नीतिमत्तेच्या ठेकेदारांनो…

भाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता आणि चारित्र्याच्या पोकळ आणि पोचट कल्पनांना धक्का बसला की, तेवढय़ाच जोरात त्याला खाली आपटायचं, हा भारतीय माणसांचा आवडता खेळ आहे. ‘सैराट’ चा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा खेळ सध्या अनुभवतो आहे. मात्र नागराजच्या कर्तृत्वाचं मोजमाप त्याच्या कलाकृतीवरूनच केलं पाहिजे. त्याचे आतापर्यंतचे सिनेमे पाहिलेत, तर त्याची अस्सल संवेदनशीलता लक्षात येते. संवेदनशीलता अशी गोष्ट आहे की त्यांचं ढोंग नाही आणता येत. आणि तसंही नागराजने कुठल्याही सिनेमात नीतिमत्तेचे डोस लोकांना पाजले नाहीत. सभोवतीच्या अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना आपल्या अनुभवातून त्याने वाचा फोडलीय. आपला सलाम त्यालाच आहे. नागराजचे वैयक्तिक आयुष्य केवळ त्याचे आहे. तेथे डोकावण्याचा कोणालाही हक्क नाही.

……………………………………………………………………………………………………….

भाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर

घ्यायचं आणि नीतिमत्ता आणि चारित्र्याच्या पोकळ आणि पोचट कल्पनांना धक्का बसला की, तेवढय़ाच जोरात त्याला खाली आपटायचं, हा भारतीय माणसांचा आवडता खेळ आहे. ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे हा खेळ सध्या अनुभवतो आहे. ‘सैराट’ महाराष्ट्रभर सुसाट चालत असताना, मराठी चित्रपटाच्या उत्पन्नांचे सारे रेकॉर्ड मोडित निघत असताना नागराजची माजी बायको लोकांकडे धुणीभांड्याचं काम करते. संघर्षाच्या काळात साथ दिलेल्या बायकोला काही वर्षांपूर्वी नागराजने जबरदस्तीने दूर केले, या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात. कालपर्यंत डोक्यावर घेऊन मिरवलेला नागराज एका क्षणात अनेकांना ‘खलनायक’ वाटायला लागला. त्याचं एवढय़ा वर्षांचं कर्तृत्व लगेचच कवडीमोल ठरविण्याचा प्रय▪सुरू झाला. या प्रकरणातील काहीही माहिती नसताना लोक त्याला ढोंगी ठरवून मोकळे झालेत. रुपेरी पडद्यावर वेदना आणि संवेदना भेदकपणे मांडणारा नागराज नकली आहे, हे सांगणेही सुरू झाले. ‘सैराट’चं यश डोळ्यात खुपणार्‍यांना तर संधीच मिळाली. त्यांनी सोशल मीडियावर नागराजला नीतिमत्तेचे धडे दिलेत. खरंतर या प्रकरणात नेमकं काय घडलं, हे नागराज आणि त्याच्या माजी बायकोलाच माहीत असणार. मात्र आपल्या बुडाखाली काय चालू आहे, हे न पाहता लोकांच्या भानगडीत नाक खुपसण्याची हौस असलेले निष्कर्ष काढून मोकळे झालेत. 

अर्थात असे प्रकार नवीन नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांच्या पूर्व आयुष्यातील प्रकरणं उकरून काढून त्याची चिरफाड करणे, हा जगभरातील माध्यमांचा आणि सामान्य माणसांचाही आवडता विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तारूढ होताच त्यांचं लग्न झालं होतं, हे माध्यमांनी शोधून काढलं. त्यानंतर देशाला ‘अच्छे दिन’ द्यायला निघालेले मोदी आता पंतप्रधान झाल्यानंतर बायकोला ‘अच्छे दिन’ का देत नाहीत, तिला पंतप्रधान निवासात का आणत नाहीत, असे प्रश्न विचारले गेलेत.मोदी आणि स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर चिखलफेकही झाली. सार्वजनिक आयुष्यात राहताना मोदींनी आपले लग्न लपवायला नको होते, ही गोष्ट खरी आहे. मात्र लग्न होऊनही मोदी बायकोसोबत का राहत नाहीत, ते संसार का करत नाही, संसार करायचा नव्हता, तर लग्न का केले? हे सारे प्रश्न अगदी स्वाभाविक असले तरी तो मोदींचा खासगी विषय आहे. त्याची उचापत करण्याचे कोणालाही काही कारण नाही. वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी पडद्याआड ठेवण्याचं स्वातंत्र्य केवळ मोदींनाच नव्हे, तर ते सामान्य माणसालाही असलंच पाहिजे. ज्या गोष्टीचा सार्वजनिक जीवनासोबत, देश आणि समाजहितासोबत कुठलाही संबंध येत नाही, त्या गोष्टीबाबत जाहीर वाच्यता न करण्याच्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे. राजकारणी, फिल्मस्टार, क्रीडापटू आणि इतरही क्षेत्रातील मान्यवरांच्या आयुष्यातील घडामोडींबाबत औत्सुक्य असणं समजून घेता येतं. मात्र त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे माहीत नसताना एकदम धर्मगुरूच्या भूमिकेत जाऊन संस्कार आणि नीतिमत्तेचे धडे देण्याचा उतावीळपणा टाळला पाहिजे.

नामवंत क्रिकेटपटू अझरुद्दीन याच्या आयुष्यावर ‘अझहर’ हा सिनेमा परवा प्रदर्शित झाला. त्या सिनेमात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसोबतच चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानीसोबतच त्याचं प्रेमप्रकरण, बायको नौरिनला सोडून तिच्यासोबत लग्न करण्याचा त्याचा निर्णय, हे सारे नाट्य आले आहे. अझहरने हा निर्णय जेव्हा घेतला होता, तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. संघर्षाच्या काळात साथ दिलेल्या बायकोला सोडून हा माणूस असं कसं करू शकतो, असे प्रश्न विचारले गेले होते. असाच काहीसा प्रकार आमिर खानबाबतही घडला होता. ‘लगान’च्या काळात किरण रावच्या प्रेमात पडल्यानंतर जिच्यासोबत प्रेमविवाह केला होता त्या रिना दत्ता या पहिल्या बायकोला सोडून आमिर किरणसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘संस्कारी’ मने कळवळली होती. अमिताभ-रेखाच्या प्रेमात पडणं, सैफअली खानने अमृता सिंगला सोडून अध्र्या वयाच्या करिना कपूरसोबत लग्न करणे अशा अनेक प्रकरणात त्यांच्या वाट्याला नीतिमत्तेच्या ठेकेदारांचे भरपूर शिव्याशाप आले आहेत. ही अशी प्रकरणं हजारो उदाहरणं देता येतील एवढी आहेत. महाराष्ट्रातील लाडके लेखक, नाटककार आचार्य अत्रे अभिनेत्री वनमालाबाईच्या प्रेमात पडले होते तेव्हा मध्यमवर्गीय पापभिरू माणसांनी आज नागराजला जशी नावं ठेवली होती तशीच नावं त्यांना ठेवली होती. अर्थात हे असं काही पुरुषच करतात, असं नाही. अनेक विवाहित महिलाही आपला नवरा, मुलं सोडून दुसर्‍या पुरुषाच्या प्रेमात पडून लग्न करतात. पहिल्या पिढीतील नामवंत अभिनेत्री देविकाराणी आपले पती नामवंत चित्रपट दिग्दर्शक हिमांशू रॉय यांना सोडून स्वेतोस्लॅव्ह रोरेच या रशियन चित्रकारासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. व्ही. शांताराम यांच्या दुसर्‍या पत्नी अभिनेत्री जयश्री आपल्या नवर्‍याला सोडून शांताराम यांच्याकडे आल्या होत्या. असं असताना शांताराम यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ची अभिनेत्री संध्यासोबत तिसरा विवाह केलाच होता. गेल्या पिढीतील अभिनेत्री योगिता बालीने नवरा किशोर कुमारला सोडून मिथुन चक्रवतीसोबत विवाह केला होता. अर्थात नामवंताच्याच आयुष्यात अशी प्रकरणे घडतात असे नाही. आपल्या आजूबाजूला जरा बारकाईने पाहिले तर सामान्य माणसांच्याही आयुष्यात सर्रास असे प्रकरण घडताना आढळतात.

