भारताची फुलराणी सायना नेहवाल महिला
बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत आज अधिकृतपणे अव्वल क्रमांकावर विराजमान होणार आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघ जगातील पहिल्या १0 खेळाडूंची अधिकृत रँकिंग आज घोषित करणार आहे. खरं तर शनिवारी इंडियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने प्रवेश केला तेव्हाच तिने पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. नवीन इतिहास निर्माण करणारं सायनाचं हे यश किती मोठं आहे याची फारच कमी भारतीयांना कल्पना आहे. जगातील बहुतांश देश खेळत असलेल्या लोकप्रिय वैयक्तिक क्रीडा प्रकारात एखादा भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर अव्वल ठरण्याची उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. १९८0 च्या दशकात बॅडमिंटनमध्येच काही काळ प्रकाश पदुकोन, बिलिअर्ड्समध्ये गीत सेठी, पंकज अडवाणी, बॉक्सिंगमध्ये मेरी कोम अशी काही अपवादात्मक नावं आहेत. जागतिक स्तरावर नंबर वन व्हायला प्रचंड परिश्रम व गुणवत्ता लागते. संपूर्ण आयुष्यच त्यासाठी झोकून द्यावं लागते. २५ वर्षांची सायना गेल्या १५ वर्षांपासून केवळ बॅडमिंटन आणि बॅडमिंटन एवढंच जगते आहे. त्यामुळे संपूर्ण देशाने तिला डोक्यावर घेऊन नाचावं एवढं मोठं तिचं यश आहे. दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस केवळ क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या कौतुकात दंग राहणार्या भारतीयांनी सायनाची संघर्ष गाथा समजून घ्यावी अशी आहे.
महिला बॅडमिंटनमध्ये चीनच्या खेळाडूंचं एवढं एकछत्री वर्चस्व आहे की त्यांची तटबंदी भेदून तिथे स्वत:चं स्थान निर्माण करणे ही आता आतापर्यंत अशक्यप्राय अशी गोष्ट मानली जात असे. जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंत सात ते आठ खेळाडू चीनच्या असत. आताही ज्या ली झुरुईला हटवून सायना नंबर वन झाली आहे ती झुरुई तब्बल ११९ आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर होती. झुरुईसोबत वँग शिक्सिअँन, वँग यिहान, वँग लिन, वँग झिन, जिअँग यानाजिओ, लु लॅन, झँग निंग या चीनच्या प्रबळ खेळाडू आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतर देशांच्या स्पर्धकांना टिकूच देत नव्हत्या. अत्यंत कठोर अशा सैनिकी प्रशिक्षण पद्धतीतून चीनच्या खेळाडू घडविल्या जात असल्याने त्यांना मात देणे अतिशय कठीण जाते. त्या केवळ शारीरिकदृष्ट्याच मजबूत नसतात, तर मानसिकदृष्ट्याही अतिशय कणखर असतात. सामना जेव्हा अटीतटीच्या अवस्थेत असतो तेव्हा भावनेच्या आहारी न जाता अत्यंत व्यावसायिक पद्धतीने त्या सामना संपवितात. अलीकडच्या तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये चारही स्पर्धक चीनच्याच असत. अशा चिनी तटबंदीसमोर सुरुवातीला सायनाचीही धूळधाण उडाली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती उत्साहाने सुरुवात करायची, पण क्वॉर्टर फायनल वा सेमीफायनलला चिनी खेळाडूशी सामना झाली की ती स्पर्धेतून बाहेर फेकली जायची. आज सायना नंबर वन असली तरी अजूनही तिचा चिनी खेळाडूंविरुद्धचा रेकॉर्ड कमजोरच आहे. ज्या ली झुरुईकडून तिने नंबर एकचं स्थान हिसकावून घेतलं आहे तिच्यासोबत सायनाचे आतापर्यंत सात सामने झालेत. त्यात ती केवळ दोन जिंकू शकली. वँग यिहान या चीनच्या आणखी एका अव्वल खेळाडूविरुद्ध झालेल्या आठ सामन्यातही सायनाला दोनदाच विजय मिळविता आला.सध्या नियमित खेळत नसणार्या जिअँग यानजिओविरुद्ध झालेल्या पाच लढतीत सायना एकही सामना जिंकू शकली नाही. सध्या तिसर्या क्रमांकावर असलेल्या वँग शिक्सिआनविरुद्ध मात्र तिचा रेकॉर्ड ६-५ असा आहे. बाकी वँग लिन २-४, वँग झिन ३-४, लु लॅन ४-१ या अव्वल खेळाडूंविरुद्धचा तिचा रेकॉर्ड काहीसा प्रतिकूलच आहे.
