निजामाच्या चित्तरकथा

कधीकाळी भारतातील गोवळकोंडा खाणीत सापडलेल्या ‘प्रिन्सी’ नावाच्या गुलाबी हिर्‍याला अलीकडेच लंडन येथे झालेल्या एका लिलावात तब्बल दोनशे कोटी रुपये एवढी किंमत मिळाली आहे.आतापर्यंत कोणत्याही हिर्‍याला लिलावात एवढी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ३४.६५ कॅरेट वजनाचा हा हिरा अनेक वर्षांपर्यंत हैदराबाद संस्थानवर राज्य करणार्‍या निजामाच्या मालकीचा होता. या अनमोल गुलाबी हिर्‍याच्या लिलावाच्या निमित्ताने हैदराबादचा विलक्षण व विक्षिप्त निजाम आणि त्याच्या प्रचंड संपत्तीच्या अद्भुत सत्यकथांचे पुन्हा एकदा स्मरण झाले आहे. इंग्रजशासित भारतातील सर्वात मोठा संस्थानिक असलेला निजाम १९४७ मध्ये जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. तेव्हा त्याची संपत्ती दोन बिलियन डॉलरपेक्षा अधिक होती. स्वतंत्र भारताच्या तिजोरीत तेव्हा जेमतेम एक बिलियन डॉलरही नव्हते. यावरून निजाम किती श्रीमंत होता, हे लक्षात येईल. जेवढा श्रीमंत तेवढाच लोभी आणि कंजूष असलेल्या या सातव्या निजामाचे नाव नवाब मीर उस्मान असे होते. ‘रुस्तुम-ई दौरान’, ‘अरस्तू-ए-जमाल’, ‘अलिखाँ बहादूर मुइझफ्फर-उल्-मुदकनिजाम-अल्-मूद’, ‘असिफ झा’, ‘वलमा मलीक’, ‘सिपाहसालार फतेह जंग’ अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जायचा. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना केलेल्या मदतीमुळे त्यांनी त्याला ‘हिज एक्झाल्डेड हायनेस’ ही त्या वेळी मानाची मानली जाणारी पदवी बहाल केली होती.

१९१५ ते १९४७ या काळात हैदराबादमध्ये ब्रिटिश रेसिडेंट म्हणून काम करणार्‍या ब्रिटिश अधिकार्‍यांनी या निजामाबाबत खूप रंजक कथा-किस्से लिहून ठेवले आहेत. त्यातील एक नोंद अशी- ”आपल्याजवळ किती संपत्ती याची निजामालाच माहिती नव्हती. त्याच्या राजवाड्याच्या वेगवेगळ्या कक्षात मोजता येण्यापलीकडची संपत्ती कायम पडून असे. राजवाड्याच्या बाहेरील बगिच्यांमध्ये बारा ट्रकमध्ये हजारो सुवर्णाच्या चिपा साठवून ठेवल्या होत्या आणि त्या अनेक वर्षांपर्यंत तशाच पडून होत्या. बगिच्यातले ते ट्रक त्यातील सोन्याच्या वजनाने चिखलात बुडालेल्या अवस्थेत होते. निजामाच्या जवाहिराचा संग्रहही अवाढव्यच होता. त्याच्या खजिन्यातील मोती जरी पसरून ठेवायचे म्हटले, तर लंडनच्या पिकॅडली सर्कलचे फुटपाथ पुरायचे नाहीत. अशी ही रत्ने-मोती, पाचू, माणके, हिरे एखादा कोळशाचा ढीग रचून ठेवावा तशी पडली होती. तळघराच्या जमिनीवर, जुन्या कागदाच्या कपट्यात बांधून ठेवलेल्या पैशाची मोजदाद जवळपास चार कोटी रुपये होती. राजवाड्याच्या तळघरात धूळखात पडलेल्या या नाण्यांवर आपले दात घासून घेण्याचे काम तेथील उंदरांकडून पार पडत असे. निजामाच्या डेस्कच्या खणात एका जुन्या वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळलेला लिंबाच्या आकाराचा जेकब नावाचा हिरा होता. त्या हिर्‍याचे वजन दोनशे आठ कॅरेट होते. निजाम त्याचा उपयोग पेपरवेट म्हणून करे. (या जेकबची सध्याची किंमत १00 दशलक्ष पौंडपेक्षा अधिक आहे.) त्याच्याजवळ शेकडो शर्यतीचे घोडे, त्या काळच्या महागड्या रोल्स राईस गाड्या आणि जगभरातील उत्तमोत्तम वस्तूंचा संग्रह होता.”

एवढय़ा प्रचंड संपत्तीचा मालक असलेला हा सातवा निजाम होता. मात्र मोठा विक्षिप्त आणि विचित्र. पैसे वाचविता कसे येतील हाच विचार कायम त्याच्या डोक्यात राहत असे. त्याच्या अंगात नेहमी साधा अंगरखा व सुती पायजमा असे. अनेक वर्षांपर्यंत एकच मळकी विटकरी रंगाची फेजटोपी तो घालत असे. खजिन्यात देशविदेशातील महागड्या वस्तू असताना तो साध्या टिनच्या ताटात जेवण घ्यायचा. त्याच्या चिक्कूपणाचे खूप किस्से आहेत. सिगारेटवरचा खर्च वाचावा यासाठी पाहुण्यांनी ओढून फेकून दिलेल्या सिगारेटची थोटुके तो ओढायचा. इंग्रज अधिकार्‍यांसोबतच्या एखाद्या भोजनसमारंभात श्ॉम्पेनची एकच बॉटल तो बाहेर काढायचा. १९४४ मध्ये लॉर्ड वेव्हेल व्हॉईसरॉय म्हणून हैदराबादच्या दौर्‍यावर गेले होते, तेव्हा आता युद्ध सुरू असल्याने त्यांना श्ॉम्पेन दिली नाही, तर चालणार नाही काय, अशी विचारणा त्याने रेसिडेंटकडे केली होती. हैदराबादचा रेसिडेंट प्रत्येक रविवारी निजामाची भेट घ्यायला जात असे. त्या वेळी त्याच्यासाठी चहाचा एकच कप, एकच बिस्किट आणि एकच सिगारेट नोकराकडून आणली जात असे. एकदा रेसिडेंट आपल्यासोबत एक पाहुणा घेऊन गेला होता. तेव्हा कसानुसा चेहरा करून निजामाने त्यालाही चहाचा कप आणि एक बिस्किट देण्याची मेहरबानी दाखविली होती.