विवाहसंस्थेच्या प्रारंभापासून ही अशी प्रकरणे घडतच आहेत. याचं कारण विवाहसंस्था हा प्रकारच कृत्रिम आहे. स्त्रियांना वैयक्तिक संपत्ती समजून त्यांना बांधून ठेवण्यासाठी या संस्थेची निर्मिती झाली आहे. आपल्या संपत्तीचा हक्काचा वारस जन्माला घालण्यासाठी विवाहसंस्था निर्माण करण्यात आली आहे. धार्मिक संस्काराच्या माध्यमातून एक हक्काचा गुलाम आणण्यासाठी ही संस्था आहे. विवाहसंस्थेचा उदोउदो पुरुषांनी केला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांनीही पुढे विवाहसंस्थेची पाठराखण केली. मुळात लग्नसंस्थेने दोन स्त्री-पुरुष नवरा-बायको म्हणून एकत्रित येत असले तरी आयुष्यभर एकमेकांसोबत बांधून घेणे हा त्यांचा मूळ पिंडच नाही. वर्षानुवर्षाच्या संस्कारातून ते एकमेकांसोबत एकनिष्ठ राहण्याचा अयशस्वी प्रय▪करत असले तरी ज्या जनावरांपासून उत्क्रांत होतं ते मानव झाले त्यात एकनिष्ठता वगैरे प्रकार कुठे नसतो. एकापेक्षा अधिक नराकडे, मादीकडे आकर्षित होणे हा जनावरांचा पिंड आहे. हजारो वर्षांच्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेत मनुष्य अधिकाधिक संस्कारित व्हायचा प्रय▪करतो आहे. पण त्याची मूळ प्रवृत्ती वेळोवळी उफाळून येते. तो किंवा ती एकापेक्षा अधिक व्यक्तींकडे आकर्षित होतातच. त्यातून हे असे प्रकार घडतात. मानवाच्या उत्क्रांतीचा आणि विवाहसंस्थेचा उगम कसा झाला याचा खोलात जाऊन अभ्यास केला, तर माणसं अशी का वागतात, याचे अगदी समाधानकारक उत्तर मिळते. मात्र हे असे प्रकार घडलेत की, संस्कृती व नीतिमत्तेच्या ठेकेदारांचं अवघं भूमंडळ थरथरून जातं. ते पार हडबडून जातात. मात्र स्त्री-पुरुषांवर कितीही बंधने टाकलीत, संस्काराच्या कितीही कॅसेट वाजविल्यात तरी हे प्रकार थांबविणं आपल्या हातात नाहीच, ही असहायता त्यांना अधिक अस्वस्थ करून जाते.

मुळात स्त्री-पुरुष संबंधाला खूप आयाम आहेत. बरेचदा लग्नाच्या वयात नवरा-बायको दोघांनाही काहीच समज नसते. घरच्या वडिलधार्‍यांनी ते लावून दिलं असतं. एकमेकांचा स्वभाव, आवडीनिवडी, वृत्ती-प्रवृत्ती जुळतात की नाही, याचा काहीच विचार नसतो. लग्नानंतर त्या दोघांपैकी एकजण कोणी प्रतिभावंत, कलावंत, लेखक, क्रीडापटू, राजकारणी असं काही असला की त्याचं वा तिचं विश्‍व संपूर्णत: वेगळं होऊन जातं. त्याची व तिची विचार करण्याची पद्धत बदलते. त्याची वा तिची उंची वाढत जाते.बाहेर तो वा ती फुलत असताना, बहरत असताना घरात मात्र अनेकदा त्याची वा तिची किंमत नसते. तिथे सामान्य संसारी चष्म्यातूनच त्यांची चिरफाड सुरू असते. अशा स्थितीत त्याच्या वा तिच्या ऊज्रेला, कल्पनाशक्तीला साद देणारा दुसरा कोणी भेटला ते वेडावल्यागत त्या दुसर्‍याकडे, दुसरीकडे झेपावले जातात. हे सगळं घडत असताना नवरा-बायकोतला एकजण संसारात आहे तिथेच अडकून असतो. हे अनेकदा स्त्रियांबाबत होते. त्यांच्यासाठी घर, मुलं, नातेवाईक या प्राथमिकता असतात. दुसरीकडे तो आपल्या विश्‍वात गुंग असतो. अशातच दरी वाढत जाते आणि एकमेकांसोबत आपलं आता जमत नाही, हे लक्षात येते. जे समजदार आहेत ते समजुतीने एकमेकांपासून दूर होतात. काही नाईलाजाने जुळवून घेतात. काही दूर झाल्यानंतरही एकमेकांचे वाभाडे काढत राहतात. मात्र त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं असतं हे त्या दोघांनाच माहीत असते. नागराजच्याही आयुष्यात थोड्याफार फरकाने असंच काहीसं घडलं असणारं किंवा त्याची कहाणी संपूर्णत: वेगळी असणार. मात्र जे काय असेल ते त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या खासगीपणाचा सन्मान आपण केलाच पाहिजे. त्याच्या कर्तृत्वाचं मोजमाप त्याच्या कलाकृतीवरूनच केलं पाहिजे. त्याचे आतापर्यंतचे सिनेमे पाहिलेत, तर त्याची अस्सल संवेदनशीलता लक्षात येते. संवदेनशीलता अशी गोष्ट आहे की त्यांचं ढोंग नाही आणता येत. आणि तसंही नागराजने कुठल्याही सिनेमात नीतिमत्तेचे डोस लोकांना पाजले नाहीत. सभोवतीच्या अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांना आपल्या अनुभवातून त्याने वाचा फोडलीय. आपला सलाम त्यालाच आहे. नागराजचे वैयक्तिक आयुष्य केवळ त्याचे आहे. तेथे डोकावण्याचा कोणालाही हक्क नाही.

