जात-धर्माच्या कळपाबाहेर येऊन कधी विचार होणार?

जन्म, जात, धर्म, देश या केवळ योगायोगाने लाभणार्‍या गोष्टींचा माणसं किती काळ अभिमान बाळगणार आणि त्या वृथा अभिमानातून आणखी किती पिढय़ा एकमेकांचा द्वेष करतील, एकमेकांबद्दल विष पसरवतील, एकदुसर्‍याचे जीव घेतील काही कळत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा गाजत असताना घडलेल्या काही घटना विषण्ण 

करणार्‍या आहेत. २६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वजाला जाणीवपूर्वक सलामी दिली नाही व लष्कराकडून मानवंदना स्वीकारली नाही, असा अपप्रचार त्या दिवशी दिवसभर फेसबुक, व्हॉटस्अप व इतर सोशल नेटवर्किंग साईटवर चालला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे नेते हात वर करून सलामी देत असताना हमीद अन्सारी स्तब्ध उभे होते, असे छायाचित्र पुराव्यादाखल फिरत होते. अत्यंत नीच आणि हलकटपणाचा हा प्रकार होता. हमीद अन्सारीचा केवळ धर्म मुस्लिम आहे म्हणून त्यांना तिरंग्याबद्दल प्रेम नाही, देशाबद्दल अभिमान नाही, असे सूचकपणे सांगण्याचा हा प्रय▪होता. जात आणि धर्माच्या लेबलशिवाय कुठलीही कर्तबगारी नावावर नसलेले हजारो उठवळ या खोडसाळ फोटोला लाईक करीत होते. त्याखाली घाणेरड्या कॉमेंट्स लिहून आपल्या तथाकथित देशप्रेमाचे प्रदर्शन घडवित होते. सोशल नेटवर्किंग साईटवरील हा प्रकार वणव्यासारखा असा पसरला की, शेवटी उपराष्ट्रपती कार्यालयाला या विषयात खुलासा करावा लागला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सलामी स्वीकारण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींचा असतो. तेच त्या सलामीला उत्तर देतात. सोहळ्याचे प्रमुख व लष्करी गणवेशातील अधिकार्‍यांनी सलामीला उत्तर देणे, हा प्रोटोकॉल आहे. सिव्हिल ड्रेसमधील इतर मान्यवरांनी राष्ट्रध्वजासमोर आदरदर्शक स्थितीत उभे राहणे, एवढेच अपेक्षित आहे. काही लष्करी अधिकार्‍यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये लष्कराकडून मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींचा असतो, हे लगेच निदर्शनास आणून दिले. या सोहळ्याच्या छायाचित्रांचे बारकाईने अवलोकन केले असता केवळ अन्सारीच नाही, तर अनेक केंद्रीय मंत्री व इतर मान्यवरही सलामी देत नव्हते, असे लक्षात आले. मात्र त्यांच्या देशभक्तीविषयी कोणी प्रश्न उपस्थित केले नाहीत. अंसारींच्या विषयात जाणीवपूर्वक अपप्रचार करणार्‍यांना ही वस्तुस्थिती माहीत नव्हती, अशातला भाग नाही. मात्र अन्सारी मुस्लिम असल्यामुळे मुद्दाम याचा इश्यू करण्यात आला आणि त्याचा प्रसारही करण्यात आला. जणूकाही काही या देशातील प्रत्येक हिंदू देशप्रेम घेऊनच जन्मतो आणि मुसलमानांच्या मात्र रक्तातच गद्दारी असते, हे भासविण्याचा हा प्रकार होता. यावेळी नामवंत लेखक, पत्रकार अमर हबीब यांचं एक भेदक वाक्य आठवते, या देशात मुसलमानांना प्रत्येक ठिकाणी आपलं देशप्रेम सिद्ध करावं लागतं. हिंदूंना मात्र त्याची गरज नसते. कारण ते हिंदू म्हणून जन्माला आले असतात.

