एक गुमनाम गांधी

अलीकडेच एका वृत्तवाहिनीवर ‘गुमनाम गांधी’ असा एक कार्यक्रम दाखविण्यात आला. हा कार्यक्रम इंदिरा गांधींचे पती, राजीव गांधींचे वडील आणि सोनिया गांधींचे सासरे फिरोज गांधी यांच्याबाबतीत होता. गांधी कोणताही असो, आपल्या देशाने त्याला कायम डोक्यावर घेतले आहे. महात्मा गांधींपासून (या गांधींचे नंतरच्या गांधींसोबत कुठलेही नातेसंबंध नव्हते.) इंदिरा, संजय, राजीव, सोनिया, प्रियंका, राहुल सारेच गांधी कमालीचे लोकप्रिय होते आणि आहेत. कबूल करा अथवा करू नका, गांधी नावाचा हा करिष्मा आहे. एक गांधी मात्र याला अपवाद राहिला आहे. ..फिरोज जहांगीर गांधी. या वर्षी त्यांची जन्मशताब्दी आहे. मात्र या आडनावामुळे ज्या पक्षाला कायम संजीवनी मिळत आली आहे, त्या कॉंग्रेसला त्यांची आठवण आहे, ना गांधी घराण्याला. फिरोज गांधीच्या हयातीतही त्यांना अशीच वागणूक मिळाली. ते गेल्यानंतरही त्यांच्याबद्दलचा तो उपेक्षित भाव कायम आहे. एखाद्या नको असलेल्या नातेसंबंधांप्रमाणे किं वा अवघड जागेवरच्या दुखण्याप्रमाणे कॉंग्रेस आणि इंदिरा गांधींच्या वारसांची त्यांच्याबद्दलची वागणूक असते. त्यामुळेच इंदिरा गांधींचे पती याव्यतिरिक्त फिरोज गांधींची देशाला ओळख नाही.

फिरोज गांधींचं आडनाव गुजराती असलं तरी ते धर्माने पारशी होते. त्यांचे वडील जहांगीर फरेदून गांधी हे मरीन इंजिनिअर होते. आईचे नाव रत्तीमाई होते. जहांगीर गांधींची अलाहाबादमध्ये राहणारी अविवाहित बहीण डॉ. शिरीन कमिसारियात हिने फिरोजला दत्तक घेतले होते. त्यामुळे फिरोजचे आईवडील जरी मुंबईत राहत असले, तरी तो अलाहाबादमध्येच मोठा झाला. डॉ.

कमिसारियात यांची अलाहाबादच्या उच्चभ्रू वतरुळात ऊठबस असल्याने स्वाभाविकच नेहरू परिवारासोबत त्यांचे जवळचे संबंध होते. फिरोज आणि इंदिराजींची पहिली भेट 1931 मध्ये एविंग ºिश्चन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात झाली होती. फिरोज हा दिसायला देखणा होता. तो खूप बुद्धिमान वगैरे नव्हता. मात्र शास्त्रीय संगीत, मोटार तंत्रज्ञानात त्यांना रस होता. इंदिराजींची भेट झाल्याच्या दुसर्‍याच वर्षी फिरोज गांधींनी त्यांना पत्राद्वारे लग्नाची मागणी घातली. त्या वेळी त्या पुण्याला शिकत होत्या आणि त्यांना सोळा वर्षेही पूर्ण झाले नव्हते. त्या पत्राने इंदिराजींसह सर्वानाच मोठा धक्का बसला होता. मात्र इंदिरा अजून लहान आहे, असे सांगत तो प्रस्ताव नेहरू कुटुंबाने धुडकावून लावला होता. मात्र फिरोजचे पंडित नेहरू आणि त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध कायम होते. तो त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसारखाच वागत असे. त्या कालावधीत कमला नेहरू यांची तब्येत वारंवार बिघडत असे. तेव्हा फिरोज अतिशय मन लावून त्यांची सेवा करायचा. 1935 मध्ये कमलाजींना फुप्फुसाच्या आजारावरील उपचारासाठी युरोपला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. इंदिराजींना आईसोबत पाठविण्यात आले. काही महिन्यांतच फिरोज गांधीही तेथे पोहोचले. त्या कालावधीतच ते जवळ आले. आईचे आजारपण आणि नंतर निधनामुळे इंदिराजींना कमालीचे एकाकीपण आले होते. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी फिरोजचा त्यांना मोठा आधार वाटला.

