‘जातीविरहित राजकारण’ हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं योगदान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सुन्न झाला आहे. चार दिवस लोटलेत. मात्र अजूनही घरचा कर्ता पुरुष गेल्याची भावना प्रत्येक घरात आहे. आजच्या पिढीने लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत. मात्र खराखुरा लोकनेता काय असतो, माणसं कसे त्याच्यावर पराकोटीचं प्रेम करतात हे गेले चार दिवस महाराष्ट्र अनुभवतो आहे. बाळासाहेबांवर आयुष्यभर टीका करणार्‍या टीकाकारांनाही ‘महाराष्ट्राच्या इतिहासावर अमिट ठसा उमटविणारा नेता’, ‘युगपुरुष’ या शब्दांत त्यांचा गौरव करावा लागतो आहे. कुठलीही लपवाछपवी न करता बेधडक, बिनधास्त, बेदरकार आयुष्य जगलेल्या सेनाप्रमुखांची खरी संपत्ती त्यांच्यावर जीव झोकून देणारी माणसं होती.

 
 ‘निष्ठा’ हा शब्द आजच्या काळात हद्दपार होण्याच्या बेतात असताना या माणसासाठी कार्यकर्ते जीव द्यायला आणि जीव घ्यायलाही तयार असत.बिलकूल अतिशयोक्ती न करता सांगायचे झाल्यास शिवाजी महाराजांनंतर एवढे एकनिष्ठ आणि जिवावर उदार असणारे साथीदार कुठल्याही मराठी नेत्याला लाभले नाहीत. कार्यकत्र्यांच्या या अभंगनिष्ठेमुळेच एक साधा, मध्यमवर्गीय नोकरी करणारा

माणूस ते लाखो-करोडो लोकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारा नेता हा प्रवास बाळासाहेब करू शकले. गेल्या 50 वर्षात इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता एवढा लोकप्रिय नेता देशात झाला नाही. बाळासाहेब महाराष्ट्राच्या बाहेर क्वचितच कुठे गेले. मात्र त्यांच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वाबद्दल संपूर्ण देशात अफाट आकर्षण आणि कुतूहल होतं. या माणसामध्ये असं नेमकं काय रसायन होतं, की ज्यामुळे माणसं त्यांच्याकडे लोहचुंबकासारखी खेचली जायची याबाबत वेगवेगळी वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिन्यांवर चर्चा झाली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यांच्यातील व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता, लेखक, कलाकार, चित्रपटप्रेमी, क्रिकेटरसिक, संगीताचा दर्दी, चित्रकलेचा जाणकार आदी विषयांबाबत भरभरून लिहून आलंय. राजकीय विरोधकांवर कठोर टीका करणारा, त्यांची पार ऐशीतैशी करणारा हा नेता वैयक्तिकपातळीवर कसे स्नेहबंध जपायचा याचेही भरपूर किस्से समोर आलेत. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील हे सारेच पैलू अतिशय मनोवेधक असले तरी या माणसाच्या खर्‍या योगदानाची फारशी चर्चा झालेली नाही.

शिवसेनाप्रमुखांनी आपल्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात सर्वात मोठं कुठलं काम केलं असेल, तर ते रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसाला उभं केलं. त्याला राजकारणात आणलं आणि मोठमोठी पदेही दिलीत. हे करताना त्यांनी कधीही जातपात पाहिली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात काही ठरावीक जातींची मिरासदारी जर कोणी मोडली असेल, तर ती केवळ बाळासाहेबांनी. माळी, साळी, तेली, वाणी, बंजारा, कुंभार, शिंपी, सोनार, कुणबी, चांभार अशा अठरापगड, बहुजनसमाजातील माणसं आज राजकारणात चांगल्या पदांवर दिसतात. त्याचं श्रेय केवळ शिवसेनाप्रमुखांना आहे. बाळासाहेबांनी माणसांना संधी देताना कधीही त्याची जात विचारली नाही किंवा त्याच्याजवळ किती पैसा आहे याचीही चौकशी केली नाही. उगाच नाही नारायण राणे, छगन भुजबळ ढसढसा रडलेत. कोंबडय़ांची विक्री आणि रस्त्यावर टगेगिरी करणारे नारायणराव असो, की मुंबईत आल्यानंतर वार लावून जेवणारे मनोहर जोशी, यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसविण्याची किमया बाळासाहेबच करू शकतात. किती उदाहरण द्यायचेत? शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, मनोहर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, लीलाधर डाके सारेच अतिशय सामान्य घरातील माणसं. या जीवाभावाच्या सोबत्यांनी बाळासाहेबांना निष्ठेने साथ दिली. त्यांनी या सार्‍यांना महापौर, आमदार, खासदार, मंत्री केले.

