गडकरींनी ही वेळ येऊ द्यायला नको होती

अडवाणींच्या ठाम विरोधामुळे गडकरी दुसर्‍यांदा अध्यक्ष होऊ शकले नाही.भारतीय जनता पक्षाच्या घटनेत एक व्यक्ती सलग दुसर्‍यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवडली जाऊ शकते, अशी घटनादुरुस्ती करूनही नितीन गडकरी दुसर्‍यांदा भाजपाचे अध्यक्ष होऊ शकले नाही. मंगळवारी सकाळी गडकरींशी संबंधित पूर्ती समूहाच्या कंपन्यांवर आयकर विभागाने व्यवस्थित टायमिंग साधून टाकलेले छापे आणि त्याच दिवशी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी व नितीन गडकरींच्या चेहर्‍यावर दिसणारी अस्वस्थता, तणाव पाहता गडकरी पुन्हा अध्यक्ष होणार नाही, हे दुपारीच स्पष्ट झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेवटपर्यंत गडकरींना दुसर्‍यांदा अध्यक्षपद मिळावे, यासाठी निकराचा प्रयत्न केला. लालकृष्ण अडवाणींना मनविण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाले. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी ताणलं, तर निवडणूक होते आणि पक्षातील मतभेद उघडपणे चव्हाटय़ावर येतात, हे लक्षात आल्यानंतर संघाची दुसरी चॉईस असलेल्या राजनाथसिंहांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

 
आपल्यावरील आरोपातून जोपर्यंत निदरेष सिद्ध होत नाही तोपर्यंत अध्यक्ष होणार नाही, असे घोषित करीत गडकरींनी राजीनामा दिला. खरंतर गडकरींनी ही वेळच येऊ द्यायला नको होती. ‘पूर्ती’ प्रकरण समोर आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षातच त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता, ते पाहता त्यांनी आधीच राजीनामा देऊन टाकायला हवा होता. ‘पूर्ती’ प्रकरण तसं फुटकळ असलं तरी त्याची रिअँक्शन भाजपात ज्या पद्धतीने उमटली, त्याचा अंदाज घेण्यात गडकरी कमी पडले. राम जेठमलानी, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आदी नेत्यांनी उघडपणे गडकरींना पुन्हा अध्यक्ष करण्यास विरोध केला होता. मात्र लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथसिंह हे दिल्लीचे नेते सूचक मौन बाळगून होते. गेल्या तीन महिन्यांत गडकरींना पडद्याआड काय सुरू आहे, याचं आकलन कसं झालं नाही, याचं नवल वाटतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताकदीवरील विश्वासच कदाचित त्यांना अवाजवी आत्मविश्वास देऊन गेला असावा.

आता दिल्लीतील भाजपा नेत्यांनी गडकरींचा ‘गेम’ केला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. त्यात तथ्य नाही, असं नाही. निवडणुकीच्या अगोदरच्या दिवशीच नेमके आयकर छापे पडावेत, हा योगायोग निश्चित नव्हता. (ही अरुण जेटलींची कलाकारी होती, असं दिल्लीत मानलं जातं. त्यांनी पी. चिदंबरमसोबतच्या आपल्या संबंधाचा वापर करून मंगळवारी आयकर विभाग छापे टाकेल, अशी व्यवस्था केली, असं दिल्लीत उघडपणे बोललं जातं आहे. आयकर छाप्यांसोबत गडकरी व संघावर दबाव आणण्यासाठी यशवंत सिन्हांना अध्यक्षपदाचा अर्ज उचलायला लावण्याची व्यूहनीती ठरविण्यात आली होती. पूर्तीचं प्रकरणही अरविंद केजरीवालांकडे दिल्लीच्या भाजपा नेत्यांनीच पोहोचविलं होतं.) मात्र राजकारणात एक छोटी चूकही तुमचा डाव संपवू शकते, हा धडा यानिमित्ताने गडकरींना मिळाला असेल. आर्थिक विषयातील जाणकारांच्या मते पूर्ती प्रकरण किरकोळ आहे. मात्र या प्रकरणाचा गडकरींच्या विरोधकांनी चांगलाच ब्रभा केला. दिल्लीतील प्रसारमाध्यमांनी अनेक दिवसपर्यंत हे प्रकरण लावून धरलं होतं. बेनामी कंपन्यांनी गडकरींच्या समूहामध्ये कोटय़वधी रुपये गुंतवलेत, असे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. गडकरींच्या इंटेग्रिटीला तेथे पहिला धक्का बसला. तसंही दिल्लीमध्ये एक व्यावसायिक (कारोबारी) नेता, अशी गडकरींची प्रतिमा तयार झाली होती. या नेत्याला पक्षापेक्षा कारखानदारी, व्यवसाय व कॉर्पोरेट जगात जास्त रस आहे, असं चित्र दिल्लीत तयार झालं होतं. राजकारणात असं चालत नाही. तेथे तुम्ही कितीही पैसे कमावलेत, तरी तुम्हाला भाषा तळागाळातील माणसाची, शेतकर्‍याचीच करावी लागते. (शरद पवारांकडून गडकरींनी ते शिकायला हवं होतं.) गडकरी आपली प्रतिमा एकविसाव्या शतकातील काळासोबत धावणारा नेता, अशी करू इच्छित होते. ‘पूर्ती’प्रकरण उद्भवलं नसतं, तर भविष्यात कदाचित त्यांना त्यात यशही आलं असतं.

