होते. पंतप्रधान नेहरूंना दररोज याबाबत अपडेट दिले जात होते,’ ही माहिती या दस्तऐवजातून उघड झाली आहे. अनुज धर या लेखकाच्या ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकातही याबाबत सविस्तर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या माहितीने अपेक्षेप्रमाणे खळबळ माजली आहे. नेताजींच्या गृहराज्यात पश्‍चिम बंगालमध्ये या विषयातील संपूर्ण सत्य बाहेर यावं, ही मागणी घेऊन नेताजींच्या कुटुंबाने रॅली काढली. नेताजींचे पुतणे चंद्रकुमार बोस यांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून सरकारने नेताजीसंदर्भातील सर्व गोपनीय दस्तऐवज जाहीर करावेत, अशी मागणी केली आहे.

एकेकाळी नेताजींचे अतिशय जवळचे मित्र असलेल्या पंडित नेहरूंनी नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी का केली, हा सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे. या विषयात नेहरूंना थेट खलनायक करण्याअगोदर किंवा इतरही कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी तत्कालीन परिस्थितीची गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते. परवा या विषयावर ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीवर जी सविस्तर चर्चा झाली त्यात नेताजींचे पणतू सुगत बोस यांनी ‘आमच्या कुटुंबाची जी हेरगिरी झाली त्याचे आदेश नेहरूंनी दिले, असे दस्तऐवजात कुठेच नमूद नाही,’ असे स्पष्टपणे सांगितले. नेताजींच्या कुटुंबातील दुसरे सदस्य चंद्रा बोस यांनी नेहरूंचे त्यांच्या कुटुंबासोबतचे संबंध अतिशय जिव्हाळा व आपुलकीचे होते, असे याच कार्यक्रमात नमूद केले. ‘नेहरू पंतप्रधान होण्याअगोदर व नंतरही कोलकात्यात आल्यानंतर आमच्या घरीच उतरत असत,’ असेही त्यांनी सांगितले. मात्र या दोघांनीही बोस कुटुंबाची गुप्तचर खाते आणि पोलिसांकडून हेरगिरी होत होती, हे ठामपणे सांगितले. हा संपूर्ण विषय जरा समग्रपणे समजून घेतल्यास नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी स्वातंत्र्य मिळण्याअगोदरपासूनच म्हणजे नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारल्यापासूनच सुरू झाली होती, हे स्पष्ट आहे. पुढे नेताजींच्या तथाकथित विमान अपघातानंतरही ती सुरूच राहिली. फक्त प्रश्न हा आहे की, इंग्रजांनी सुरू केलेली हेरगिरी स्वतंत्र भारतात सुरू का राहिली आणि पंडित नेहरूंसारख्या माणसाने एका देशभक्त नेत्याच्या कुटुंबाची हेरगिरी सुरू ठेवण्यास संमती का दिली?

या प्रश्नांची उत्तरे शोधणं सोपं नाहीय. हा हेरगिरीचा विषय समोर आल्यानंतर नेताजींच्या गूढ मृत्यूच्या विषयात अभ्यास व संशोधन करणार्‍या अभ्यासकांनी दोन शक्यता व्यक्त केल्या आहेत. एक म्हणजे नेताजींचा मृत्यू १९४६ मध्ये झालाच नव्हता ही गोष्ट इंग्रज सरकार, रशिया, अमेरिका व पंडित नेहरूंना माहीत होती. त्यामुळे नेताजी भविष्यात भारतात येऊ शकतात आणि आझाद हिंद सेनेतील जुन्या सहकार्‍यांच्या मदतीने काही गडबड करू शकतात ही भीती वाटत असल्याने त्यांच्या हालचालींची नेमकी माहिती मिळावी यासाठी ही हेरगिरी झाली असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. (आयबीचे तेव्हाचे अधिकारी नेताजींचे बंधू शिशिरकुमार बोस आणि युरोपात राहणार्‍या नेताजींच्या पत्नी एमिली बोस यांच्यातील पत्रव्यवहारही उघडून वाचत असत.) नेताजींचे अभ्यासपूर्ण चरित्र लिहिणारे ‘महानायक’कार विश्‍वास पाटील यांनी या विषयात एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. नेताजी आणि नेहरू यांची कधीकाळी दाट मैत्री असली तरी नेताजी भारतीयांमध्ये किती अफाट लोकप्रिय आहेत हे नेहरूंना माहीत होते. शिवाय परदेशातून इंग्रजांविरुद्ध लढा दिल्यामुळे त्यांच्याभोवती एक वलय होते. अशा स्थितीत नेताजी जर भारतात परतले, तर देशातील जनता त्यांच्या पाठीमागे जाऊ शकते, या भीतीने नेहरूंनी हेरगिरी सुरू ठेवली असावी, अशी शक्यता ते व्यक्त करतात. या शक्यतेच्या सर्मथनासाठी त्यांनी काही उदाहरणंही दिली आहेत. १९४६ मध्ये नेताजींच्या त्या कथित अपघातानंतर नेताजींच्या सहकार्‍यांनी सिंगापूरमध्ये त्यांचे स्मारक उभारले. मात्र नेताजी इंग्रजांचे युद्ध गुन्हेगार असल्याने तेव्हाचे बर्मा एरिया आर्मीचे लष्करी कमांडर लॉर्ड माऊंटबॅटन (नंतर हेच माऊंटबॅटन भारताचे गव्हर्नर जनरल झाले होते) यांनी सिंगापूर ताब्यात घेताना डायनामाईटने ते उडवून दिले होते. मात्र नेताजींच्या सहकार्‍यांनी ते पुन्हा उभारले. त्या स्मारकाच्या उद््घाटनासाठी त्यांनी पंडित नेहरूंना आमंत्रित केले. नेताजींबद्दल प्रचंड प्रेम असलेल्या नेहरूंनीही ते आमंत्रण स्वीकारले आणि ते सिंगापूरला गेले. मात्र तिथे माऊंटबॅटनने त्यांना निरोप पाठविला की, स्मारकाचे उद््घाटन करण्यापूर्वी माझी भेट घ्या. त्या भेटीत माऊंटबॅटन यांनी नेहरूंना सावध केले. ‘भारताला आता लगेच स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे आता सुभाषचंद्रांचा प्रमाणाबाहेर गौरव करण्याच्या फंदात पडू नका. हा सुभाषीझम तुम्हाला भविष्यात खूप अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका.’ माऊंटबॅटनच्या सल्ल्यानुसार नेहरू वागले. मात्र त्या रात्री त्यांना राहवले नाही. मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास एकट्यानेच त्यांनी नेताजींच्या स्मारकाला भेट दिली. नेहरूंना मौलाना आझादांना लिहिलेल्या पत्रात हा घटनाक्रम असल्याचे पाटील सांगतात.

