कुंभमेळ्याच्या रोचक कथा

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव, अशी ख्याती असलेल्या कुंभमेळ्यास सोमवारी अलाहाबादमध्ये सुरुवात झाली. मकरसंक्रांती ते महाशिवरात्री असे 55 दिवस हा कुंभमेळा असणार आहे. या कालावधीत जवळपास 10 कोटी लोक गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर डुबकी लावतील. तुम्ही धार्मिक असा वा नसा, तुमचा पुराणातील भाकडकथांवर विश्वास असेल, नसेल; मात्र कुंभमेळा नावाचा प्रकार अचंबित करणारा, रोमांच निर्माण करणारा व भारून टाकणारा आहे., हे निश्चित. लाखो-करोडो माणसं एका अद्भुत भावनेनं गंगेत स्नान करतात आणि कृतकृत्य होऊन घरी परततात, हे दृश्य जगभरातील माणसांना आकर्षित तर करतंच; पण त्यांना कुंभमेळ्यात खेचूनही आणतं. त्यामुळेच अलीकडच्या काही वर्षात परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने कुंभमेळ्याला हजेरी लावायला लागले आहेत.

 
 कुंभमेळा नावाचा हा प्रकारच एकंदरीतच अतिशय रोचक व जाणून घेण्याजोगा आहे. भारतात हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक व उज्जैन या चार शहरांमध्ये 12 वर्षांतून एकदा कुंभमेळ्याचं आयोजन होते. पुराणकथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानवांमध्ये झालेलं युद्ध 12 दिवस चालले. त्यावेळी समुद्रातून अमृताचा कुंभ जेव्हा बाहेर आला तेव्हा अमरत्व देणार्‍या त्या अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये चढाओढ सुरू झाली. धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन आकाशात उडू लागले. त्यावेळी देव आणि राक्षसांनी त्यांचा पाठलाग केला. या पळापळीत कुंभातील अमृताचे थेंब हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक व उज्जैन या चार ठिकाणी पडले. तेव्हापासून ही स्थानं सर्वांत पवित्र तीर्थस्थळ मानली गेली आहेत.

या चारही ठिकाणी होणार्‍या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी करोडो माणसं का धडपडतात याचं मूळ सुद्धा पुराणातल्या कथांमध्येच आहे. अमृतकुंभातील अमृताचे थेंब हरिद्वार, अलाहाबादमधील गंगा, उज्जैन येथील नर्मदा, तर नाशिकच्या गोदावरी नदीत पडल्याचं मानले जात असल्याने कुंभमेळ्यादरम्यान या नद्यांमध्ये स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी समजूत आहे. विष्णूपुराणामध्ये शंभर वाजपेयी, हजार अश्वमेध यज्ञ व एक लाख पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य एकटय़ा कुंभमेळ्यातील स्नानातून मिळतं, असं सांगितलं गेलं आहे. माघ महिन्यात केलेले शंभर, कार्तिक महिन्यात केलेले हजार गंगास्नान आणि वैशाखातील करोडो नर्मदास्नानापेक्षा कुंभमेळ्यातील स्नान तत्काळ मोक्ष मिळवून देते, अशीही भाबडय़ा व श्रद्धाळू हिंदू मनांमध्ये हजारो वर्षांपासून समजूत आहे. त्यामुळेच शरीर गोठवून टाकणार्‍या थंडीत उघडय़ा शरीराने गंगेत डुबकी घेताना भक्तांच्या चेहर्‍यावर एक अपूर्व आनंद दिसतो. अलाहाबादच्या कुंभमेळ्यात पाच शाही, तर चार सामान्य अशी नऊ स्नान होणार आहेत. मकर संक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावस्या, वसंत पचंमी, माघी पौर्णिमा व महाशिवरात्रीच्या दिवशी शाही स्नान असणार आहे. या पाच दिवशी जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक माणसं गंगेत डुबकी लावतील. हे ‘शाही स्नान’ काय भानगड आहे, हे अनेकांना कळत नाही. प्रख्यात राजपूत योद्धा पृथ्वीराजसिंह चौहाण याने मुसलमान आक्रमकांविरुद्ध लढण्यासाठी अतिशय लढाऊ मानले जाणारे नागा साधूंची मदत घेतली होती. या साधूंनी अभूतपूर्व पराक्रम गाजवत मुसलमानांचा पराभव केला. त्यामुळे खूश होऊन पृथ्वीराजसिंहने आपली राजगादी, सारं वैभव व सैन्य एक दिवसासाठी साधूंना दिलं होतं. त्यादिवशी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सारे साधू ढोलताशांच्या गजरात, प्रचंड थाटामाटाने रथावर, हत्तीवर स्वार होऊन गंगास्नानासाठी गेले होते. तेव्हापासून ही शाही स्नानाची परंपरा सुरू झाली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या आखाडय़ांचे साधू याच पद्धतीने वाजतगाजत गंगास्नानासाठी गेल्याचे सर्वानी पाहिले आहे.

कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र हे साधूच असतात. वेगवेगळे पंथ, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाडय़ांशी जोडले गेलेले असतात. (कपाळावरील गंधामुळे साधू कुठल्या पंथाचे आहेत, हे ओळखता येते.) एकूण 13 मुख्य आखाडे आहेत. यामध्ये 10 शैव पंथांचे, तर 3 वैष्णव पंथांचे आहेत. जुना आखाडा, अखंड आव्हान, तपनिधी निरंजन, आनंद, आव्हान, अग्नी, महानिर्वाणी, अटल, उदासीन, निर्मल, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर अशी आखाडय़ांची नावे आहेत. कुंभमेळ्यात या आखाडय़ांना वेगवेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते. कोणत्या आखाडय़ातील साधू कोणत्या क्रमाने स्नानाला जातील हे सुद्धा आधीच निश्चित झाले असते. कोण आधी स्नान करायचं यावरून भूतकाळात साधूंमध्ये प्रचंड मारामारी व कत्तलही झाली आहे. 200 वर्षांपूर्वीच्या एका कुंभमेळ्यात निर्मल आखाडय़ाच्या साधूंना अगोदर स्नान करावयास न मिळाल्याने झालेल्या हाणामारीत जवळपास पाच हजार साधूंचा मृत्यू झाला होता. इंग्रजांच्या राजवटीतही साधूंची स्नानासाठीची चढाओढ त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय होती. बर्‍याच प्रयत्नानंतर इंग्रजांना आखाडय़ांचा स्नानासाठीचा क्रम ठरविण्यात यश आले. या वेळी अलाहाबादमध्ये

महानिर्वाणी आखाडय़ाला पहिल्यांदा स्नान करण्याचा बहुमान मिळाला. प्रत्येक आखाडय़ाला स्नानासाठी 40 मिनिटं दिली जातात. सार्‍या आखाडय़ांच्या साधूंचे स्नान आटोपल्यानंतर सामान्य भक्तांचा नंबर लागतो. कुंभमेळ्यादरम्यान 55 दिवस श्रद्ध, पिंडदान असे अनेक वेगवेगळे विधी, पूजा, यज्ञ चालतात. यातील बहुतांश कर्मकांड या प्रकारात मोडणारे असतात. मात्र हजारो वर्षांपासून ते सुरू आहेत. मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रातील मराठी जोडपे कुंभमेळ्यात पुन्हा एकदा एकमेकांशी विवाहबद्ध होतात. गंगेच्या किनार्‍यावर पती आपल्या पत्नीच्या वेणीच्या केसाची बट कापून गंगेत प्रवाहित करतो. त्यानंतर दोघेही प्रदीर्घ वैवाहिक जीवनासाठी गंगेजवळ प्रार्थना करतात. याला ‘वेणीदान’ प्रथा म्हणतात. अशा अनेक प्रथा-परंपरा कुंभमेळ्यादरम्यान पाहावयास मिळतात. हे एक वेगळं औत्सुक्यपूर्ण जग पाहण्यासाठी कुंभमेळ्याला एकदा अवश्य भेट द्यायला हवी.
                                                    नागा साधूंचं अद्भुत विश्व

साधूंमध्ये नागा साधूंबद्दल सर्वाधिक औत्सुक्य असते. जवळपास संपूर्ण नग्न राहणारे, संपूर्ण शरीराला राख चोपडणारे आणि हातात शस्त्र बाळगणार्‍या या नागा साधूंबद्दल भक्तांना आदर असण्यासोबतच त्यांची भीतीही असते. नागा साधूंजवळ तलवार व चिमटा असतोच. आपल्या जटा ते झेंडूची फुलं आणि रुद्राक्षांनी सजवितात. कपाळावर टिळा लावण्याकडे नागा साधूंचे बारीक लक्ष असते. टिळा लावण्याच्या शैलीत ते कधीही फरक पडू देत नाही. यांचा शृंगार पाहण्याजोगा असतो. असं म्हटलं जाते की, स्त्रिया 16 प्रकारचा शृंगार करतात, मात्र हे 17 प्रकाराने स्वत:ला सजवितात. मात्र या नागा साधूंशी पंगा घेण्याचं सारेच टाळतात. कारण हे अतिशय शीघ्रकोपी असतात. क्षुल्लक कारणामुळे ते संतापतात. प्रसंगी शस्त्रांचा वापरही करतात. नागा साधूंना साधू होण्याअगोदर अतिशय कठीण परीक्षा पास करावी लागते. एखाद्या व्यक्तीला साधू व्हायचं असेल, तर एकदम त्याला दीक्षा दिली जात नाही. आधी तो साधू का होऊ इच्छितो, हे तपासले जाते. त्यानंतर त्याच्या ब्रह्मचर्याची तपासणी होते. संबंधित व्यक्ती वासना आणि इच्छांपासून पूर्ण मुक्त झाला अशी आखाडय़ाची खात्री पटल्यानंतर त्याचं स्वत:च श्रद्ध आणि पिंडदान केलं जातं. त्यानंतर 24 तास त्याला अन्नपाणी दिलं जात नाही. त्यानंतर आखाडय़ाच्या ध्वजाखाली त्याचं गुप्तांग निष्क्रिय केलं जातं. हे सारं झाल्यानंतर त्याला साधू म्हणून घोषित केलं जातं.
भ्रमणध्वनी – 8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top