कुठल्याही संवेदनशील माणसाच्या काळजाला चटका लावणारं हे वाक्य आहे. खरंतर कोणता माणूस कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला यावा, त्याचा देश कुठला असावा हे त्याच्या हातातच नसते. या जन्मदत्त प्रकारात त्याचा कुठलाही पराक्रम नसतो. तरी माणसं जन्मापासून जाती-धर्मात विभागले जातात. पुढे त्या-त्या जाती-धर्माच्या कळपाचे भाग बनतात. कळपाजवळ विवेकी विचार असा नसतोच. हजारो वर्षांपूर्वी हजारो लोकांनी त्या त्या काळातील समजुतीनुसार उलटफेर केलेल्या त्यांच्या धर्मग्रंथातील वाक्य हे या कळपांसाठी प्रमाण असतात. जिथे शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य , व्यक्तिप्रामाण्य असते, तिथे विचार नसतोच. तिथे कळपाचे ठेकेदार ज्या चष्म्यातून एखाद्या घटनेकडे पाहतात, तसंच कळपाला दिसायला लागतं. हे सार्‍याच धर्म-जातीच्या कळपांना लागू आहे. तसंच तथाकथित पुरोगामी व बुद्धिवंतांच्या समूहांनाही लागू आहे. आम्ही म्हणतो तेच सत्य, आम्ही मानतो तोच खरा विचार अशी मुजोरी जेथे असते, तेथे अपप्रचार हमखास जन्माला येतो. २६ जानेवारीला ज्याप्रमाणे हमीद अन्सारींबाबत अपप्रचार झाला तसाच प्रकार काँग्रेसच्या गुरुदेव कामत या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केला. ‘घरवापसी’ करणारे आपल्या पत्नी जसोदाबेन यांची घरवापसी कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढय़ावरच ते थांबले नाही. मोदींनी मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींमध्ये असं काय पाहिलं की, त्यांना मोदी जसोदाबेनपेक्षा जास्त महत्त्व देतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला. अत्यंत खालच्या अभिरुचीचे व चारित्र्यहनन करणारे हे प्रश्न होते. गुरुदास कामतांच्या वक्तव्याची ही पोस्टही सोशल नेटवर्किंगवर तुफान फिरली. दुसर्‍या समूहातील लोकांनी यावर पसंती दर्शविली. अनेकांनी मोदींच्या व स्मृती इराणीच्या चारित्र्याचे वाभाडे काढले. पहिला प्रकार जेवढा संतापजनक तेवढाच हा दुसराही प्रकार. मोदींचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला आवडत नसेल, त्यांच्या पूर्वइतिहासाबद्दल तुमचे काही रिझर्व्हेशन असतील, हे समजून घेता येऊ शकते, मात्र त्यासाठी त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रकार उद्वेगजनकच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशात असताना आपल्या राष्ट्रप्रमुखाच्या चारित्र्यावर शंका निर्माण करणे, हा बौद्धिक दिवाळखोरीचाच प्रकार आहे. मात्र येथेही गंमत आहे. हमीद अन्सारींच्या प्रकरणाबद्दल सात्त्विक संताप येणार्‍यांना मोदी आणि इराणींच्या चारित्र्यहननाबद्दल काही वाटत नाही. उलट मोदी व स्मृती इराणी यांच्याबाबतीतील पोस्ट फॉरवर्ड करण्यात तेच आघाडीवर होते.