#sairat

12 thoughts on “नीतिमत्तेच्या ठेकेदारांनो…”

  1. वा अविनाशजी , नागराज प्रकरणाचं अतिशय सुंदर विश्लेषण केलंत . मुळात दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यात तोंड खुपसणे ही पानटपरीवरच्या रिकामचोटांची प्रवृत्ती आहे . ना.सी.फडके , ग.वा. बेहरे , आनंद साधले ह्यांच्यावारही अशीच चिखलफेक झाली होती.पण त्यांनी झ्याट पर्वा केली नाही . पुरून उरले , लिहित राहिले . संसार तुटण्याची अनेक कारणे असतात आणि ती फक्त ज्याची त्यालाच माहिती असतात. नागराजने ह्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ नये असे मला वाटते . जे स्त्री पुरुष एकनिष्ठ आहेत त्यांच्याविषयी आदरच बाळगला पाहिजे. पण जे निष्ठा राखू शकत नाहीत ते वाईटच असतात हा भ्रमही दूर केला पाहिजे . तसा तर विवाह हा एक व्यवहार आहे . वरून त्याला फक्त उदात्ततेचा मुलामा चढविला आहे . पण सत्य पचविणे सर्वांनाच कठीण जाते . निसर्गात प्राणीमात्रांचे वर्गीकरण दोनच प्रकारात अस्तित्वात आहे . एक – 'मोनोगामी ' म्हणजे पार्टनरशी निष्ठा राखणारे . दोन – ' पॉलीगामी ' म्हणजे पार्टनरशी निष्ठा न राखणारे. ह्यात मानवप्राणी ' पॉलीगामी ' प्रकारात मोडतो . हे जैविक सत्य आहे. तरीही ह्या मुद्द्यावर एवढा गदारोळ ?
    – अशोक थोरात .
    अमरावती .

  2. वरील गोष्टींशी मी सहमत आहे …..नागराज ला आपण त्याच्या कलाकृतीतून ओळखतो ….त्याच्या वैयक्तिक जीवनात तो कसा आहे, त्याने काय केलाय, किती खस्ता खाल्लाय अश्या अनेक गोष्टींशी लोकांच काहीच घेणं देणं नाही …तरीही लोक नको तिथे नाक खुपसतात …..मराठीत एक म्हण आहे ना …. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून… नागराज सारखा माणूस शुण्यातुनं वर आलाय हे कसे काय लोक विसरतात जेव्हा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल वाईट साईट बोलताना ….प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ हा असतोच …. मग तो चांगलाही असू शकतो किवा वाईट देखील असू शकतो ….पण त्या सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाणारा माणूसच खऱ्या अर्थाने आपण चांगला समजतो …जो माणूस रुपेरी पडद्यावर इतकं छान चित्र दाखवू शकतो त्या माणसाबद्दल काहीही वाईट बोलताना थोडा तरी विचार करावा लोकांनी…अथवा इतर काही मत व्यक्त करण्यापूर्वी त्या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा करणे योग्य ठरेल ….त्यामुळे कोणाच्याही वयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच बरी …

  3. फारच छान लेख लिहिला आहे…. एक डॉक्टर म्हणून मी अशा अनेक केसेस बघितल्या आहेत

  4. फारच छान लेख लिहिला आहे…. एक डॉक्टर म्हणून मी अशा अनेक केसेस बघितल्या आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top