कन्हैयावर संघ का संतापतो?

गोळवलकर गुरुजींना संघ परिवार ‘ऋषी’ मानतो, ते गोळवलकर लोकशाही व आधुनिक समाजरचनेला नकार देऊन प्राचीन चातुर्वण्र्य समाजव्यवस्था हीच आदर्श आहे, हे सांगत असत. त्यामुळे गोळवलकर गुरुजी आणि त्यांचं तथाकथित ‘विचारधन’ हा संघ परिवारासमोरचा मोठा नाजूक पेच आहे. ते झटकूनही टाकता येत नाही आणि त्याचं सर्मथनही करता येत नाही, असा गुंतावळा आहे. कन्हैयाने नेमकं त्यावरच बोट ठेवून संघ परिवाराची गोची केली आहे. ……………………………………………………………………………………………………………………………………………….
ज्या कन्हैयाची संघ परिवाराने ‘उंदीर’ अशी

संभावना केली होती, त्या पाच फुटी कन्हैयामुळे संपूर्ण देशभर व्याप्ती असलेल्या या परिवाराची धांदल उडणे सुरूच आहे. एक साधी मुंगी हत्तीला त्रस्त करून सोडते म्हणतात, तसाच प्रकार कन्हैयाकडून संघाच्या विषयात होत आहे. या वेळी तर त्यांच्या गडात नागपुरात घुसून या उंदराने त्यांची तारांबळ उडवून दिली. या उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी त्याच्या गाडीवर दगड फेकलेत. सभेत बूट भिरकावलेत, पण कन्हैयाने त्यांचे कपडे उतरवलेच. ज्या संघभूमीचा संघीयांना प्रचंड अभिमान आहे तेथे येऊन त्याने परिवाराचे सारे नाजूक दुखणे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले. हे नागपूर शहर गोळवलकरांचे नव्हे, तर आंबेडकरांचे आहे, असे ठणकावून त्याने सांगितले. खरं तर कन्हैयाने नवीन काही सांगितलं, अशातला भाग नाही. पण देशाची सत्ता हाती आल्याने उन्मादी अवस्थेत असलेल्या संघीयांना त्यांच्याच भूमीत वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे हे बोल महत्त्वाचे ठरतात. संघाच्या स्थापनेला गेल्या वर्षी ९0 वर्ष होऊन गेलीत. या ९0 पैकी तब्बल ४0 वर्ष संघाची सूत्रे ज्यांच्या हाती राहिलीत आणि ज्यांच्या विचारांचा या परिवारावर मोठा पगडा आहे ते संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर ज्यांना परिवार ‘गोळवलकर गुरुजी’ म्हणून ओळखतो, त्यांच्याबद्दल नागपूरला कधीच ममत्व राहिले नाही. संघ परिवाराने या एवढय़ा वर्षांत प्रयत्नांची शर्थ केली, पण नागपूरने गुरुजींच्या विषमतावादी विचारांना कधीच थारा दिला नाही. संघ आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, चिकाटीने देशभर विस्तारला, अनेक राज्यांमध्ये त्यांची सत्ता आली, पण आताआतापर्यंत नागपूरच्या भूमीने त्यांना दूरच ठेवले होते. नागपुरात भगवा फडकत नाही, ही या परिवाराची कालपर्यंतची ठसठसती जखम होती. (अलीकडे नितीन गडकरींनी आपल्या सर्वव्यापी राजकारणाने ते शल्य दूर केलं. संघीयांचं दीर्घकाळचं स्वप्न त्यामुळे पूर्ण झालं.)

नागपुरात संघाची स्थापना झाली. संघ देशाच्या कानाकोपर्‍यात विस्तारण्यात ज्या संघ स्वयंसेवकांचा सिंहाचा वाटा आहे, त्यापैकी बहुतांश नागपूरचेच. येथील रेशीमबागेत संघाच्या पहिल्या दोन सरसंघचालकांचं, अनुक्रमे केशव बळीराम हेडगेवार व माधव सदाशिव गोळवलकर यांचं स्मारक आहे. (व्यक्तिस्तोमावर विश्‍वास न ठेवणार्‍या संघाने नंतरच्या सरसंघचालकांचं स्मारक न करण्याचं ठरविलं.) नरेंद्र मोदीपासून, अडवाणी, राजनाथ सिंह, उमा भारती, भाजपाशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, संघाच्या पन्नासेक लहानमोठय़ा संघटनांचे पदाधिकारी असे झाडून सारे संघीय येथे नतमस्तक होण्यासाठी येत असतात. संघीयांसाठी नागपूरचं खूप वेगळं महत्त्व आहे. देशात कुठेही भाजपाची सत्ता आली की रेशीमबागेतून सूत्रे हलवली जातात, अशी टीका होते. यात थोडी फार अतिशयोक्ती असली तर ती अजिबातच खोटी आहे, असेही बिलकूल नाही. भाजपाशासित राज्यात कुठे काय व्हावं, यावर रेशीमबागचं बारीक लक्ष असतं. मात्र हे सगळं मनोहर असलं तरी संघ- भाजपाच्या नेत्यांची एक मोठी खंत आहे. लहानपणापासून हेडगेवार-गोळवलकरांच्या असलेल्या नसलेल्या त्यागाच्या, देशभक्तीच्या कथा ऐकून कंडीशन्ड होऊन ते रेशीमबागेत नतमस्तक होत असले तरी देशात सार्वजनिकरीत्या अजूनही त्यांना हेडगेवार-गोळवलकरांना आपले दैवतं म्हणून अद्याप तरी स्वीकारता येत नाही. कट्टर स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयात पहिल्यांदाच हेडगेवारांची प्रतिमा लागेल, याची संघीयांना खात्री होती. त्या प्रसंगाची त्यांना मोठी उत्सुकता होती. मात्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारताच राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला वंदन केल.ं पंतप्रधान कार्यालयातील आपल्या कक्षातही गांधींचीच प्रतिमा त्यांनी लावली. ज्या गांधींची संघाच्या शाखेवर टिंगलटवाळी केली जाते. यथेच्छ बदनामी केली जाते. त्यांच्या मारेकर्‍याचे नथुरामचे गोडवे गायिले जातात, त्या गांधीसमोरच आपल्या पंतप्रधानाला नतमस्तक व्हावं लागतं, हे पाहून तमाम भाबड्या संघीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. (गेल्या दोन वर्षांत आपल्या स्वप्नांचे बारीक बारीक तुकडे झाल्याचे ते पाहत आहेत.)

