गाडगेबाबा, आम्हाला माफ करा

.प्रिय गाडगेबाबा,

आज  तुम्हाला जाऊन बरोबर 56 वर्षे पूर्ण होतील. या एवढय़ा वर्षात नित्यनेमाने आम्ही तुमची जयंती-पुण्यतिथी साजरी करतो. कोणी पाया पडलेलं तुम्हाला रुचत नव्हतं. तरीही तुमच्या जयंती – पुण्यतिथीला आम्ही तुमच्या प्रतिमेच्या पाया पडतो. काही ठिकाणी तुमची मंदिरं बांधली आहेत. तिथे तुमची आरती करतो. धूप-उदबत्त्या लावतो. यानिमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. तेथे ‘भुकेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी..’ या तुमच्या दशसूत्रीचं स्मरण करतो. तुम्ही इतर बुवा-महाराजांपेक्षा कसे क्रांतिकारी होते यावर भाषण ठोकतो. त्यानंतर कर्तव्य पार पाडल्याच्या समाधानात तुमची प्रतिमा खुंटीला टांगून वर्षभर पुन्हा बह्याडासारखे (बाबा, हा शब्द तुमचाच) वागायला आम्ही पुन्हा मोकळे होतो.


    बाबा, आज जर तुम्ही असते तर आमचा ढोंगीपणा पाहून तुमच्या हातातील काठीचा दणका तुम्ही नक्की आमच्या डोक्यावर हाणला असता. इतर महापुरुषांप्रमाणे तुम्हालाही फोटोत बंदिस्त करून तुमचे विचार कोनाडय़ात टाकण्याची चतुराई दाखविल्याबद्दल तुम्ही आम्हाला फोडूनही काढलं असतं. बाबा, तुकोबाच्या शब्दांत तुम्ही सांगायचे, ‘वेड लागलं जगाला देव म्हणती धोंडय़ाला.. दगडाला चार-दोन आण्याचा शेंदूर फासून त्याच्या पाया पडता. त्याच्यासमोरची राख तोंडात घालता. ही कायरे बाप्पा तुमची अक्कल?’ असेही तुम्ही विचारायचे. बाबा, या एवढय़ा वर्षात आमची अक्कल तेवढीच राहिली आहे. स्वातंर्त्यानंतर या देशाची काय प्रगती व्हायची ती झाली असेल. मात्र या महान देशात सर्वात जास्त वाढ कशात झाली असेल तर ती मंदिरांच्या संख्येत झाली आहे. जो-तो उठतो मंदिर बांधतो. फरक आता एवढाच आहे बाबा की, त्या मंदिरात आता शेंदूर फासलेल्या दगडाऐवजी लाखो रुपये खर्चून तयार केलेली मूर्ती असते. बाकी मानसिकता तीच आहे. तेव्हा खंडोबा, म्हसोबा, भैरोबा, मरीआईसमोर लोक नवस बोलायचे. आता बालाजी, वैष्णोदेवी, सिद्धिविनायकाला आम्ही साकडे घालतो. बाबा, आधीच 33 कोटी देव असलेल्या या देशात नवीन देवांची पैदास करण्याच्या माणसाच्या वृत्तीबद्दल तुम्ही चिडून म्हणायचे, ‘अहो बाप्पांनो, दगडधोंडय़ांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसालाही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून, सपाटेबाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल. मग तो देव आपल्या मोठमोठय़ाला नवसाचा फडशा पाडत जाईल. मग काय? शेती नाही, धंदा नाही; कष्ट मेहनत नको. देवापुढं ऊदधुपाचा एक डोंगर धुपाटला की, सारं काही तयार.’ बाबा, तुमचं हे सांगणं तेव्हा भिडत होतं, पण भाबडय़ा लोकांच्या डोक्यात घुसतं नव्हतं. आता सुशिक्षित म्हणविणार्‍या विज्ञान-तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलेल्या आमच्या पिढीला सारं समजतं. पण डोक्याला ताण देण्याची तयारी नाही. एकीकडे आधुनिक म्हणवून घेताना वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुनाट प्रथा-परंपरांचं बांडगूळ उरावर वाढू देणारी पिढी आहे बाबा आमची.
    बाबा, देवाधर्माच्या नावानं सामान्य माणसांची लूट कशी होते याबद्दल तुम्ही तळमळीने सांगायचे. ‘तीर्थक्षेत्र-जत्रायात्रा ही सारी भोळ्या-भाबडय़ा लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भूलभुलैयांची दुकानं आहेत. सापळे आहेत. तिथे देव नसतो. देवभक्ती नसते.तीर्थक्षेत्री गेले आणि नदीत बुडी मारून आले, दाढीमिशा बोडून आले म्हणजे पापं धुतली जात नाहीत. म्हणून सावध व्हा’, असा इशारा तुम्ही द्यायचे. पण बाबा, आता एवढय़ा वर्षानंतरही सावध होणं सोडा, आम्ही लफंग्यांच्या जाळ्यात अधिकाधिक खोल फसत चाललो आहोत. आज कोणीही बुवा-महाराज उठतो. धर्माच्या नावावर पोपटपंची करतो आणि आम्ही मुकाटपणे बैलासारख्या माना हालवितो. बाबा, आमचं एवढं अध:पतन झालं आहे की, एखादा महाराज बलात्कारी आहे, त्याच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे हे माहीत असलं तरी आम्ही चिकित्सा करायला तयार नसतो. उलट त्याच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर येतो. तोडफोड करतो. आमचंच कशाला बाबा, आमचे राज्यकर्तेही तसेच आहेत. सफाईने जादूचे प्रयोग करणार्‍या महाराजांची आमच्या मुख्यमंर्त्यांकडे पाद्यपूजा होते. देशाचे नेते म्हणविणारे त्यांच्यासमोर सपशेल लोटांगण घालतात.
