महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार नावं आहेत त्यामध्ये अंदमानात नुकत्याच पार पडलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांचा क्रमांक निश्चितपणे लागतो. गेल्या काही वर्षांत अथक परिश्रम घेऊन केलेल्या संशोधनपर लेखनाने त्यांनी हे
स्थान मिळविले आहे. संशोधनातून, अभ्यासातून, पुरावे व संदर्भातून जे काही समोर येईल ते निर्भयपणे मांडायचे. हे मांडताना वेगवेगळे समूह, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, जात, पंथ, धर्माचे दबावगट यांना काय वाटतं? समाजात रूढ असलेल्या संकल्पनांना धक्का बसतो काय, अशा बाबींचा विचार न करता अप्रिय असलं तरी सत्य लोकांसमोर मांडायचं या पद्धतीने शेषराव मोरे लेखन करत आले आहेत. या विषयात रुढार्थाने गुरू नसले तरी अभ्यास आणि संशोधनाच्या विषयात मोरेंनी ज्यांना आदर्श मानले त्या नरहर कुरुंदकरांच्या पावलावर त्यांनी पाऊल ठेवले म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. गेल्या काही वर्षांतील ‘काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’,‘काश्मीर एक शापित नंदनवन,’ ‘१८५७ चा जिहाद,’ ‘मुस्लिम मनाचा शोध’ अशा शेषरावांच्या अनेक पुस्तकांनी वर्षानुवर्षे रूढ असलेल्या अनेक धारणांना जबरदस्त धक्का दिला. त्यांच्या या पुस्तकांची विचारवंत व संशोधकांमध्ये मोठी चर्चा झाली. प्रतिवाद झालेत. काहींनी त्यांच्या निष्कर्षांबद्दल मतभेदही दर्शविले. मात्र अशा मतभेदानंतरही शेषराव मोरे हे अस्सल, तर्कनिष्ठ संशोधक आहेत याबाबत जवळपास एकमत आहे. त्यामुळे अंदमानातील विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर अनेकांना मनापासून आनंद झाला. नांदेडसारख्या काहीशा आडवळणाच्या शहरात राहिल्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दू
र राहिलेल्या शेषरावांच्या लेखनकामाची, सखोल अभ्यासाची, संशोधनाची यानिमित्ताने चर्चा झाली, याचा आनंद मोठा आहे. शेषराव मोरे यांचा लौकिक सावरकरप्रेमी आणि सावरकरवादी असा आहे. स्वत: मोरे ते नाकारत नाहीत. सावरकरांचे विचार बाजूला ठेवून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही, हे मोरेंचे ठाम मत आहे. सावरकरांसारखा सर्वंकष विचार करणारा नेता दुसरा नाही, हे ते अनेक वर्षांपासून आग्रहाने सांगत आहेत. अंदमानातील साहित्य संमेलनानिमित्त वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी सावरकरांची वेगवेगळ्या विषयातील मते सविस्तरपणे मांडलीत. सावरकरांचे मोठेपण, महानता याबाबत एकवाक्यता नसली तरी शेषराव मोरेंचं सावरकर प्रेम समजून घेता येतं. विश्व साहित्य संमेलनाच्या उद््घाटनपर भाषणात मात्र त्यांनी आपल्या सावरकर प्रेमाचा अतिरेक करताना एका वादग्रस्त मुद्याला हात घातला. ‘महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा हात होता असे जर कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसात तक्रार केली पाहिजे आणि संबंधितांविरुद्ध खटला दाखल केला पाहिजे,’ असे ते म्हणाले. ‘न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असल्याने सावरकरांवरील हा कलंक दूर झाला पाहिजे,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. एक सावरकरप्रेमी म्हणून मोरे यांच्या भावना समजून घेता येतात. मात्र त्यांच्याबद्दल पुरेसा आदर ठेवून सांगावेसे वाटते की, इतर सर्व विषयांत तर्ककठोर भूमिका घेणारे शेषराव मोरे सावरकरांच्या विषयात अशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. सावरकरांना त्यांनी श्रद्धेच्या कोंदणात नेऊन बसवले आहे. गांधीहत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असतानाही सावरकरांचे विरोधक त्यांची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा वारंवार उकरून काढतात, असे मोरे म्हणतात. मात्र गांधीहत्या विषयातील सावरकरांच्या भूमिकेबाबत इतर विषयांप्रमाणे खोलात जायला मोरे तयार नाहीत. गांधीहत्या प्रकरणात सावरकरांच्या भूमिकेची चिकित्सा करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असली तरी सावरकरांना गांधी हत्येच्या कटाची माहिती होती आणि गांधींचा खून करणारे नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना सावरकर अनेकदा भेटत होते, याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. शेषरावांसारख्या तर्कनिष्ठ विचारवंताने ते उडवून लावावेत