जावईपुराण

‘वड्रा’, ‘वढेरा’, ‘वडरा’ अशा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आणि ‘देशाचे जावई’ म्हणून उपहास होत असलेले रॉबर्ट वढेरा सध्या देशभरातील मीडियामध्ये व्यापून गेले आहेत. आतापर्यंत ‘सोनिया गांधींचे जावई’ आणि ‘प्रियंका गांधींचे पतिदेव’ एवढीच ओळख असलेल्या रॉबर्ट वढेरांची सारी कुंडली शोधून काढली जात आहे. 60च्या दशकाच्या पूर्वार्धात पंडित नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी असेच चर्चेत आले होते. 

 
अर्थात, त्यांच्याबद्दलची चर्चा त्यांच्या स्वत:च्या कुठल्या आर्थिक घोटाळ्यांबद्दल नव्हती, तर पंडितजींच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री कृष्णम्माचारी व नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई यांची प्रकरणं शोधून काढण्याबद्दलची होती. (फिरोज गांधींबद्दल सविस्तर माहिती 19 सप्टेंबरच्या ‘मीडिया वॉच’मध्ये प्रकाशित झाली आहे.) अर्थात, त्यामुळे आज सोनियाजी जशा त्रस्त असतील तशीच अवस्था पंडितजींची झाली होती. मोठय़ा कुटुंबाचा जावई हे तसंही मोठं नाजूक दुखणं असतं. (यामुळेच मोगलांच्या काळात शहाजहानसह अनेक मोगल राजांनी आपल्या राजकन्यांचा विवाहच केला नव्हता. आपल्या तोलामोलाचं देशात कुठलंही घराणं नाही. अमीर, सरदार, उमरावांच्या घरात मुलगी द्यायची नाही या धोरणामुळे मोगल राजकन्यांना सारं आयुष्य सोनेरी पिंजर्‍यात घालावं लागतं असे. त्यांची सार्‍याच अर्थाने घुसमट व्हायची. त्यातून अनेक कथा जन्माला आल्या आहेत. अर्थात, तो विषय वेगळा आहे.) तो जावई स्वत: कितीही कर्तबगार असला तरी बाहेरचं जग त्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. अमुक स्त्रीचा पती आणि तमुक कुटुंबाचा जावई हीच ओळख त्याला शेवटपर्यंत चिपकून असते.

त्यामुळेच आज रॉबर्ट वढेरा आपले सारे व्यवहार स्वच्छ आहेत, कायदा आणि नियमांच्या चौकटीतील आहे असे सांगत असला तरी त्यावर जनसामान्यांचा विश्वास बसत नाहीय. रॉबर्टला गांधी घराण्याचा जावई असल्याचा फायदा नक्कीच मिळाला असेल, अशीच सर्वाची समजूत आहे. स्वाभाविकही आहे ते. रॉबर्ट वढेराच कशाला, आपल्या इकडे साध्या आमदाराच्या पोराला सत्तेचा फायदा मिळतो. येथे तर देशातील सर्वांत प्रभावशाली कुटुंबाचा रॉबर्ट जावई आहे. त्याच्या आर्थिक भानगडीतील खरेखोटेपणा पुढेमागे बाहेर येईल वा दडपलाही जाईल. रोज नवीन घोटाळा बाहेर येणार्‍या या देशात लोकांना खरं काय ते बाहेर येईल याची आशा नाही. मात्र कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेला रॉबर्ट वढेरा नावाचा माणूस गांधी कुटुंबाचा जावई कसा झाला हे जाणून घेण्याची सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

