द ग्रेटेस्ट इंडियन!

महात्मा गांधीनंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा सर्वात महान भारतीय कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वात मोठय़ा सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे. सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंर्त्य मिळाल्यानंतर

समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार्‍या 100 नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल व इंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणार्‍या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील 15 शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर टेरेसा, जेआरडी टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.

तीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना ‘ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविलं असताना ज्यूरींनी मात्र या बहुमानासाठी आपली पसंती पंडित नेहरूंच्या नावाला दिली आहे. नेल्सन कंपनीने मोठय़ा शहरांमध्ये प्रत्यक्ष फिरून केलेल्या सर्वेक्षणात लोकांनी एपीजे अब्दुल कलाम यांना सर्वात महान भारतीय ठरविलं आहे. ज्यूरींच्या यादीत बाबासाहेब दुसर्‍या, वल्लभभाई पटेल तिसर्‍या, तर जेआरडी टाटा चौथ्या क्रमांकावर आहे. लोकांच्या

मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसर्‍या, तर वल्लभभाई पटेल तिसर्‍या क्रमांकावर आहेत. मार्केट रिसर्चमध्ये अब्दुल कलाम पहिल्या, इंदिरा गांधी दुसर्‍या, तर मदर टेरेसा तिसर्‍या क्रमांकावर आहेत. अशा प्रकारच्या या पहिल्या सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक 19 लाख 91 हजार 734 मते बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल 13 लाख 74 हजार मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. ज्यूरींनी जरी पंडित नेहरूंना पहिला क्रमांक दिला असला तरी स्वातंर्त्यानंतर सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे 9,921 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्‍या

क्रमांकावर आहेत. मार्केटच्या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर सहाव्या क्रमांकावर आहेत. लोकांच्या मतांमध्ये अटलबिहारी वाजपेयींनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी या दोघांनाही मात दिली आहे.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष रंजक असले तरी या अशाप्रकारच्या सर्वेक्षणातून सर्वात महान भारतीय ठरविता येऊ शकतो का? या विषयावर वाद निर्माण होऊ शकतो. महानता मोजायची कशी? याबाबतही वेगवेगळी मतं असू शकतात. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का? बाबासाहेब आणि गांधीजींच्या

समकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला जात आहे. नेहरू आणि वल्लभभाई पटेलांचे चाहते बाबासाहेब आंबेडकर हे नेहरू-पटेलांपेक्षा महान होते का? असा प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत. आपल्या भारतीयांमधील अतिरेकी व्यक्तिप्रेम आणि व्यक्तिस्तोम माजविण्याची प्रवृत्ती लक्षात घेतली तर अशा प्रकारच्या सर्वेक्षणातील निष्कर्षाबाबत एकमत होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. (स्वत: बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन,

प्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो

माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे महान म्हणावे लागेल. या निकषामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसतं. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावं घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील सार्‍या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही.गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 19,91,734

2. एपीजे अब्दुल कलाम – 13,74,431

3. वल्लभभाई पटेल – 5,58,835

4. अटलबिहारी वाजपेयी – 1,67,378

5. मदर टेरेसा – 92,645

6. जेआरडी टाटा – 50,407

7. सचिन तेंडुलकर – 47,706

8. इंदिरा गांधी – 17,641

9. लता मंगेशकर – 11,520

10.जवाहरलाल नेहरू – 9,921
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वणी – 8888744796

संदर्भ व छायाचित्रे साप्ताहिक आऊटलुकच्या सौजन्याने

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top