अर्थात, ‘पूर्ती’प्रकरण निमित्त ठरलं आहे. तीन वर्षापूर्वी संघाने ज्या पद्धतीने गडकरींना थेट दिल्लीत नेऊन बसविलं होतं, ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अजिबात रुचलं नव्हतं. दिल्लीच्या राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेला, जनतेतून कधीही निवडून न आलेल्या नेत्याला एकदम राष्ट्रीय अध्यक्ष केल्याने भाजपाचे अनेक नेते तेव्हा दुखावले होते. त्यात गडकरींनी दिल्लीत गेल्या गेल्या खास आपल्या रोखठोक पद्धतीने कामाचा धूमधडाका सुरू केला होता. पक्षाला आलेलं साचलेपण दूर करून काही प्रमाणात चैतन्य निर्माण करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. दिल्लीत व वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची नवीन फळी उभारण्यासही सुरुवात केली होती. मात्र पूर्ती प्रकरणाने सार्‍यांवर पाणी फेरलं गेलं. ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्याच्या समूहात बेनामी पैसा गुंतविला गेला आहे, त्याच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या कशा? कॉंग्रेसवर कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, असे प्रश्न पक्षातील विरोधकांनी उपस्थित करणे सुरू केले. मंगळवारच्या घटनाक्रमाबाबत आता जी माहिती बाहेर येत आहे, त्यावरून लालकृष्ण अडवाणींनी हा विषय ताकदीने लावून धरला. आपला नितीन गडकरींना व्यक्तिश: विरोध नाही. मात्र पक्षाचं नेतृत्व करणार्‍या नेत्याची सार्वजनिक प्रतिमा ही स्वच्छच असली पाहिजे, हा आग्रह त्यांनी लावून धरला. निवडणुकीच्या आखाडय़ात पक्षाला आक्रमकपणे उतरवायचं असेल, तर गडकरींमुळे अडचणी निर्माण होतील, हे त्यांनी संघाच्या पदाधिकार्‍यांना सांगितले. या विषयात कुठल्याही मनधरणीला ते बळी पडले नाही. (अडवाणींनी अध्यक्षपदासाठी सुषमा स्वराज यांचे नाव पुढे केले होते, अशी माहिती आहे. मात्र संघाने त्याला नकार दर्शविला. शेवटी दोघांनाही चालेल अशा राजनाथसिंहांच्या नावावर एकमत झाले.) अडवाणींच्या विषयात संघाची अडचण ही आहे की, सरसंघचालक मोहन भागवतांपासून संघाचे सारे विद्यमान पदाधिकारी वयाने आणि अनुभवानेही त्यांच्यापेक्षा लहान आहेत. सार्वजनिक जीवनात 60 वर्षाहून अधिक काळ त्यांनी घालविला आहे. या काळात त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा, विचारांवरील निष्ठा कसोशीने जपली. (पाकिस्तानच्या दौर्‍यात केवळ शिष्टाचार आणि औपचारिकता म्हणून जिनांची स्तुती केली असताना संघाने त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरूनच नव्हे, तर निर्णय प्रक्रियेतून बाद केल्याची बोच त्यांच्या मनात निश्चितपणे असेल.) अडवाणींनी जेव्हा नैतिक मुद्दे उपस्थित केले, तेव्हा संघाची अडचण झाली. शेवटी सायंकाळी गडकरींना राजीनामा द्यावयास सांगण्यात आलं. त्या वेळी भाजपातील एका वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया मोठी सूचक होती. ‘विषय ये था की, अध्यक्ष को हमे सजाना है, या बचाना है.’ ही कॉमेन्टस् पडद्याआड काय झाले, हे सांगून जाते. आता गडकरींचं पुढे काय, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना निश्चित पडला असेल. गडकरींना दिल्लीत आधार नसल्याने त्यांना राज्यातच परत यावं लागणारं असं दिसतंय. (अर्थात, त्यांची इच्छा असल्यास काही राज्यांचे प्रभारी वगैरे अशी एखादी जबाबदारी त्यांनी दिली जाऊ शकते.) एकदम राष्ट्रीय राजकारणातून राज्यात येणं हे त्यांना निश्चित जड जाईल. येथे राज्यातही त्यांना घेरण्याचा प्रयत्न होईलच. मात्र गडकरी हा स्वस्थ बसणारा माणूस नाही. त्यांची क्षमता, व्हिजन अफाट आहे. माणसं जोडण्याची, त्यांना ताकद देण्याची किमया त्यांच्याकडे आहे. फक्त आगामी काळात झालेल्या चुकांपासून बोध घेऊन आपला पुढचा मार्ग त्यांना निश्चित करावा लागणार आहे. शेवटी राजकारणात कोणाचेच दिवस नेहमीसाठी चांगले वा वाईट नसतात.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top