|
|
तृतीयपंथीयांना (हिजडे) मानाचं जीवन जगता यावं यासाठी जगभर आवाज उठविणारी लक्ष्मी त्रिपाठी सरलेल्या आठवड्यात विदर्भात होती. ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनने बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या शहरांमध्ये आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतींच्या निमित्ताने ती आली होती. ‘बिग बॉस’, ‘दस का दम’, ‘सच का सामना’ आदी अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून लक्ष्मीचा चेहरा परिचित असल्याने तिन्ही ठिकाणी तिला ऐकायला प्रचंड गर्दी लोटली होती. या गर्दीमध्ये सर्वस्तरातील लोक होते. राजकारणी, कलेक्टर, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, सामाजिक संस्था-संघटनांच्या पदाधिकार्यांपासून अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत झाडून सारे आले होते.
या सार्यांसमोर लक्ष्मीने एक नवीन विश्व उलगडून दाखविलं. तिची आपबिती आणि दाहक अनुभवांनी सारेच अंतर्मुख झालेत. लक्ष्मीच्या दौर्याचं एका वाक्यात वर्णन करावयाचं झाल्यास ‘ती आली, ती बोलली आणि तिने जिंकले,’ असं करावं लागतं. या तीन शहरांमध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष्मीला ऐकलं, ते यापलीकडे तृतीयपंथीयांबाबत काही बोलताना, एवढंच काय ‘हिजडा’ हा शब्द उच्चारतानाही हजारदा विचार करतील, एवढी ताकद लक्ष्मीच्या मुलाखतीत होती. एक मुलाखत एखाद्या समाजाबद्दलचा दृष्टिकोन संपूर्णत: बदलून टाकते, हा अनुभव थक्क करणारा होता. हिजडा हा काही परग्रहावरून आलेला प्राणी नाही. तो सुद्धा तुमच्या-आमच्यातीलच एक आहे. कोणाच्याही घरी तो जन्माला येऊ शकतो. त्यांचे दु:ख, वेदना समजून घ्या. त्यांनाही सन्मानाने, ताठ मानेनं जगण्याची संधी द्या, आम्हाला फक्त प्रेम द्या, समजून घ्या, हे लक्ष्मीचं सांगणं प्रत्येकाच्या मनाला केवळ भिडलंच नाही, तर खोलवर रुतून बसलं.
लक्ष्मीच्या दौर्याच्या निमित्ताने ती आणि तिच्या सहकार्यांसोबत चार-पाच दिवस फिरता आलं. त्यांच्याशी त्यांचं जग आणि त्यातील अनुभवांबाबत सविस्तर चर्चा करता आली. या दौर्यात लक्ष्मी जिथे जिथे गेली तिथे तिने माणसं जिंकून घेतली. प्रचंड बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, माणसांचं नेमकं आकलन, इंग्रजीसह तिन्ही भाषांवरचं जबरदस्त प्रभुत्व, प्रभावी संवादशैली या सार्या साधनांच्या जोरावर तिने तृतीयपंथीयांचं विश्व आणि त्यांचे प्रश्न अतिशय जोरकस पद्धतीने समाजासमोर, माध्यमांसमोर मांडलेत. आपला दौरा कशासाठी आहे, याचं नेमकं भान तिला होतं. समाज ज्यांची कायम हेटाळणी करतो त्या तृतीयपंथीयांचं जग सभ्य म्हणविणार्या समाजाला कळावं आणि ज्यांच्या हाती या समाजाची सूत्रं आहेत, त्या अधिकारपदावरील माणसांनी तृतीयपंथीयांच्या वेदनांबाबत संवेदनशील असावं, हाच तिचा मोटो होता. ठिकठिकाणच्या मुलाखती व पत्रकार परिषदांमध्ये तिने तृतीयपंथीयांना इतरांसारखेच जगण्याचे अधिकार मिळावेत, ही गोष्ट प्रामुख्याने रेटून धरली. यासाठी वेद-पुराणांपासून, मनुस्मृती, गरुडपुराण, कुराण, हदीस, बायबल, ओल्ड टेस्टामेंट यातील तृतीयपंथीयाबाबतचे संदर्भ देऊन तिने सार्यांना चकित केले. भारतीय लोकशाहीपासून येथील तथाकथित नीतिमत्तेच्या कल्पनांबाबतची तिची मतं धक्कादायक तर होतीच, पण समाजाच्या बेगडीपणावर नेमकं बोट ठेवणारी होती. या दौर्यात कुठलाही प्रश्न तिने टाळला नाही. तिच्या वैयक्तिक प्रेमप्रकरणांपासून तर तृतीयपंथीयांची लग्न, अंत्यसंस्कार आदी वेगवेगळ्या प्रथा-परंपरांबाबत ती मनमोकळेपणाने बोलली. प्रेम, लग्न, नातेसंबंध याबाबतचे तिचे अनुभव दाहक आहेत. ‘ये र्मद अपने औरते के होते नहीं, हिजडो के क्या होंगे?’ या शब्दांत तिने आपला पुरुषांबद्दलचा संताप व्यक्त केला. पुरुषांना टिश्यू पेपरसारखं वापरायचं असतं, हेही तिने सांगून टाकलं. ‘आपले जे काही मित्र आहेत, त्यांना आधी त्यांच्या बायकांना याबाबत कल्पना द्यायला लावतो. नंतरच त्यांच्याशी मैत्री करतो. आपल्याला कुठल्याही स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही. त्यामुळेच आपल्या बॉयफ्रेंडची मुलं आपल्यालासुद्धा मम्मी म्हणतात,’ असे भन्नाट अनुभव तिने सांगितले. डान्सबारमध्ये काम करतानाचे अचंबित करणारे अनुभवही तिने शेअर केलेत. डान्सबारमध्ये जी माणसं लाखोच्या नोटा उधळायचे तीच माणसं परत जाताना आशीर्वाद मिळावेत, म्हणून पाया लागायचे, हे सांगतानाच ‘गृहमंत्री आर. आर. पाटलांनी डान्सबार बंद करून ७५ हजार मुलींच्या पायाखालचं स्टेज काढून त्यांना बेडवर ढकललं,’ असे खळबळजनक विधानही तिने केले. तृतीयपंथीयांमधील गुरू-चेला परंपरा, कम्युनिटी नावाचा प्रकार याबाबतही ती विस्ताराने बोलली. ‘तुमचा जो समाज आहे, तो आम्हाला स्वीकारायलाच तयार नाही. तुम्ही आम्हाला साधं झाडूवाल्याचं काम देत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला टाळ्या वाजवून भीक मागावी लागते. देहविक्रय करावा लागतो,’ हे प्रखर वास्तव तिने लोकांसमोर मांडलं. ‘तृतीयपंथीय आयुष्यभर एकटेच असतात. हिजडो के खरीददार आखिर हिजडेही होते है…’ या शब्दांत तिने आपली बोच व्यक्त केली. ‘सभ्य म्हणविणार्या समाजातील काही माणसांना आमच्याबद्दल सहानुभूती जरी असली तरी ते आम्हाला घरी नेऊ शकत नाही. जिथे घरातील रक्ताच्या नात्यातील मंडळी घराबाहेर काढतात. नंतर साधी ओळखसुद्धा दाखवीत नाही, तेव्हा गुरू आणि त्याचे चेले हेच एकमेकांचे आधार असतात. तेच आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. त्यामुळे गुरूकडून होणारं शोषणही आम्ही सहन करतो,’ हे वास्तव मांडताना इतरांप्रमाणे आम्हालाही स्वतंत्र माणूस जगण्याची संधी आम्हाला द्या, हे तिचं आवाहन तृतीयपंथीयांच्या वेदना सांगणारं होतं. लक्ष्मीच्या या दौर्यात तृतीयपंथीयांबाबत समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समजुती, श्रद्धा, अंधश्रद्धाही अनुभवता आल्या. लक्ष्मीचं सभागृहात आगमन झालं की, लहानथोर तिचे आशीर्वाद घेण्यासाठी धडपडायचे. बुलडाण्यात तर अनेक वृद्ध स्त्रियांनी तिच्या पायावर डोकं ठेवलं. (लक्ष्मी जिथे गेली तिथे स्त्रियांसोबत, मुलींसोबत फारच सन्मानाने वागली. कुठल्याही वयाची मुलगी, स्त्री तिला भेटायला आली की, ती उठून उभी राहून तिचं स्वागत करत असे. आपण कट्टर फेमिनिस्ट आहे, हे सांगायला ती विसरली नाही. स्त्रीत्वाची ताकद आपल्याला माहीत आहे. पुरुषांना गुडघ्यावर रांगायला कसं लावायचं, हेसुद्धा आपल्याला चांगलं समजतं, हे तिने गमतीत सांगून टाकलं.) अनेक तरुण विवाहित स्त्रिया आपली लहान मुलं लक्ष्मीच्या हाती सोपवून तिचा हात मुलाच्या डोक्यावर ठेवण्याची विनंती करायच्या. तृतीयपंथीयाचा आशीर्वाद हमखास फळतो, या समजुतीतून ही धडपड होती. सामान्यांची ही लगबग, तर व्यावसायिकांची वेगळीच गडबड होती. अमरावती, यवतमाळात अनेक व्यावसायिक लक्ष्मीने आपल्या दुकानात, प्रतिष्ठानमध्ये यावे, यासाठी तिची आर्जव करत होते. लक्ष्मीच्या पावलाने आणखी लक्ष्मी आपल्या पदरात पडेल, अशी त्यांची समजूत होती. अनेकांनी महागडी साडी, चोळी व भरभक्कम बिदागी देऊन लक्ष्मीचा सन्मान केला. हे सारं पाहताना समाजाची दोन रूपं डोळ्यासमोर येऊन अस्वस्थता येत होती. एकीकडे हिजडा, छक्का म्हणून हेटाळणी, उपहास. त्याची सावलीही टाळण्याची प्रवृत्ती. त्याचवेळी त्याचा आशीर्वाद फळाला येतो…या श्रद्धेतून होणारी त्यांची पूजा. लक्ष्मी सुंदर, ग्लॅमरस, बुद्धिमान म्हणून तिच्या वाट्याला मानसन्मान अधिक. एरवी तृतीयपंथीयांच्या वाट्याला वाईट अनुभवच अधिक. लक्ष्मीचं गाजत असलेलं पुस्तक आणि तिच्या या दौर्याच्या निमित्ताने समाजाची तृतीयपंथीयांबद्दलची वागणूक थोडी जरी बदलली तरी लक्ष्मीच्या धडपडीचं सार्थक झालं, असं म्हणता येईल.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)
भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६ |
Sir, you have given justice to third person. All thoughts, life, society hate are in focus through this programme and article. Society may definitely think on this point. Best wishes for good article. Thanks