|
|
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगाबादेत देवगिरी महासंगम मेळावा आयोजित केला होता. जवळपास ५0 हजारांच्या आसपास संघाच्या गणवेशातील स्वयंसेवक या मेळाव्याला उपस्थित होते. असाच एक मोठा मेळावा यवतमाळातही घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचं दिल्ली-मुंबईत सरकार आल्याने संघ यावेळी विशेष उत्साहात आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागांतही आगामी काळात असे मेळावे होतील. निवडणुकीच्या निमित्ताने भाजपात हौसे, गवसे, नवशांची प्रचंड गर्दी झाली आहे. या मेळाव्यांच्या निमित्ताने त्यांना संघ कल्चर काय असते, हे दाखविण्याचाही संघाचा प्रय▪आहे. ठिकठिकाणांहून आलेल्या बातम्यांनुसार भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना खाकी हाफ पँट आणि पांढरा हाफ बाह्यांचा शर्ट, तपकिरी बेल्ट, काळा बूट व काळीच टोपी या संघाच्या गणवेशात मेळाव्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काँग्रेस आणि इतर पक्षात आयुष्य घालवून भाजपात आलेल्यांसाठी हे प्रकरण तसं अवघडच आहे. मात्र महाराष्ट्र भाजपाचे सध्या जे सर्वेसर्वा आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि नवीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे संघाच्या दरवर्षीच्या वार्षिक उत्सवात संघाचा गणवेश निष्ठेने घालतात. हे लक्षात घेऊन अनेकांनी निमूटपणे गणवेशात मेळाव्याला उपस्थिती लावली. ज्यांनी टाळाटाळ केली असेल, त्यांच्याकडे संघाचे लक्ष असणार आहे.
बाकी औरंगाबादच्या महामेळाव्यात संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नेहमीचीच कॅसेट वाजविली. देशाला परमवैभवावर न्यायचे आहे. त्यामुळे भारतमातेसाठी प्रसंगी प्राण देण्याची तयारी ठेवा. आम्हाला आमच्या संपन्न इतिहासाचा विसर पडला आहे. आत्मग्लानी आली आहे. आपल्याला राष्ट्राची नव्याने निर्मिती करायची आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन समाजबांधणी करायची आहे. वगैरे वगैरे.. सरसंघचालक वा संघाच्या कुठल्याही प्रमुख पदाधिकार्याचं कोणतंही भाषणं ऐकलं तर हे असंच असते. विशेष म्हणजे तुम्ही त्यांची २0-२५-५0 वर्षांपूर्वीचीही भाषणे तपासली तरी स्क्रिप्ट सेम. त्यात काहीही बदल नाही. संघाच्या दृष्टीने देश नेहमीच संकटात सापडला असतो. समाजात देशप्रेम नसल्याने, चेतना नसल्याने सार्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असं ते सांगत असतात. त्यात नवीन असं काहीच नसतं. संघ परिवार सोडला तर इतर सार्यांना देशप्रेम, देशभक्ती शिकविण्याची गरज आहे, असे संघ परिवारातील धुरिणांना कायम वाटत असतं. हे चित्र बदलायचं असेल, तर सर्वांनी संघ शाखेत आलं पाहिजे, हे त्यांचं आग्रहाचं सांगणं असतं. (संघाच्या कुठल्याही पदाधिकार्याला समाजासमोर वर्तमानात असलेल्या प्रश्नांबाबत बोलणं कधी आवश्यक वाटत नाही. नथुराम गोडसेंचं प्रस्थ माजविणार्यांबद्दल संघ काय म्हणतो? साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती, प्रवीण तोगडिया या महाभागांच्या वक्तव्याबद्दल ते काय विचार करतात, हे संघ कधीच सांगणार नाही. ) संघसंस्काराने प्रेरित झालेली माणसं समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत जातील आणि जिथे जिथे ते जातील ती क्षेत्र स्वच्छ करतील. तेथे देशबांधणीचे काम करतील, व्यवस्था परिवर्तन करतील, ही संघाची राष्ट्रनिर्मितीची, समाजबांधणीची व्याख्या आहे. पण प्रत्यक्षात अनुभव वेगळा आहे. संघाची जी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रांत