रॉबर्ट वढेरा यांचं कुटुंब हे मूळचं पाकिस्तानातील सियालकोटचं. फाळणीच्या वेळी रॉबर्टचे आजोबा हुकूमतराय वढेरा आपली पत्नी व ओमप्रकाश, राजेंद्र या दोन मुलांसह बंगलोरला आले. तेथे त्यांनी सियालकोटमध्ये असलेला पितळी भांडीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र काही महिन्यांतच त्यांनी आपलं बस्तान उत्तर प्रदेशातील मुराराबाद येथे हलविलं. लवकरच या कुटुंबाचा व्यवसाय भरभराटीस आला. कलाकुसर केलेल्या पितळेच्या वस्तू ते देशभर पाठवीत असे. काही काळातच एक सुखवस्तू व प्रतिष्ठित कुटुंब म्हणून त्यांची मुराराबादमध्ये गणना व्हायला लागली. तेथील सिव्हिल लाईन भागात त्यांनी एक मोठी कोठीही विकत घेतली. येथेच राजेंद्र व मारियन वढेरा यांनी रॉबर्टला जन्म दिला. रॉबर्टची आई मारिया या जन्माने स्कॉटिश आहेत. त्यांचा आणि राजेंद्र वढेरांचा प्रेमविवाह होता. (प्रियंका आणि राबर्ट या दोघांचीही आई परदेशी. हे या दोघांतील साम्य आहे.) प्रारंभीचं शिक्षण मुराराबादमध्ये झाल्यानंतर रॉबर्टला शिक्षणासाठी दिल्लीत ब्रिटिश स्कूलमध्ये टाकण्यात आलं. या महागडय़ा शाळेत परदेशी राजदूतांची आणि भारतात परदेशासारखं जगू इच्छिणार्‍या इंग्रजाळलेल्या भारतीयांची मुलं शिकतात. येथेच वयाच्या 13व्या वर्षी रॉबर्ट आणि प्रियंकाची पहिली भेट झाली. (साप्ताहिक आऊटलूकला दिलेल्या मुलाखतीत स्वत: प्रियंकानेच ही माहिती दिली होती. मला कुठलीही वेगळी ट्रिटमेंट न देता इतरांसारखी एक व्यक्ती म्हणून तो माझ्याशी सहजपणे वागला हे तिने मुलाखतीत सांगितले होते.) शालेय शिक्षण झाल्यानंतर प्रियंकाने ‘जिझस अँण्ड मेरी महाविद्यालया’त मानसशास्त्राच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान प्रियंका आणि रॉबर्टमध्ये जवळीक निर्माण झाली. वडिलांच्या निर्घृण हत्येने त्या काळात प्रियंका हादरून गेली होती. अशा वेळी तिला मानसिक आधाराची गरज होती. रॉबर्टने तो आधार तिला दिला. त्या काळात गांधी कुटुंब काहीसं पडद्याआड गेलं होतं. सोनियाजी सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. स्वाभाविकच प्रियंकाच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यादरम्यान रॉबर्ट आणि प्रियंका हे नवी दिल्लीतील डिस्कोथेकमध्ये अनेकदा जात असे. मात्र या दोघांनी लगAाचा निर्णय घेईपर्यंत बाहेरच्या जगाला त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती. 18 फेब्रुवारी, 1997 ला फार गाजावाजा न करता हे दोघे विवाहबद्ध झालेत. या लगAाच्या सार्‍या व्यवस्थेकडे अमिताभ बच्चनने जातीने लक्ष दिले होते. पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठीही प्रवेशद्वारावर तो स्वत: उभा होता. येथे रॉबर्ट वढेरा पहिल्यांदा जगासमोर आला. मात्र लगAानंतर या दोघांनी लो-प्रोफाईल राहणंच पसंत केलं. सार्वजनिक कार्यक्रम आणि मीडियापासून ते दूरच राहत असे. निवडणुकीदरम्यान अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांतील प्रचारात तेवढे ते दिसत. या दोघांना रेहान आणि मिरया ही दोन गोंडस मुलं आहेत. एवढी माहिती सोडली तर बाकी त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती बाहेर येत नसे. मात्र पुढे हळूहळू रॉबर्ट दिल्लीतील उच्चभ्रूच्या पार्टय़ामध्ये दिसायला लागला. त्यातून तो उत्कृष्ट डान्सर असल्याची बाब समोर आली. त्याला स्वत:ला नियमित व्यायाम व इतर क्रीडाप्रकारांची आवड असल्याचेही समजले. तो दररोज जवळपास तीन तास जिममध्ये घालवतो. त्याचे मसल्स, बॉडी ही सलमान खान, हृतिक रोशन आदी सिनेस्टारपेक्षा कुठल्याही अर्थाने कमी नाही. गोल्फ, सायकलिंग, मोटर रेसिंग यांत तो भरपूर रमतो हे इंग्रजी वर्तमानपत्रातील ‘पेज तीन’वरील बातम्यांमुळे समजायला लागले. नवनवीन फॅशनचे उत्तमोत्तम कपडे घालण्याचीही रॉबर्टला हौस आहे. काही महिन्यांपूर्वीच ‘दिल्ली स्टाईल ऑयकान’ या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आलं आहे.

