असलेल्या कुंभमेळ्यास मंगळवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. जवळपास वर्षभर हा कुंभमेळा चालणार आहे. या कालावधीत जवळपास १ कोटी लोक गोदावरीत डुबकी लावतील. तुम्ही धार्मिक असा वा नसा, तुमचा पुराणातील भाकडकथांवर विश्वास असेल-नसेल, तुम्हाला ढोंगी, दांभिक साधू व त्यांच्या निर्थक कर्मकांडाबद्दल चीड असेल, हा संपूर्ण प्रकार म्हणजे शासकीय संपत्तीचा अपव्यय आहे, असेही तुम्हाला वाटत असले तरी कुंभमेळा नावाचा प्रकार अचंबित करणारा, कुतूहल निर्माण करणारा आहे, हे निश्चित. लाखो-करोडो माणसं एका अद्भुत भावनेनं प्रत्यक्षात घाणेरड्या असलेल्या पण पवित्र मानल्या जाणार्या नदीत स्नान करतात आणि कृतकृत्य होऊन घरी परततात, हे दृश्य जगभरातील माणसांना आकर्षित तर करतंच; पण त्यांना कुंभमेळ्यात खेचूनही आणतं. त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षांत परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने कुंभमेळ्याला हजेरी लावायला लागले आहेत. कुंभमेळा नावाचा हा प्रकार एकंदरीतच अतिशय रोचक व समजून घेण्याजोगा आहे. भारतात नाशिकसोबत हरिद्वार, अलाहाबाद व उज्जैन या चार शहरांमध्ये १२ वर्षांतून एकदा कुंभमेळ्याचं आयोजन होते. पुराणकथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांमध्ये झालेलं युद्ध १२ दिवस चालले. त्यावेळी समुद्रातून अमृताचा कुंभ जेव्हा बाहेर आला तेव्हा अमरत्व देणार्या त्या अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये चढाओढ सुरू झाली. धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन आकाशात उडू लागले. त्यावेळी देव आणि राक्षसांनी त्यांचा पाठलाग केला. या पळापळीत कुंभातील अमृताचे थेंब नाशिक, हरिद्वार, अलाहाबाद व उज्जैन या चार ठिकाणी पडले. तेव्हापासून ही स्थानं सर्वात पवित्र तीर्थस्थळं मानली गेली आहेत.
या चारही ठिकाणी होणार्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी करोडो माणसं का धडपडतात याचं मूळसुद्धा पुराणातल्या कथांमध्येच आहे. अमृतकुंभातील अमृताचे थेंब हरिद्वार, अलाहाबादमधील गंगा, उज्जैन येथील नर्मदा तर नाशिकच्या गोदावरी नदीत पडल्याचं मानले जात असल्याने कुंभमेळ्यादरम्यान या नद्यांमध्ये स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी समजूत आहे. विष्णुपुराणामध्ये शंभर वाजपेयी, हजार अश्वमेध यज्ञ व एक लाख पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य एकट्या कुंभमेळ्यातील स्नानातून मिळतं, असं सांगितलं गेलं आहे. माघ महिन्यात केलेले शंभर, कार्तिक महिन्यात केलेले हजार गंगास्नान आणि वैशाखातील करोडो नर्मदास्नानापेक्षा कुंभमेळ्यातील स्नान तत्काळ मोक्ष मिळवून देते, अशी समजून भाबड्या व श्रद्धाळू हिंदू मनांमध्ये हजारो वर्षांपासून आहे. त्यामुळेच शरीर गोठवून टाकणार्या थंडीत वा प्रचंड पाऊस कोसळत असताना उघड्या शरीराने गंगा, गोदावरी वा नर्मदेत डुबकी घेताना भक्तांच्या चेहर्यावर एक अपूर्व आनंद दिसतो. नाशिकच्या कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी तीन शाही स्नान होणार आहेत. २९ ऑगस्ट, १३ व १८ सप्टेंबर (त्र्यंबकेश्वरला तिसरं स्नान २५ सप्टेंबरला होईल.) या तीन दिवशी जवळपास १ कोटीपेक्षा अधिक माणसं गोदीवरीत डुबकी लावतील. हे ‘शाही स्नान’ काय भानगड आहे, हे अनेकांना कळत नाही. प्रख्यात राजपूत योद्धा पृथ्वीराजसिंह चौहान याने मुसलमान आक्रमकांविरुद्ध लढण्यासाठी अतिशय लढाऊ मानले जाणार्या नागा साधूंची मदत घेतली होती. या साधूंनी अभूतपूर्व पराक्रम गाजवत मुसलमानांचा पराभव केला. त्यामुळे खूश होऊन पृथ्वीराजसिंहने आपली राजगादी, सारं वैभव व सैन्य एक दिवसासाठी साधूंना दिलं होतं. त्या दिवशी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सारे साधू ढोलताशांच्या गजरात, प्रचंड थाटामाटाने रथावर, हत्तीवर स्वार होऊन गंगास्नानासाठी गेले होते. तेव्हापासून ही शाही स्नानाची परंपरा सुरू झाली आहे.
कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र हे साधूच असतात. वेगवेगळे पंथ, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाड्यांशी जोडले गेलेले असतात. (कपाळावरील गंधामुळे साधू कुठल्या पंथाचे आहेत, हे ओळखता येते.) एकूण १३ मुख्य आखाडे आहेत. यामध्ये १0 शैव पंथांचे तर ३ वैष्णव पंथांचे आहेत. जुना आखाडा, अखंड आव्हान, तपनिधी निरंजन, आनंद, आव्हान, अग्नी, महानिर्वाणी, अटल, उदासीन, निर्मल, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर अशी आखाड्यांची नावे आहेत. कुंभमेळ्यात या आखाड्यांना वेगवेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते. नाशिकमध्ये शैवपंथीय तर त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णवपंथीय साधूंसाठी साधूग्राम वसविण्यात आले आहे. कोणत्या आखाड्यातील साधू कोणत्या क्रमाने स्नानाला जातील हेसुद्धा आधीच निश्चित झाले असते. कोण आधी स्नान करायचं यावरून भूतकाळात साधूंमध्ये प्रचंड मारामारी व कत्तलही झाली आहे. २00 वर्षांपूर्वीच्या एका कुंभमेळ्यात निर्मल आखाड्याच्या साधूंना अगोदर स्नान करावयास न मिळाल्याने झालेल्या हाणामारीत जवळपास पाच हजार साधूंचा मृत्यू झाला होता. इंग्रजांच्या राजवटीतही साधूंची स्नानासाठीची चढाओढ त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय होती. बर्याच प्रयत्नानंतर इंग्रजांना आखाड्यांच्या स्नानासाठीचा क्रम ठरविण्यात यश आले. या वेळी नाशिकमध्ये साध्वींनीही आम्हाला स्नानासाठी वेगळी जागा तसेच साधूग्राममध्ये निवासासाठी स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वेश्वरी महादेवी वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाड्याच्या पीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आपली मागणी रेटून धरली. भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी मात्र त्यांची मागणी ठामपणे फेटाळली. साधू-महंत हे साध्वींना स्नानासाठी जागा देण्याचा प्रकार सहन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. एकंदरीत हिंदू धर्ममार्तंड स्त्रियांना दुय्यमच मानतात, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. अशा वेगवेगळ्या प्रथा-कुप्रथा कुंभमेळ्यात कसोशीने जपल्या जातात. कर्मकांडांना तर ऊत येतो. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये आता वर्षभर श्राद्ध, पिंडदान, नारायण नागबळी असे अनेक वेगवेगळे विधी, पूजा, यज्ञ चालतील. हजारो वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातील मराठी जोडपे कुंभमेळ्यात पुन्हा एकदा एकमेकांशी विवाहबद्ध होतात. अशा चित्रविचित्र प्रथा-परंपरा कुंभमेळ्यादरम्यान पाहावयास मिळतात. हे एक वेगळंच जग आहे. कुंभमेळ्यादरम्यान तुमचंही मत काहीही असलं तरी हे औत्सुक्यपूर्ण जग पाहण्यासाठी कुंभमेळ्याला एकदा अवश्य भेट द्यायला हवी.