एकंदरीत माणसं विवेकाने, निरपेक्षपणे, तटस्थपणे विचार करायला तयार नाहीत. पूर्वग्रहाच्या चष्म्यातून आणि कळपाच्या अभिनिवेषातून घटनांकडे, माणसांकडे पाहण्याचा प्रकार सगळीकडे सारखाच. वेगळ्या धर्मात, वेगळ्या समूहात किंवा कट्टर विरोधी असणार्‍या प्रतिपक्षातही चांगली माणसं असू शकतात. त्यांना तुमच्याइतकीच समाज आणि देशाच्या हिताबद्दल तळमळ असू शकते. तुमच्याइतकेच त्यांनाही देशप्रेम असू शकते. समाजातील श्‍वाशत मूल्यांचा त्यांनाही तुमच्याइतकाच आदर असू शकतो, हे समजून घेण्याची कोणाचीच तयारी नाही. दुसर्‍या धर्मातला, समूहातला वेगळा विचार मांडणारा म्हणजे शत्रू आणि या शत्रूला घाणेरड्या प्रचारतंत्राने संपविणे हेच दोन्ही बाजूंचं मिशन दिसतं. हाच त्यांच्या दृष्टीने जिहाद असतो. अलीकडे तर अशा प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खानने त्याच्या पीके सिनेमात जाणीवपूर्वक हिंदू देवदेवतांची टिंगल केली. त्यासाठी त्याला मुस्लिम देशातून पैसा पुरविण्यात आला, असा प्रचार काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माचा ठेका घेतलेल्यांनी केला होता. येथेही पुन्हा आमीर खानचा धर्म मुस्लिम एवढाच त्याचा गुन्हा. हे असे आरोप करताना आमीर खान आतापर्यंत जगलेलं आयुष्य, त्याची कामाबद्दलची कमिटमेंट, त्याची चित्रपट माध्यमाची जाण हे सारं मातीमोल ठरते. उरतो केवळ त्याचा धर्म. आता पीकेत हिंदू धर्माची नालस्ती झाल्याने नुकताच रिलीज झालेला अक्षयकुमारचा बेबी हा सिनेमा सर्वांनी पाहावा, असे आवाहन केले जात आहे. या सिनेमात मुल्ला मौलवींचं खरं रूप दाखविलं आहे, त्यामुळे खरे हिंदुस्थानी असाल, तर हा सिनेमा पाहण्यास सर्वांना प्रोत्साहित करा असे फतवे मुल्ला-मौलवींप्रमाणेच सोशल नेटवर्किंगवर काढले जात आहेत. मजेची गोष्ट म्हणजे याच अक्षयकुमारने काही वर्षांपूर्वी ओ माय गॉड या सिनेमात हिंदू धर्मातील तथाकथित स्वामी-महाराजांचा परिणामकारक भंडाफोड केला होता, तेव्हा हीच मंडळी त्या सिनेमाविरुद्ध उठली होती. सिनेअभिनेत्री करिना कपूरच्या तीन वर्षांंपूर्वी सैफ अली खान या अभिनेत्यासोबत झालेल्या लग्नाला लव्ह जिहाद मध्ये बसविणारी प्रवृत्तीही हीच. अलीकडेच संघ परिवाराच्या एका मासिकात लव्ह जिहाद मथळ्याखाली एक स्टोरी प्रकाशित झाली होती. त्या अंकाच्या मुखपृष्ठावर करिनाच्या अर्धा चेहर्‍यावर कपाळ आणि भांगात कुंकू दाखविले होते, तर अर्धा चेहरा बुरख्याने पांघरलेला दिसत होता. जणू जबरदस्तीने, दडपशाहीने तिला हे लग्न करावयास भाग पाडण्यात आले, असे ठसविण्याचा तो प्रकार होता. आता त्याच करिनाच्या नणंदने सोहा अली खानने कुणाल खेमू या अभिनेत्यासोबत लग्न केल्याने हिंदू धर्माभिमान्यांचा हिशेब बरोबर झाला असेल. मात्र हिंदूंप्रमाणचे मुस्लिम व इतर धर्मीयांतील कट्टरपंथी काही वेगळं वागत नाहीत. आठ-दहा दिवसांपूर्वीच बिहारच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणासोबत लग्न केल्याने त्याची हत्या केल्याचे प्रकरण ताजेच आहे. पॅरिसच्या चार्ली हब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कचेरीत जाऊन १४ पत्रकारांची हत्या करणारे दुसरा विचार मान्य नाही, हे सांगणारे हेकटपंथीच होते. सलमानखानचा टायगर आणि आता बेबीवर बंदी घालण्याची मागणी करणारेही त्याच कळपातले. येथेही पुन्हा तीच गंमत. हिंदू कट्टरवाद्यांविरुद्ध तावातावाने बोलणारे, त्याची चिकित्सा करणारे अशा प्रकरणात मूग गिळून गप्प. उलट एका मोठय़ा समूहाच्या धर्मभावनांचा अनादर होता कामा नये, अशी पोपटपंची करण्यात त्यांचा पुढाकार. थोडक्यात सार्‍याच धर्माचे ठेकेदार आणि तथाकथित शहाणी माणसं घटनांकडे निरपेक्षपणे पाहतच नाहीत. धार्मिक दुराग्रह व हितसंबंधच शेवटी हावी ठरतात. या अशा ठेकेदारांच्या कळपात सामील होण्यापासून स्वत:ला वाचविणं आणि शक्य असेल तिथे त्यांना चाप लावणं हेच सध्याचं प्रमुख आव्हान आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

3 thoughts on “जात-धर्माच्या कळपाबाहेर येऊन कधी विचार होणार?”

  1. Dudhe saheb Atishay sundar aani pardarshi….! aatmanirikshan karnara lekh aahe…!
    dharm ani tyacha chukicya padhatine prabhavakhali yenaare yanchyababatchi timachi
    parkhad mate avadali…!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top