शिवसेनेत मोठे झालेल्या प्रत्येकाची कहाणी ही अशीच आहे. औरंगाबादचे खासदार, आमदार, मंत्री राहिलेले चंद्रकांत खैरे बुरूड समाजाचे. सुपे, टोपले विणण्याचा पारंपरिक व्यवसाय करायचे. दोन वेळ खायचे वांधे होते. बाळासाहेबांनी उचललं, कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. सध्या मनसेत असलेले किरण पावस्कर विमानतळावर पोर्टर होते. त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून बाळासाहेबांनी त्यांना कामगार सेनेची जबाबदारी सोपवली. लगेच आमदार केलं. बबनराव घोलप चर्मकार

समाजातील. रोजच्या जगण्याच्या संघर्षामुळे मेटाकुटीस आलेले. त्यांना शिवसेनेत आणून थेट समाजकल्याणमंत्री केलं. अतिशय गरीब असलेल्या साबीर शेखला कामगारमंत्री केलं. विदर्भात तर असंख्य उदाहरणं आहेत. अकोल्याचे लढाऊ नेते गुलाबराव गावंडे सायकल पंक्चर जोडायचे. बाळासाहेबांनी या उत्तम कबड्डी खेळणार्‍या पहिलवानाला महाराष्ट्राचा क्रीडामंत्री केलं. अकोटचे शिवसेनेचे पहिले आमदार रामा कराळे जिल्हा बँकेत चपराशी होते. एका रात्रीत त्यांना राजीनामा द्यायला लावून जिल्हाप्रमुख व पुढे आमदार केले. अमरावतीचे तीनदा खासदार राहिलेले अनंतराव गुढे पुस्तकाचे दुकान चालवायचे. दिवाळीत फटाके विकायचे. त्यांच्या जातीचे अमरावतीत हजारही लोक नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना तीनदा खासदार केले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत जातीचा विषय समोर आला. अमरावतीत पाटील-देशमुखांच्या गडात गुढे चालणार नाही असा युक्तिवाद झाला. तेव्हा मी त्याला निवडून आणतो म्हणत त्यांनी जिद्दीने त्यांना निवडून आणले. ही यादी खूप मोठी आहे. कामगार युनियनमध्ये काम करणारे आनंदराव अडसूळ, पेंटिंगचे काम करणारे बडनेर्‍याचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, भजे विकणारे दर्यापूरचे चार वेळा आमदार राहिलेले प्रकाश भारसाकळे, चहाची टपरी चालविणारे विजयराज शिंदे, साधे शेतकरी असलेले प्रतापराव जाधव, महादेवराव शिवणकरांचे स्वीय साहाय्यक असलेले सुबोध मोहिते, चौकात टंगळमंगळ करणारे संजय बंड, बाळू नांदगावकर, अशोक शिंदे, दाळू गुरुजी, संजय राठोड, विश्वास नांदेकर अशी हजारो नावं आहेत ज्यांना बाळासाहेबांनी कुठल्या कुठे पोहोचविलं. पक्षांतर्गत जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख अशा पदांवर नेमणूक देऊनही त्यांनी हजारोंचे आयुष्य एका रात्रीत बदलविले.

ही किमया तेच करू शकत होते. त्यांचा स्पर्श परिसाचा होता. परीस कोणी कधी बघितला नाही; पण बाळासाहेबांच्या वरदहस्ताने अनेक दगडांचं सोनं झालेलं महाराष्ट्रानं पाहिलं आहे. देशात अशी किमया फक्त पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींना साधली होती. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दगड जरी उभा केला तरी निवडून येईल असं म्हटलं जायचं. शिवसेनेत बाळासाहेबांनी तेच करून दाखविलं. वेगवेगळ्या समाजाची कुठलीही ऐपत नसलेली माणसं मोठी करताना त्यांनी कधीही सामाजिक समरसता, सामाजिक अभिसरण अशा फालतू गोष्टी केल्या नाहीत. जे काही

मनात असेल ते कृतीतून करून दाखवायचं याच पद्धतीने ते जगले. निवडणुकीत लोक जातीसाठी माती खातात हे वास्तव त्यांनी आपल्या अफाट लोकप्रियतेनं खोटं ठरविलं. छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांचा मंडल आयोगाला विरोध असल्याने आपण शिवसेना सोडली असं सांगितलं. पण त्यांनी जर जाणतेपणाने रेकॉर्ड तपासला तर जेवढय़ा ओबीसींना बाळासाहेबांनी लोकप्रतिनिधी केलं तेवढं महाराष्ट्रात शरद पवारांसहित कुठलाही नेता करू शकला नाही हे तेसुद्धा कबूल करतील. शिवसेनेच्या वाढीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसीचा टक्का वाढायला लागला हे वास्तव आहे. बाळासाहेबांचं मूल्यमापन करताना त्यांच्या इतर मोठेपणासोबत जातीपातीविरहित राजकारण आणि अगदी सामान्य

माणसाला सत्तास्थानावर आणून बसविण्याचा चमत्कार या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. त्यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणार आहे.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : 8888744796

1 thought on “‘जातीविरहित राजकारण’ हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं योगदान”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top