चीनच्या खेळाडूंविरुद्धचे हे अपयश सायनालाही अस्वस्थ करत होते. आपण उत्तम खेळतो, पण जगातील पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंना आपण हरवू शकत नाही ही खंत तिला होती. तिने अधिक कठोर परिश्रम घेणे सुरू केले. दिवसातले १५-१५ तास ती मेहनत घ्यायला लागली. आपला स्टॅमिना तिने अधिक वाढविला. मानसिक धैर्यही वाढविले. त्याचे परिणाम दिसायला लागलेत. २0१२ मध्ये डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या वँग यिहानला २१-१२, २१-७ असे हरवून नंतर तिने र्जमनीच्या ज्युलिअन शेंकला हरवत स्पर्धाही जिंकली. त्याच वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चीनच्या वँग झिनचा पराभव करत तिने कांस्यपदक पटकाविले. त्याच वर्षी वँग शिक्सिआनला स्वीस ओपन स्पर्धेत तिने मात दिली. गेल्या वर्षी ऑस्टेलियन ओपनमध्ये पुन्हा एकदा तिने वँग शिक्सिआनला तीन सेटमध्ये हरविले. नंतर अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनला हरवत तिने अजिंक्यपदही पटकावले. येथून चीनच्या खेळाडूंविरुद्धच्या अपयशाची साखळी तुटली. अलीकडच्या काळात सायना चीनच्या खेळाडूंना वारंवार मात देत असल्याचे पाहावयास मिळते. सायनाने आतापर्यंत मिळविलेले यश नेत्रदीपक असेच आहे. जगातील बहुतेक सर्व प्रमुख स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. इंडोनेशिया सुपर सिरीज प्रीमिअर स्पर्धा तिने आतापर्यंत तीनदा २00९, २0१0 व २0१२ ला जिंकली आहे. सिंगापूर ओपन २0१0 मध्ये, डेन्मार्क ओपन २0१२ तर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा २0१४ मध्ये तिने जिंकली आहे. गेल्या वर्षी चीनच्या खेळाडूंना त्यांच्याच मैदानावर तिने माती खाऊ घातली. २0१४ च्या चायना ओपन सुपर सिरीज प्रीमिअर स्पर्धेत ली झुरुई, वँग यिहान, वँग शिक्सिऑन अशा एकापेक्षा एक सरस चिनी खेळाडू असताना सायनाने त्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. त्या स्पर्धेत तिने चार चिनी खेळाडूंना हरविले. तेव्हापासून सायनाचा ग्राफ सतत चढतोच आहे.
सायनाची ही यशोगाथा सांगत असताना जेवढी सोपी वाटते तेवढी ती नक्कीच नाही. सुरुवातीच्या काळात एस. एम. आरिफ यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत पुलेला गोपीचंद हे तिचे प्रशिक्षक होते. या गोपीचंदांनीच तिला घडविले असे मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अनेक मोठय़ा स्पर्धा जिंकल्यात. मात्र गेल्या वर्षी काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद झाले. गोपीचंद पूर्वीप्रमाणे आपल्या खेळाकडे लक्ष देत नाहीत, अशी तिची भावना झाली. यादरम्यान ती मनानेही भरपूर खचली होती. छोट्या-मोठय़ा जखमा व सततच्या ताणामुळे शरीरही तिला हवे तसे साथ देत नव्हते. गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून वाईट पद्धतीने बाहेर झाल्यानंतर जागतिक क्रमवारीत ती नवव्या क्रमांकावर फेकली गेली. तेव्हा कुठल्याही मोठय़ा खेळाडूविरुद्ध तिला यश मिळत नव्हतं. त्यामुळे काही काळ बॅडमिंटनला रामराम ठोकण्याचा विचारही तिच्या मनात डोकावला होता. त्यानंतर एकेक्षणी तिने अतिशय धाडसी निर्णय घेतला. गोपीचंद यांच्याकडून तिने एकाएकी प्रशिक्षण घेणे थांबविलं. अनेकांना तिच्या निर्णयामुळे धक्काही बसला. सायनाच्या डोक्यात आता यश गेले आहे, त्यामुळे ती तसे वागत आहे, अशी टीकाही झाली. मात्र तिने कोणालाही उत्तर दिले नाही. तिने राष्ट्रीय प्रशिक्षक विमलकुमार यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू केले. विमलकुमारांनी शांतपणे तिचं काय चुकते आहे हे शोधणं सुरू केलं. सायनाचा फिटनेस खूप कमी झाला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिला काही काळ विश्रांती घ्यायला लावून नंतर नव्याने तिचा प्रशिक्षण कार्यक्रम आखला. त्यात तिच्या मसल्सची ताकद वाढविण्यासोबतच तिच्या नेट आणि क्रॉसलाईनजवळच्या खेळात त्यांनी सुधारणा केली. मानसोपचार तज्ज्ञांसोबत तिच्या काही मिटींग्ज करून आणीबाणीच्या परिस्थितीत ती स्थिर कशी राहील हे त्यांनी पाहिलं. सायनाला उत्तम प्रॅक्टिस मिळावी यासाठी त्यांनी स्वत:चंही वजन कमी केलं. मुळातच गुणवान असलेल्या सायनाने या प्रयत्नांमुळे कात टाकली. गेल्या महिन्यात ती पहिल्यांदाच ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचली. अंतिम फेरीत तिचा अनपेक्षित पराभव झाला, पण प्रचंड आत्मविश्वासाने खेळणारी सायना नव्या उत्साहाने खेळायला लागली, हे तेव्हाच जाणकारांच्या लक्षात आलं. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत सायना नंबर वन झाली. या नंबर वनवर तिचा हक्क आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील सायनाचे यश हे अत्यंत प्रेरणादायी आहे. कुटुंबात खेळाची पार्श्वभूमी नाही, कुठला गॉडफादर नाही, पैसा नाही. अशा परिस्थितीत सायनाने हे यश मिळविले आहे. तिच्याजवळ फक्त एक जमेची गोष्ट आहे ती म्हणजे परिश्रम आणि प्रचंड परिश्रम करण्याची तयारी. ज्या वयात तिच्या वयाच्या पोरी सिनेमा, फॅशन, कॉलेज लाईफ, बॉय फ्रेंड्स, आदर्श नवर्याची स्वप्न अशा गोष्टीत रमतात त्या वयात सायनाला बॅडमिंटनची रॅकेट, शटल आणि कोर्ट याशिवाय दुसरं कुठलंच विश्व नाही. त्यामुळेच आज ती ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ आहे. सायनाचे हे अव्वल यश आपण सर्वांनीच सणासारखं साजरं करायला हवं.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |