कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या तपासाची गत दाभोळकर प्रकरणासारखीच होणार असे दिसायला लागले आहे. पानसरेंवरील हल्ल्याला जवळपास दहा दिवस लोटलेत, मात्र पोलिसांना खुन्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळत नाही. भविष्यात दाभोळकर व पानसरे यांचे मारेकरी कदाचित मिळतीलही, मात्र पडद्यामागील मास्टर माईंडला सरकार हात लावू शकेल काय, याबाबत शंकाच आहे. ८२ वर्षांचे पानसरे, ६८ वर्षांचे दाभोळकर यांचा खून करण्याची योजना आखणारी माणसं कोण, कुठल्या विचाराची असू शकतात, याचा अंदाज लावणं फारसं कठीण नाही. भूतकाळात ज्यांनी चार्वाकांना संपविलं होतं, ज्यांनी तुकारामाचा खून केला होता, ज्यांनी गांधींना मारलं होतं त्याच वृत्तीच्या माणसांनी या दोघांना संपविलं आहे.
जी माणसं समतेचा विचार मांडतात, विवेकाची भाषा बोलतात, जाती-धर्माची नेमकी चिकित्सा करतात, लोकांच्या समोर खरा इतिहास मांडून त्यांना विचार करायला शिकवितात… ही अशी माणसं कुठल्याही काळात व्यवस्थेच्या ठेकेदारांसाठी फार गैरसोयीची असतात. त्यामुळे लोकांना निर्भय बनविणारी माणसं जगाच्या पाठीवर कुठेही अशीच भेकडपणे संपविली जातात. पानसरेंचे नावही आता त्याच कडीत जोडलं गेलं आहे. हे असे खून झालेत काही दिवस प्रचंड प्रक्षोभ निर्माण होतो. संपूर्ण समाज पेटून उठल्यासारखा प्रतिक्रिया देतो. आता खूप झालं…, आता सहन केलं जाणार नाही…आम्ही सारे दाभोळकर-पानसरे वगैरे-वगैरे फलक घेऊन माणसं रस्त्यावर येतात. जातीय-धर्मांध प्रवृत्तीविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करतात. सरकारला इशारे देतात. फेसबुक व व्हॉटस्अपवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. मात्र काही दिवसांतच सर्व निर्धार-संकल्पाचं विस्मरण होतं. लवकरच सारे आपल्या वैयक्तिक कोषात गुंग होतात. आताही काही वेगळं होईल असं दिसत नाही. आम्ही लढू, आम्ही दाभोळकर-पानसरेंचा लढा चालू ठेवू, आम्ही बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही, विवेकाच्या, सत्यशोधनाच्या मार्गावरील वाटचाल आम्ही चालू ठेवू… असा निर्धार करणार्या मंडळींबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याबद्दल त्यांच्या मनात संताप आहे. चीड आहे. त्यातूनच बंदुकीच्या साहाय्याने आवाज दडपू इच्छिणार्यांविरुद्ध त्यांनी लढण्याचा संकल्प केलाय. अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र हे करताना काही बाबींबर अतिशय तटस्थ, रोखठोक व व्यावहारिक विचार व्हायला हवा. विचार मांडणार्या माणसांना संपविणार्यांचा आम्ही मुकाबला करू, असं म्हणणं कौतुकास्पद आहे. पण त्यासाठी काय योजना आहे, कसा करणार तो मुकाबला? त्याचं नियोजन कसं करणार? ज्यांच्याविरुद्ध लढायचं आहे ती समोरची माणसं अतिशय एकसंघ आहेत. त्यांच्याजवळ साधनं आहेत, पैसा आहे. मेंदू आणि डोळ्यांना झापडं लावलेले हजारो अनुयायी आहेत. अमुक-अमुक माणसं धर्माचे-व्यवस्थेचे विरोधक आहेत, असं त्यांच्या मेंदूत ठसविल्यानंतर त्यांना अतिशय थंड डोक्याने संपविण्याची त्या अनुयायांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी स्वत: मरण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यातच अलीकडच्या काळात जाती-धर्माच्या नावावर उन्माद निर्माण करून लोकशाही मार्गाने त्यांनी सारी सत्ताकेंद्र काबीज केली आहेत. अशा अतिशय कर्मठ, सनातनी, जिहादी वृत्तीने मिशन म्हणून एखादी योजना तडीला नेणार्यांविरुद्ध परिवर्तनवादी, पुरोगामी, विवेकवादी खरंच कसे लढणार?