   बाबा, जादूटोणा, चमत्कारांची तुम्ही किती टर उडवायचे. ‘जादूटोणे करून अथवा मूठ मारून हवा त्याचा धुव्वा
माणसाला उडवता येतो, तर मग तो देवापेक्षाही मोठा म्हटला पाहिजे. लढायात असले आठ-दहा मूठ मारणारे सोडले की, काम भागले.कशाला हव्यात मग बंदुका, तोफा नि ते आटम बाँब?’ अशा शब्दांत तुम्ही जादूटोणा करणार्‍यांची खिल्ली उडवायचे. पण बाबा, आता हे जादूटोणा, चमत्कार करणारेच आमच्या पिढीला परमपूज्य वाटायला लागले आहेत. हे जादूटोणा करणारे महाराज हवेतून सोन्याची साखळी, अंगठी, अंगारा काढू शकतात. मग धान्य काढून देशातला दुष्काळ का संपवीत नाही? पाणीटंचाईशी झगडत असलेल्या देशात पाऊस का पाडत नाही? शेतकर्‍यांच्या आत्महत्या का थांबवीत नाही? हवेतून शस्त्र, बॉम्ब काढून देशासमोरचा शस्त्रास्त्रांचा खर्च कमी का करत नाहीत? असे प्रश्न आम्हाला कधीच पडत नाहीत. बाबा, किती विषयांबाबत तुम्ही पोटतिडकीने बोलायचे. सत्यनारायणाची पूजा व उपासतापासाच्या बोकाळलेल्या प्रकारांवर तुम्ही सणसणीत कोरडे ओढायचे. ‘सत्यनारायण? सत्यनारायण देवाची भक्ती नाही. सत्यनारायण कोण करते? लोभी लोक. मुलगा नाही, सत्यनारायण पाव. गाडी नाही, सत्यनारायण कर. पैसा हातात मिळत नाही, सत्यनारायण कर. ते जागा मले कधी मिळेल, सत्यनारायण कर. सत्यनारायण सोयीस्कर देव आहे. सव्वा रुपयात हवा तो नवस पार पडतो. सत्यनारायणाच्या प्रसादानं जर साधुवाण्याची समुद्रातील बोट बाहेर येते, तर मग युद्धात बुडालेल्या बोटी बाहेर येतील का?’ असा बोचरा प्रश्न तुम्ही विचारायचे. पण बाबा तुमच्या झाडाझडतीचा काहीही फायदा झाला नाही. या सत्यनारायणाचं प्रस्थ अजूनही तसंच आहे. नवीन घर बांधलं की, कर सत्यनारायण. पोरगा नोकरीला लागला, घाल सत्यनारायण. घराचंच काय, शासकीय कार्यालयातही सत्यनारायण घुसला आहे. शासनाला कुठला धर्म नसतो म्हणतात. पण नवीन कामाची सुरुवात करताना शासकीय अधिकारीही सत्यनारायणची पूजा करतातच. या सत्यनारायणाप्रमाणेच उपवासाचं आहे बाबा. सोमवार, गुरुवारपासून एकादशी-चतुर्थीपर्यंत कशाकशाचे उपवास लोक करतात. (मधे संतोषीमातेच्या उपवासाचं फॅड आलं होतं. ते केले नाही, तर कोप होईल अशी धमकावणी असायची.) माणूस चंद्रावर जाऊन प्रातर्विधी करून आला. पण चंद्राकडे पाहून उपास सोडणारे महाभाग आपल्याकडे आहेतच. कसं व्हायचं हो बाबा?
   काय-काय तुम्हाला सांगायचं? तुम्ही तुमचं सारं आयुष्य रस्त्यावरील घाण स्वच्छ करण्यासोबतच लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरांची जळमटं दूर करण्यासाठी खर्ची घातलं. पण बाबा, परिस्थिती अजूनही तुमच्या काळात होती तशीच आहे. म्हणायला आम्ही सायबर युगात जगतो आहोत. पण कॉम्प्युटरची हळद-कुंकू लावून पूजा करणारी आमची पिढी आहे. आमच्यापैकी काहींनी अंतराळात झेप घेतली आहे. पण करोडो मेंढरं अजूनही देवदेवता, धर्म, नशीब, व्रतवैकल्य, नवस, तीर्थयात्रा यातच खुळे झाले आहेत. या देशात अजूनही माणसांपेक्षा दगडधोंडे भाग्यवान आहेत. गाजरगवतासारख्या उगवलेल्या बुवा-महाराजांना येथे भाव आहे. आम्ही आमचं सारं डोकं गहाण ठेवून काळाचं चक्र उलटं फिरवायला निघालो आहेत. तुमची सारी शिकवण आमच्यासाठी पालथ्या घडय़ावरचं पाणी ठरली आहे. म्हणून बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही नालायक आहोत. तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण व्यवहारात तुमचे विचार पेलायची ताकद आमच्यात नाही. खरंच आम्हाला माफ करा.
तुमचे बनेल भक्त
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)
भ्रमणध्वनी – 8888744796

1 thought on “गाडगेबाबा, आम्हाला माफ करा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top