हे त्यांच्या लौकिकाला शोभत नाही. गांधीहत्या आणि गांधीहत्येच्या खटल्याबाबतची असंख्य पुस्तके व न्यायालयाची अधिकृत कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यातून नथुराम गोडसे व नारायण आपटे वारंवार सावरकरांना भेटत होते, ही बाब स्पष्ट झाली आहे. गांधीहत्येच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने गांधीहत्येच्या १३ दिवस आधी नथुराम व आपटे सावरकरांना भेटले होते. त्या भेटीत सावरकरांनी यशस्वी होऊन या…, असा आशीर्वाद गोडसे व आपटेंना दिला होता, ही बाब न्यायालयासमोर सांगितली होती. पुढे सावरकरांचे अंगरक्षक आप्पाराव कासार आणि सचिव दामले यांनी कपूर आयोगासमोर बडगेच्या या साक्षीला दुजोरा दिला होता. न्यायालयात बडगेच्या साक्षीला पुष्टी न मिळाल्याने आणि कासार व दामलेंची न्यायालयासमोर उलटतपासणी न झाल्याने केवळ तांत्रिक कारणाने सावरकर निर्दोष सुटलेत. देशातील त्यावेळची फाळणीनंतरची नाजूक परिस्थितीही सावरकरांना निर्दोष ठरविण्यात कारणीभूत ठरली. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी गांधीहत्येचे झालेले एकूण सात प्रयत्न, गांधीहत्या होण्याअगोदरचा घटनाक्रम, गांधीहत्येचा खटला, कपूर आयोगाचा अहवाल, गांधीहत्येच्या प्रयत्नांमागची मानसिकता याबाबत सविस्तर प्रकाश टाकणारं ‘लेट्स किल गांधी’ हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी गांधीहत्या प्रकरणातील सावरकरांच्या भूमिकेबाबत पुराव्यासह विवेचन केले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका शिबिरात बोलतानाही तुषार गांधी यांनी गांधीहत्येच्या षडयंत्रातून सावरकरांचे नाव वगळणे अशक्य असल्याचे मत नोंदविले होते. गांधीहत्येच्या कटात अनेक व्यक्ती, संस्था, ग्वाल्हेर व अल्वारच्या राजघराण्यांचा हात होता आणि त्या सर्वांना को-आर्डिनेट करण्याचे काम सावरकरांनी केले असा ठोस आरोप तुषार गांधींनी त्या व्याख्यानात केला होता. (या विषयात अधिक उत्सुकता असणार्यांनी ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक आणि कपूर आयोगाचा अहवाल नक्की वाचावा.) पुरावे आणि संदर्भाशिवाय काहीही न बोलणार्या शेषराव मोरेंसारख्या परखड संशोधकाने सावरकरांच्या प्रेमापोटी तेव्हाचा घटनाक्रम आणि पुरावे नाकारणे हे अतिशय खेदजनक आहे. इतिहासातील इतर व्यक्तिरेखांना कठोर कसोटी लावणारे शेषराव मोरे हे सावरकर चुकूच शकत नाही, असे मानतात हे अचंबित करणारे आहे. मुळात सावरकरही इतरांसारखेच माणूस होते. राग, मत्सर, संताप, असूया या भावनांपासून त्यांचीही सुटका नव्हती, हे लक्षात घेण्याची शेषरावांची तयारी दिसत नाही. सावरकरांचा प्रखर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, धर्माची कठोर चिकित्सा, समाजसुधारणांचा आग्रह या गोष्टी जशा नाकारता येत नाहीत त्याचप्रमाणे त्यांनी गांधींबद्दल असलेला आकस आणि गांधींच्या मारेकर्यांसोबत असलेले त्यांचे संबंधही नाकारता येत नाही, ही गोष्ट शेषरावांसह प्रत्येकच सावरकरप्रेमींनी समजून घेण्याची गरज आहे. (अंदमानातील जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापूर्वीचे सावरकर आणि अंदमानातून बाहेर आलेले सावरकर या दोन भिन्न मानसिकतेच्या व्यक्ती होत्या, हे सावरकरांचा निरपेक्ष अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात. या अंगानेही जरा सावरकरांचं मनोविश्लेषण झालं पाहिजे.) गांधीहत्येच्या प्रयत्नातील सावरकरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग हा त्यांच्या सार्या कर्तृत्वावर पाणी फेरते ही बोच शेषरावांसहीत तमाम सावरकरप्रेमींना असणे समजू शकते. त्यातून सावरकरांचा गांधीहत्येत हात होता असे म्हणणार्यांची तक्रार पोलिसात करा, असे शेषराव मोरे म्हणत असतील. मात्र असे केल्याने सत्य झाकोळून टाकता येत नाही. लपविता तर येतच नाही, हे किमान शेषरावांना तरी सांगण्याची गरज नाही.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |
छान दादा
छान दादा
satya nakarun premapoti vyaktipoojaa karane he badhak asate…! aani te jar Rashtraoursha vishayi asel tar tyacha dushparinam purna Rashtrala bhogave lagatat…! Mag te Swa. Savarkar asot vaa Mahatma Gandhi Asot.
Jase Ma. Sheshrao More Savarkar premapoti he bhashya karit aahet tech Gandhi premapoti Javahar lal Nehrunihi atirek kelach hota na…?