झुंडशाहीचा मुकाबला आम्ही विचारांनी करू असे सांगितले जाते. वाचायला-ऐकायला हे वाक्य छान आहे. प्रत्यक्षात वास्तव काय आहे? फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या किती संस्था-संघटना तो विचारांचा वारसा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकल्यात? अगदीच स्पष्ट सांगायचं झाल्यास दोन-चार संघटना सोडल्या तरी बाकी फक्त प्रतिमापूजनातच व्यस्त आहेत. दाभोळकर-पानसरे खुनासारख्या घटना घडल्या की, पुरोगामी संघटनांकडून अप्रत्यक्षपणे काही संस्था-संघटनाकडे दोषी म्हणून बोटं रोखली जातात. ज्यांच्याकडे हा अंगुलीनिर्देश होतो त्या संघटना चोरून-लपून काही करीत नाही. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे. ‘हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहणार..’, हे त्या संघटना प्रारंभापासून सांगताहेत. त्यांच्या या मिशनआड येणार्यांची त्या जाणीवपूर्वक बदनामी करतात, त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवितात आणि त्या वातावरणातून नंतर खूनही होतात, हा इतिहास आहे. प्रश्न असा आहे की, ज्या संस्था-संघटना परिवर्तनाच्या विरोधी विचार मांडतात, जुन्या व्यवस्थेचे गोडवे गाऊन जात-धर्म-वर्णावर आधारित व्यवस्थेचं सर्मथन करतात, त्यांच्यामागे सर्वसामान्य माणसं का जाताहेत? परिवर्तनवादी त्यांना का थांबवू शकत नाहीत? यातून दोन अर्थ काढता येतात. पुरोगामी मंडळी ज्यांना धर्मांध वगैरे म्हणतात, ती माणसं आपलं म्हणणं लोकांना पटवून देण्यात यशस्वी होताहेत. असं जर नसेल तर स्वत:ला परिवर्तनवादी, पुरोगामी म्हणविणार्या संस्था व कार्यकर्त्यांच्या दुटप्पी, ढोंगी वागणुकीने समाज त्यांच्याकडे आकर्षित झाला. यातील दुसरी शक्यता अधिक आहे. जातीयता व धर्मांधतेविरुद्ध लढताना गोविंद पानसरे यांच्यासारख्या एखाददुसर्या माणसांचा अपवाद वगळता येथील पुरोगामी चळवळीतील बहुतांश माणसं कायम दुटप्पी वागत आली आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही. एका समूहाच्या कट्टरतेविरोधात बेंबीच्या देठापासून ओरडायचं आणि दुसर्या समूहाच्या कट्टरतेविरुद्ध भीतीमुळे म्हणा वा स्वत:ची पुरोगामी प्रतिमा जपण्यासाठी एक शब्दही काढायचा नाही, हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आहे. हा दुटप्पीपणा हिंदूत्ववादी संघटनांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने लोकांच्या मनात ठसविला. विशेष म्हणजे त्यांना त्यात उत्तम यशही आलं.
हिंदू कट्टरतावाद्यांविरुद्ध बोंबा ठोकायच्या आणि मुस्लिम, ख्रिश्चन, दलित आणि इतर कट्टरतावाद्यांविरुद्ध मूग गिळून बसायचं ही जशी येथील पुरोगाम्यांची चूक आहे तशीच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये काम करणारे सारे हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी असे मानण्याची चूकही कायम त्यांच्याकडून होते. दाभोळकर व पानसरेंच्या खुनानंतर ज्या हिंदुत्ववादी संघटनांविरुद्ध प्रचंड रोष दाटून आलाय त्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तपासले तर ९७ टक्क्यांपेक्षा अधिक माणसं ही बहुजन समाजातील असल्याचं लक्षात येतं. असं काय झालं की ती माणसं त्या धर्मांध कळपात गेली याचा कधी विचार होणार की नाही? असा विचार करण्याची गरज पुरोगाम्यांना कधीच वाटली नाही. धर्मांधता व जातीयतेविरुद्ध लढताना या देशातील सामान्य माणसाची श्रद्धास्थानं व त्यांना पूज्य असलेल्या प्रतीकांना आपण हिणवतो, त्यांचा उपहास करतो. यामुळे ते दुखावतात, हे परिवर्तनवाद्यांच्या अजूनही लक्षातच येत नाही. धर्मातील विषमता, वर्णव्यवस्था, जातीयता यातील बारकावे फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम, गाडगेबाबा, प्रबोधनकार यांच्या विचारांच्या साहाय्याने समजावून सांगण्याऐवजी पुरोगामी मंडळी बुद्धी पाजळण्यात व तावातावाने धर्मविरोधी भाषणं करण्यात धन्यता मानत आले आहेत. यातून गाईच्या अंगावरील गोचीडं मारायचे असताना गायीच्या अंगावरच धपाटे मारण्याचे प्रकार घडायला लागले. धर्मांंध संघटनांनी हे नेमकेपणाने हेरून त्याचाच इश्यू केला. पुरोगामी, परिवर्तनवादी देव, धर्म, प्रतीकं, व्यवस्था या विषयात आक्रस्ताळेपणा करीत असताना दुसरीकडे त्यांच्याकडून मात्र अव्याहतपणे माणसं जोडण्याचं काम सुरू आहे. एकेक माणूस, एकेक घर जोडत त्यांनी लाखो-करोडो कुटुंबांना आपलंस करतं हवं ते पेरणं सुरू केलं. जवळपास ९0 वर्षांच्या त्यांच्या अविरत प्रयत्नांना आता यश येत आहे. या सगळ्या नियोजनबद्ध प्रकाराला उत्तर देणं आम्ही सारे पानसरेंचे फलक घेऊन ५0 लोकांच्या मोर्चात सहभागी होणं वा व्हॉट्सअपवर निषेधाची प्रतिक्रिया देण्याइतकं सोपं नाही. ज्यांचा विचार सोयीचा नाही त्यांना जिवंतच ठेवायचं नाही अशा वृत्तीविरुद्ध लढताना सर्वात प्रथम आततायीपणा सोडावा लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या कट्टरतावाद्यांविरुद्ध आम्ही बोलू, लिहू, लढू हा निर्धार करावा लागेल. हे करण्यात यश मिळालं तर त्या कळपात गेलेली मंडळी नक्कीच नव्याने विचार करू शकतील. यासोबतच बुद्धीचा अभिनिवेष बाजूला ठेवून समाजातील सार्या घटकांपर्यंंत परिवर्तनाचा विचार न्यावा लागेल. हे सारं करताना परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांंना आपापले अहंकार बाजूला ठेवून एकत्रितपणे लढावं लागेल. तरच…तरच काही अंशी या लढाईत यश मिळेल.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |
murderer should be cought immediately. Otherwise there will be a question on Police Department.
I wood like to speak with you on this.