लगAानंतर काही वर्षांनी रॉबर्ट आणि प्रियंका दिल्लीत लोधी इस्टेटमधील शासकीय बंगल्यात राहायला लागले. दरम्यान उद्योगी कुटुंबातील रॉबर्टने आपल्या घरचा मूळ व्यवसाय वाढविण्याकडे लक्ष देणे सुरू केले होते. त्यासाठी दिल्लीत त्याने ईंशु एुेि ही कृत्रिम दागिने व सजावटीच्या वस्तू तयार करणारी कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या देशांत सामान निर्यात करत असे. दिल्लीत भाजपाच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार असताना रॉबर्टचं विश्व आपलं कुटुंब आणि व्यवसाय एवढय़ापुरतंच मर्यादित होतं. रॉबर्टच कशाला, त्या काळात सारं गांधी कुटुंबच अज्ञातवासात असल्यासारखं वागत होतं. दरम्यान गांधी कुटुंबासोबत चांगला मिळूनमिसळून गेलेल्या रॉबर्टचे त्याच्या स्वत:च्या कुटुंबासोबत खटके उडायला लागल्याच्या बातम्या बाहेर यायला लागल्या होत्या. असं म्हटलं जातं की, रॉबर्ट आणि प्रियंकाचा विवाह त्याच्या वडिलांना पसंत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी कुरबुरी सुरू असतं. जानेवारी 2002 मध्ये रॉबर्टने दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन आपण आपल्या कुटुंबासोबत संबंध तोडत असल्याचे घोषित केलं. अनेकांसाठी हे धक्कादायक होतं. मात्र त्याचे वडील व भाऊ गांधी कुटुंबासोबतच्या नातेसंबंधांचा फायदा घेऊन अनेकांना काँग्रेस कमिटी कार्यालयात वा इतर ठिकाणी नोकरी लावतो असे आश्वासने देऊन फसवणूक करीत असल्याचे प्रकरण समोर आल्याने रॉबर्टने त्यांच्यासोबतचे संबंध तोडल्याचे काँग्रेसच्या वतरुळातून तेव्हा सांगण्यात आले होते. नंतरच्या काही वर्षांत रॉबर्टच्या कुटुंबाला एकापाठोपाठ एक दुर्घटनांना सामोरे जावे लागले. त्याची बहीण मिशेलचा एका ट्रक अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2003मध्ये त्याचा मोठा भाऊ रिचर्डने आत्महत्या केली. 2009मध्ये त्याचे वडील राजेंद्र वढेरा यांनी दिल्लीत युसूफ रॉय मार्गावरील एका गेस्टहाउसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्यामागचे नेमके कारण अजूनही बाहेर आले नाही. सोनिया गांधींच्या जावयाचा मामला असल्याने मीडियानेही त्याची फार चर्चा केली नाही.

कुटुंबाबाबत एकापाठोपाठ एक वाईट घटना घडत असताना रॉबर्टला मात्र चांगले दिवस आले होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार आणि सोनिया गांधी सर्वसत्ताधीश झाल्याने रॉबर्टच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटायला लागले होते. त्याने एकापाठोपाठ एक कंपन्या स्थापन करण्यास सुरुवात केली.पितळी सजावटीच्या वस्तू विकण्यात आता काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन तो रिअल इस्टेटच्या धंद्यात उतरला. सोनिया गांधींच्या जावयाला मदत करण्यासाठी ‘डीएलएफ’सारख्या व्यावसायिक कंपन्या, राजकारणी, दलाल सारेच सज्ज होते. बघता बघता रॉबर्टचं विमान उडायला लागलं. त्याने काही महिन्यांतच चॉटर्ड विमान भाडय़ाने देण्याची कंपनीही उघडली. इतरही अनेक व्यवसायांत त्याने हात टाकला. सोनिया गांधींचा जावई म्हटल्यानंतर त्याने जिथे हात टाकला त्याचं सोनं होणार हे ठरलं होतंच. तसंच ते झालंही. गेल्या वर्षी ‘नेटवर्थ डॉट कॉम’ या वेबसाईटने रॉबर्ट वढेराची संपत्ती 2.1 अरब डॉलर म्हणजे 10,920 करोड रुपये असल्याचे घोषित केलं होतं. त्या बातमीचा कोणी इन्कार केला नव्हता. तर हे असं ‘जावईपुराण.’ यातील कथा एकापेक्षा एक रंजक.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमनध्वनी : 8888744796

Scroll to Top