गेलीत तिथे त्यांनी परिवर्तन घडविण्याऐवजी तेच तेथील व्यवस्थेचा एक भाग होऊन बसले आहेत. ती यादी खूप मोठी आहे. अशांचं काय करायचं, ही आज संघ परिवारासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. (असो… संघ हा मोठा विषय आहे. वर्तमानपत्रीय लेखनातून तो पुरेपूर मांडता येत नाही.) मराठा सेवा संघाचा यू टर्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्रमक होऊन सर्वांना आपल्या कह्यात घेण्याचा प्रय▪करीत असताना दुसरीकडे मराठा सेवा संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन ब्राह्मण नेत्यांना सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सवाला आमंत्रित करून सर्वांना चकीत केले. हे दोघे असे पहिले ब्राह्मण नेते आहेत ज्यांना मातृतीर्थावर आमंत्रित करण्यात आले. या दोन नेत्यांच्या जातींचा उल्लेख यासाठी की, मराठा सेवा संघ ही संघटना कायम ब्राह्मणांबद्दल आग ओकत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जसं प्रत्येक समस्येसाठी मुसलमान जबाबदार आहे, असं वाटतं, तसंच सेवा संघाला ब्राह्मणांमुळे सार्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असं वाटतं. त्यामुळेच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचं हे धक्कातंत्र अनेकांना बुचकळ्यात टाकू शकते. मात्र खेडेकरांना जे जवळून ओळखतात त्यांना यात काही नवल वाटणार नाही. ब्राह्मण कधीच मराठा समाजाचे उद्धारकर्ता होऊ शकत नाही, असे जरी खेडेकर सांगत असले तरी मराठा समाजाच्या हितासाठी सत्तेवर जे कोणी असतील त्यांच्याशी जुळवून घेण्यात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. शेवटी मराठा समाजाचं सर्वांगीण विकास, हे सेवा संघाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळेच १९९५ ते ९९ या युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही खेडेकरांचे तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, नितीन गडकरी या ब्राह्मण नेत्यांसोबत जवळीकीचे संबंध होते. तसाही खेडेकरांचा ब्राह्मणविरोध हा स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. वैयक्तिक जीवनात आपले भरपूर ब्राह्मण मित्र आहेत. त्यांनी संघटना वाढीसाठीही आपल्याला भरपूर मदत केली आहे, हे त्यांनी अनेकदा जाहीरपणे कबूल केले आहे. नरेंद्र मोदींचीही त्यांनी प्रशंसा केली आहे. आता सत्तेवर ब्राह्मण नेते असताना मराठा समाजाच्या हिताचे मुद्दे पुढे नेण्यासाठी त्यांची मदत लागणार आहे, हे ओळखून खेडेकरांनी यावर्षीच्या सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. दुसरीकडे गडकरी व फडणवीसांना मराठा सेवा संघ व पुरुषोत्तम खेडेकरांची ब्राह्मणांबद्दलची मतं माहीत नाही, अशातला भाग नाही. मात्र राज्यात बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या सशक्त संघटनेचं महत्त्व ते चांगले ओळखतात. ही संघटना आपल्याला अनुकूल राहिली तरी मराठाबहुल महाराष्ट्रात सरकार चालविणं सोप जाईल, हे ते जाणतात. थोडक्यात हा रोकडा व्यवहार आहे. शेवटी व्यक्ती, संस्था, संघटना वा विचारधारांचे यशापयश व्यवहाराच्या कुरुक्षेत्रावरच ठरते. त्यामुळे खेडेकरांनी गडकरी व फडणवीसांना मातृतीर्थावर आमंत्रित करणं आणि त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता येणं, या घटनेकडे या अशा दृष्टिकोनातून पाहायला हवं. बाकी मातृतीर्थावर आल्याने मुख्यमंत्रिपद गमवावे लागते, अशी समजूत रूढ असताना देवेंद्र फडणवीस तेथे आलेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |
Superb Boss..