हैदराबादच्या संस्थानात दरवर्षी एका समारंभात निजामाचे दरबारी त्याच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी सोन्याचे एक नाणे प्रतिकात्मकरीत्या त्याला भेट देत असत. हा निजाम गादीवर येण्यापूर्वी प्रथा अशी होती की, त्या नाण्याला निजामाने नुसता हात लावायचा आणि भेट स्वीकारल्याचं दाखवीत पुन्हा ते नाणं दरबार्‍याला परत करायचं. मात्र या निजामाचं सारंच वेगळं होतं. दरबार्‍याने नाणे दिल्याबरोबर हा ते नाणे हिसकून घेतल्यासारखे ओढायचा. लगेच सिंहासनाजवळ ठेवलेल्या एका पिशवीत ते जमा करायचा. एकदा नाणे स्वीकारताना ते खाली पडले आणि घरंगळत दूर गेले, तर या निजामाने खाली वाकून हातपाय टेकून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. एकदा निजामाची तब्येत बिघडल्याने मुंबईहून एक तज्ज्ञ डॉक्टर बोलाविण्यात आला होता. डॉक्टरांनी निजामाचा इलेक्ट्रोकार्डियोग्रॅम काढण्यासाठी उपकरण बाहेर काढले. मात्र ते कामच करत नव्हते. काय बिघाड झाला म्हणून डॉक्टरांनी चेक केले, तर राजवाड्यात वीजच नाही, असे लक्षात आले. अर्थात वीज नव्हती अशातला भाग नाही. मात्र विजेचे बिल वाढेल, म्हणून निजामसाहेबांनी राजवाड्यातील वीजप्रवाह बंद करून ठेवला होता. आता बोला. निजामाच्या या कथांमध्ये कुठलीही अतिशयोक्ती नाही. लंडनमध्ये ब्रिटिशांनी भारताचा जो रेकॉर्ड जपून ठेवला आहे, त्यामध्ये या सर्व नोंदी आहेत.

जेमतेम पाच फूट तीन इंच उंची, ४0-४२ किलो वजनाचा या निजामाला पान खाण्याचा एकमेव शौक होता. पाशा व इकबाल बेगमसह एकूण सात स्त्रियांसोबत त्याने विवाह केले होते. याशिवाय ४२ स्त्रियांचा त्याच्या जनानखान्यात समावेश होता. या सर्वांपासून त्याला तब्बल १४९ मुलं-मुली झालेत. (त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या या वारसांमध्ये संपत्तीवरून प्रचंड भांडणं झालीत. दीर्घकाळपर्यंत न्यायालयीन लढाया झाल्यात.) इस्लामवर भरपूर श्रद्धा असलेल्या या निजामाला आपल्याला कोणीतरी अन्नातून विष घालून मारणार अशी नेहमी भीती वाटत असे. त्यामुळे अन्नपदार्थ चाखण्यासाठी तो कायम एक सेवक आपल्यासोबत ठेवत असे. त्याच्या जेवणात मलई, एखादी मिठाई, काही फळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाटीभर अफू राहत असे. देश स्वतंत्र झाल्यानंतर या निजामाने भारतात विलीन होण्याचं नाकारून स्वतंत्र राहण्याचं ठरविलं होतं. एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्राचं त्याचं स्वप्न होतं. मात्र तो पाकिस्तानसोबत संधान बांधून होता. पाकिस्तानचे संस्थापक महम्मद अली जिनासोबत त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे फाळणीनंतर पाकिस्तानला पैशाची चणचण भासायला लागल्यानंतर याच निजामाने आपला कंजूषपणा बाजूला ठेवून त्यांना सोनं आणि रोख स्वरूपात भरपूर मदत पाठविली होती. फाळणीनंतर जवळपास वर्षभर पाकिस्तानसोबत तो सलगी साधून होता. यादरम्यान अनेक मुस्लिम संस्थानांना चिथावणी देण्याचे कामही त्याने केले. निजामाच्या या कारवायांकडे भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून होते. निजाम डोकेदुखी ठरतो आहे, हे लक्षात येताच तेव्हाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी सप्टेंबर १९४८ मध्ये सैन्य पाठवून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतलं होतं. निजामाला हे चांगलंच जिव्हारी लागलं. मात्र प्रतिकार करावा, अशा स्थितीत तो नव्हता. त्याच्या संस्थानातील बहुसंख्य जनता हिंदू जनता त्याच्याविरोधात रस्त्यावर आली होती. स्वातंत्र्यानंतरही तो २0 वर्षे जगला. २४ फेब्रुवारी १९६७ ला हैदराबादच्याच किंग कोठी पॅलेसमध्ये त्याचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ३७ वर्षे हैदराबादवर सत्ता गाजविलेल्या या निजामाची संपत्ती, त्याचा कंजूषपणा व त्याच्या स्वभावातील विचित्रपणावर भरपूर पुस्तकं लिहिण्यात आली आहेत. ती मुळातूनच वाचण्याजोगी आहेत.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top