सार्वजनिक जीवनात मोठय़ा पदावर असलेल्या भाजपा व संघ स्वयंसेवकांची विडंबना ही आहे की, ते आपल्या कार्यालयात, संस्थांमध्येच हेडगेवार, गोळवलकरांना पुजू शकतात. बाहेर सार्वजनिकरीत्या या दोघांची काय कर्तबगारी सांगायची, हा मोठा प्रश्न तमाम संघीयांसमोर आहे. या दोघांनी विषमतावादी, चातुर्वण्र्याचा पुरस्कार करणारं तत्त्वज्ञान देशभर पसरवलं, हे सांगायचं की, राष्ट्रवादाचं खोटं तत्त्वज्ञान निर्माण करून मुस्लिम व इतर धर्मांबद्दल द्वेषभावना निर्माण करण्याचं महान कार्य त्यांनी केलं हे सांगायचं? ज्या गुरुजींना संघ परिवार ऋषी मानतो, ते गोळवलकर लोकशाही व आधुनिक समाजरचनेला नकार देऊन प्राचीन चातरुवण्र्य समाजव्यवस्था हीच आदर्श आहे, हे सांगत होते, हे कोणत्या तोडांने लोकांना सांगायचं? ‘भारतीय समाज पुन्हा एकवार सर्मथ समाज म्हणून उभा करायचा असेल, तर ऋग्वेदकालीन समाजव्यवस्थेत प्रत्येक वर्णाला जी कर्मे निश्‍चित करून दिली आहेत ती कर्मे मरणालासुद्धा न घाबरता केली पाहिजेत, चातुर्वण्र्य ही रूढी नसून धर्म आहे. श्रृतीस्मृति ईश्‍वरनिर्मित आहेत, त्यात सांगितलेली चातुर्वण्र्य व्यवस्था ही देखील ईश्‍वरनिर्मित आहे, मानवाने यात मोडतोड करण्याचा प्रय▪केला तर ती ईश्‍वरनिर्मित असल्याने ती पुन्हा प्रस्थापित होणारच,’ असं बरंच काही महान गोळवलकर गुरुजी सांगत होते, हे कसं सांगायचं, याचं सर्मथन कसं करायचं, हा भाजपा-संघाच्या नेत्यांसमोरचा पेच आहे. बरं गुरुजींनी ते सर्व लिखित स्वरूपात लिहून ठेवलंय. त्यामुळे ते नाकारण्याचीही सोय नाही. खरं तर गोळवलकर गुरुजी आणि त्यांचं तथाकथित ‘विचारधन’ हा संघ परिवारासमोरचा मोठा नाजूक पेच आहे. ते झटकूनही टाकता येत नाही आणि त्याचं सर्मथनही करता येत नाही, असा गुंतावळा आहे. कन्हैयाने नेमकं यावरच बोट ठेवलं आहे.

खरं तर गुरुजींचं तत्त्वज्ञान हाच संघविचार आहे. गुरुजींना अभिप्रेत असलेली वर्चस्ववादी व्यवस्था जैसे थे राहावी असेच संघाला कायम वाटत राहिले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे ते त्याचं उदात्तीकरण करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय या चतु:सूत्रीने येथील प्रस्थापित व्यवस्थेसोबत लढा दिला. यांना मात्र समता मान्यच नाही. हे समतेऐवजी समरसता असा बुद्धिभेद करण्यात आघाडीवर असतात. थोडक्यात आमचा वर्चस्ववाद स्वीकारून त्यात तुम्ही समरस व्हा, अशी ही बदमाशी आहे. यांना आज बाबासाहेबांचा पुळका आला आहे. मात्र बाबासाहेब संपूर्ण हयात ज्या विषमतावादी तत्त्वज्ञानाविरुद्ध लढलेत, त्याच तत्त्वज्ञानाची पाठराखण गेली ९0 वर्ष हे करत आहेत. खरं तर यांना समता मान्यच नाही. आम्ही श्रेष्ठच आहोत, आमची संस्कृती महान आहे, आमच्या परंपरा उन्नत आहेत, याचाच उदोउदो ते सदैव करत आले आहेत. ही सारी गोळवलकरांच्याच विचारांची देण आहे. त्यातूनच हे राष्ट्रवादाच्या भ्रामक कल्पना पसरवत असतात. भारतमाता की जय… म्हणण्यावरून देशभक्तीचे निकष ठरवत असतात. कन्हैयाने त्यांच्याच भूमीत येऊन त्यांचे बुरखे पुन्हा उचकटून काढलेत. त्यांचा दुटप्पीपणा उघडकीस आणला. कन्हैयाबद्दलचा संघ-बजरंगींचा संताप हा त्यातून आला आहे.

2 thoughts on “कन्हैयावर संघ का संतापतो?”

  1. How a student on bail can take the public meeting and from where the expenses coming out for him .
    who is supplying money to him for filing the petition in supreme court. is question of investigation.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top