नागा साधूंचं अद्भुत विश्व
साधूंमध्ये नागा साधूंबद्दल सर्वाधिक औत्सुक्य असते. जवळपास संपूर्ण नग्न राहणारे, संपूर्ण शरीराला राख चोपडणारे आणि हातात शस्त्र बाळगणार्या या नागा साधूंबद्दल भक्तांना आदर असण्यासोबतच भीतीही असते. नागा साधूंजवळ तलवार व चिमटा असतोच. आपल्या जटा ते झेंडूची फुलं आणि रुद्राक्षांनी सजवितात. कपाळावर टिळा लावण्याकडे नागा साधूंचे बारीक लक्ष असते. टिळा लावण्याच्या शैलीत ते कधीही फरक पडू देत नाही. यांचा शृंगार पाहण्याजोगा असतो. असं म्हटलं जाते की, स्त्रिया १६ प्रकारचा शृंगार करतात, मात्र हे १७ प्रकाराने स्वत:ला सजवितात. मात्र या नागा साधूंशी पंगा घेण्याचं सारेच टाळतात. कारण हे अतिशय शीघ्रकोपी असतात. क्षुल्लक कारणामुळे ते संतापतात. प्रसंगी शस्त्रांचा वापरही करतात. नागा साधूंना साधू होण्याअगोदर अतिशय कठीण परीक्षा पास करावी लागते. एखाद्या व्यक्तीला साधू व्हायचं असेल, तर एकदम त्याला दीक्षा दिली जात नाही. आधी तो साधू का होऊ इच्छितो, हे तपासले जाते. त्यानंतर त्याच्या ब्रह्मचर्याची तपासणी होते. संबंधित व्यक्ती वासना आणि इच्छांपासून पूर्ण मुक्त झाला अशी आखाडयाची खात्री पटल्यानंतर त्याचं स्वत:च श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. त्यानंतर २४ तास त्याला अन्नपाणी दिलं जात नाही. त्यानंतर आखाडयाच्या ध्वजाखाली त्याचं गुप्तांग निष्क्रिय केलं जातं. हे सारं झाल्यानंतर त्याला साधू म्हणून घोषित केलं जातं.
सिंहस्थ म्हणजे काय?
कुंभमेळ्याच्या बातम्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली, असे उल्लेख सगळीकडे आलेत. ही ‘सिंहस्थ’ काय भानगड हे अनेकांना कळत नाही. सिंह हा तार्यांचा एक समूह आहे. आकाशात मोठय़ा संख्येने असलेल्या तार्यांचा व्यवस्थित अभ्यास व्हावा यासाठी आकाशाचे ८८ भाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक भागात तार्यांची एक विशिष्ट रचना दिसून येते. सिंह या तारका समूहातील तार्यांची रचना पाहिली की सिंहाच्या आकृतीचा भास होतो. म्हणून त्यांचे नाव ‘सिंह’ असे ठेवले आहे. सिंह हा तारका समूह पृथ्वीपासून कित्येक प्रकाशवर्ष अंतरावर आहे. गुरू हा ग्रह पृथ्वीपासून काही कोटी किमी. अंतरावर आहे. जेव्हा गुरू सिंह समूहासमोरून जातो तेव्हा हा समूह गुरूची पार्श्वभूमी म्हणून दिसतो. या स्थितीला गुरू सिंह राशीत आहे, असे म्हटले जाते. गुरूला सिंह राशीतून प्रवास करायला पूर्ण एक वर्ष लागते. यावेळी १४ जुलैला सकाळी गुरू सिंह राशीत आल्याबरोबर कुंभमेळ्याला सुरुवात झाली. पुढील वर्षी १२ ऑगस्टला गुरू सिंह राशीतून बाहेर पडेल तेव्हा कुंभमेळ्याची सांगता होईल. ही घटना १२ वर्षांनीच का घडते?… याचं कारण म्हणजे गुरूला मेष, वृषभ, मिथुन… मीन अशा अशा प्रत्येक तारका समूहासमोरून जायला साधारण प्रत्येकी एक वर्ष लागते. त्या हिशेबाने १२ वर्षांनंतर गुरू सिंह राशीत येतो. खगोलशास्त्राच्या दृष्टीने नियमित अशी गोष्ट आहे. केवळ गुरूच नाही तर इतर ग्रहही असाच प्रवास करत असतात. मात्र गुरूचं हे सिंह राशीतून जाणं हे विशेष मानलं जातं. या काळात पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते वगैरे अशा खूप काही भाकडकथा आपल्या पुराणात आहेत. या कथांना काहीही अर्थ नाही. ही केवळ एक खगोलशास्त्रीय घडामोड आहे., हे आजच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६