कामठवाडा येथील अरविंद ठोकळांचा वाडा

Avinash Dudhe <avinashdudhe777@gmail.com> Attachments8:40 PM (7 minutes ago)  
to me

‘शोले’ तला तो सीन आठवतोय का? 

धर्मेंद्र आणि अमिताभ गब्बर सिंगचा बंदोबस्त करण्यासाठी ठाकुरांच्या रामपूर या गावी आले असतात. एके सायंकाळी ठाकुरांच्या हवेलीत वरच्या मजल्यावरील गॅलरीत जया भादुरी एका ओळीत टांगलेल्या एकेका कंदीलातील वात पेटवत पुढे सरकत असते. त्याचवेळी हवेलीसमोरील मोकळ्या जागेत अमिताभ माउथ ऑर्गनवर आर्त असे सूर आळवित जयाकडे एकटक पाहत असतो. जया अतिशय कोऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत एकेका कंदीलातील वात पेटवत असते.

हा सीन आठवण्याचे कारण म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील कलंदर मित्र अरविंद ठोकळ (मु. पो. कामठवाडा(चानी), तालुका दारव्हा) त्यांच्या शेकडो वर्षे जुन्या वडिलोपार्जित वाड्याच्या नूतनीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यांनी वाड्याच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत ‘शोले’ सारखेच कंदील लटकवले आहेत. फरक एवढाच की या कंदीलात विजेवर चालणारे दिवे आहेत.

 

अतिशय हौशी असलेल्या अरविंद यांनी वाड्यातील जुन्याच वस्तूंचा वापर करून वाड्याचा संपूर्ण कायापालट करणे सुरू केला. त्यांनी वाड्याच्या जुन्या भव्य दरवाजाला पॉलिश करून त्याला नवीन रूप दिले आहे.वाड्याचा जोता जुन्याच दगडांचा वापर करून आणखी भक्कम करण्यात आला आहे. या वाड्यात शेकडो वर्षे जुन्या पुरातन वस्तू आहेत. त्यात अन्न शिजवण्याच्या मोठ्या आकाराच्या डेग,लाकडी रवी, मातीच्या दुतल्या, उखळ, मुसळ, पाटा वरवंटा, जाते, तिफन, डवरे, लाकडी नांगर, लोखंडी नांगर, लाकडी चरखा, पितळी समई, लाकडी पलंग, पराती, तांबे आणि पितळीची वेगवेगळी भांडी, जुने दिवाण, फॅन, झुंबर, वेगवेगळ्या आकारातील कंदील अशा एक ना दोन…शेकडो वस्तू या वाड्यात आहेत.

  अरविंद यांच्या वाड्यात अशा दुर्मिळ वस्तू तर आहेतच. मात्र असे असतानाही देश आणि परदेशातील वेगवेगळ्या शहरातून ते अनेक अँटिक वस्तू विकत घेत असतात. त्यात ग्रेट ब्रिटनमधील पंखा, बहारिन येथील झुंबर, जर्मनीतील चांदीची वाटी अशा खूप साऱ्या विस्मयचकित करणाऱ्या वस्तू आहेत. हौसेला मोल नसते म्हणतात, ते अरविंद यांच्याबाबत अगदी खरे आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या पूर्वजांच्या वाड्याच्या जपवणुकीकरीता किती पैसे खर्च केलेत याचा हिशेब नाही. अरविंद ठोकळ यांचे कामठवाडा हे गाव यवतमाळ-पुसद मार्गावर यवतमाळपासून २२ किमीवर अगदी रस्त्यावर आहे. अरविंद ठोकळ (M.7588591315) हे जसे हौशी आणि कलंदर आहेत, तसे आदरातिथ्य करण्यातही त्यांचा हात कोणी पकडत नाही. त्यामुळे पूर्वजांचा ठेवा किती रसिकता आणि उत्कटतेने जपता येतो, हे पाहायचं असेल तर ठोकळ यांच्या वाड्याला भेट द्यायला विसरू नका.

Scroll to Top