माऊंटबॅटन यांनी नेहरूंच्या मनात सुभाषबाबूंबद्दल जी पेरणी केली त्यामुळेच त्यांनी नेताजींच्या कुटुंबाची हेरगिरी सुरू ठेवण्यास परवानगी दिली असावी, असा अंदाज आहे. स्वातंत्र्यानंतर आझाद हिंद सेनेतील जवानांना सरकारी नोकरीत घेण्याच्या विषयाबाबत नेहरूंनी राज्यपालांना जी पत्रे लिहिली आहेत त्यात त्यांनी ‘आझाद हिंदच्या सेनेच्या जवानांना सरकारी नोकरीत घ्या, पण त्यांच्यावर सुरक्षेसंदर्भात कोणतीही जबाबदारी देऊ नका. ते संघटित होणार नाही, याची काळजी घ्या,’ असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संपूर्ण नेहरू वाड्मयाच्या दुसर्‍या मालिकेतील खंडात नेहरूंची ही पत्रं सापडतात. नेहरूंची ही पत्रे आणि सिंगापूरचा प्रसंग लक्षात घेतला तर त्यांच्या मनात नेताजींबाबत असुरक्षितता निर्माण झाली होती, हे स्पष्ट दिसते. समजा नेताजी भारतात परतले तर सत्ता समीकरणांची पार उलथापालथ होईल, अशी भीती त्यांच्या मनात नसेलच असे म्हणता येत नाही. नेहरू हा कितीही मोठा माणूस असला आणि नेताजींसोबत त्याची एकेकाळची निखळ मैत्री लक्षात घेतली तरी सत्ता हा मोठा विचित्र विषय असतो. तिथे मैत्री वा रक्ताच्या नातेसंबंधालाही काही अर्थ नसतो, हा इतिहास आहे. शिवाय माऊंटबॅटन, इंग्लंड व रशियाचे तेव्हाचे सत्ताधीश आणि सत्तेच्या वतरुळातील जवळच्या माणसांनी दिलेल्या सल्ल्यांनी नेहरू विचलित झाले नसतील याची खात्री देता येत नाही. अर्थात यात किंतू-परंतु खूप आहेत. एवढी वर्षे गोपनीयतेच्या नावाखाली नेताजींविषयातील माहिती आतापर्यंतच्या सर्व सरकारने दडविली होती. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं पहिलं सरकारही याला अपवाद नव्हतं. मग आताच ही माहिती समोर कशी आली? काहीजण याचा संबंध पुढील वर्षी पश्‍चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीसोबत लावत आहेत. नेताजींबद्दलचे दस्तऐवज जाहीर करून भारतीय जनता पक्ष काँग्रेसला खलनायक करून बंगालच्या जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रय▪करत आहे, असा आरोप होत आहे. नेताजींच्या चाहत्यांना या आरोप-प्रत्यारोपांशी काही देणे-घेणे नाही. कुठल्या का निमित्ताने, शह-काटशहाच्या राजकारणाने का होईना देशाच्या या महान सुपुत्राच्या मृत्यूचे गूढ उलगडावे, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. बाकी गेल्या काही दिवसांत नेताजींच्या विषयात नवनवीन जी माहिती समोर येत आहे ती पाहता १९४६ मध्ये नेताजींचा मृत्यू झाला नव्हता हे आता जवळपास सिद्ध होत आहे. केंद्र सरकारने आजच नेताजींच्या विषयातील गोपनीय दस्तऐवज जाहीर करायचे की नाहीत यावर निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली आयबी, रॉ आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांची एक समिती गठित केली आहे. ६९ वर्षांपासून देश ज्या रहस्यावरील पडदा उघडण्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे, ते काम ही समिती करेल ही आशा बाळगूया.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६
हेही वाचा -नेताजींच्या मृत्यूविषयात रहस्यमय लपवाछपवी -http://avinashdudhe.com/2015/02/blog-post_41.html

Scroll to Top