कमला नेहरूंच्या निधनानंतर पंडितजी सरोजनी नायडू यांची कन्या पद्यमजा नायडू यांच्या प्रेमात पडल्याचे समजताच इंदिराजींना एकाकीपणाच्या भावनेने जास्तच ग्रासून टाकलं. त्यामुळे फिरोजच्या त्या आणखीच जवळ गेल्या. युरोपमधील काही महिन्यांमध्ये या दोघांमधील ऋणानुबंध खूप घट्ट झाले होतेच. 1941 मध्ये आपण फिरोज यांच्यासोबत लग्न करणार असल्याची कल्पना इंदिराजींनी पंडितजींना दिली. नेहरू कुटुंबासाठीच हा मोठा धक्का होता. फिरोज त्यांच्या कुटुंबाच्या कितीही जवळ असला तरी तो कुठल्याही अर्थाने बरोबरीचा नव्हता. फिरोजपाशी घराण्याचे नाव नव्हते. कुठला नोकरी-धंदा नव्हता. पदवी नव्हती. कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन नव्हतं. शिवाय धर्म वेगवेगळे होते. सामाजिक आणि राजकीय पातळीवर या विवाहामुळे खूप अडचणी निर्माण होतील हे नेहरूंना दिसत होते. त्यामुळे त्यांनी इंदिराजींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इंदिराजींची आत्या विजयालक्ष्मी पंडित यांनी तर ”तुला तो आवडत असेल आणि त्याच्यासोबत राहायचं असेल, तर राहा. मात्र लग्न करू नको,” असा सल्ला इंदिराजींना दिला. इंदिराजींनी त्यांना ताडकन सुनावले,”मी लग्न करणारच. मला मुलं हवी आहेत.” त्या वेळी त्या बंडखोरीच्या, कोणाचंही न ऐकण्याच्या मूडमध्ये होत्या. शेवटी पंडितजींनी त्यांना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एकदा महात्मा गांधींना तरी भेटून ये, अशी विनवणी केली. वडिलांच्या इच्छेला मान देऊन इंदिराजी गांधीजींकडे गेल्या. तेथे त्यांनीही लग्नाची घाई करू नको, असा सल्ला दिला. या वेळी गांधीजींनी ”फिरोजबद्दल शारीरिक आकर्षण वाटतं का? एखाद्याबद्दल वाटणारे आकर्षण हा विवाहाचा पाया होऊ शकत नाही,” वगैरे बराच हितोपदेश केला. मात्र इंदिराजी ठाम होत्या. आपले फिरोजवरील प्रेम खूप सखोल आहे हे त्यांनी ठासून सांगितले. सारेच बाण वाया गेले आहे हे पाहून गांधीजींनी विवाहोत्तर ब्रह्मचर्य पाळण्याची आपली आवडती कल्पना इंदिराजींसमोर मांडली. या सल्ल्याने तर इंदिराजी चांगल्याच वैतागल्या. त्यांनी आपला विरोध दर्शविला. गांधी भेटीनंतर आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी, ”एखाद्या जोडप्याला लग्नच करू नका, असा सल्ला देणे ठीक आहे. पण लग्नानंतर पतिपत्नींनी ब्रह्मचर्याचं पालन करावं, असा सल्ला त्यांना देण्यात काहीच अर्थ नाही. यातून केवळ मनस्ताप व कटुताच निर्माण होईल,” असे मत व्यक्त केले.

शेवटी इंदिरा ऐकतच नाही हे लक्षात आल्यानंतर पंडितजी लग्नाला तयार झाले. त्याअगोदरच ती बातमी फुटली. अलाहाबादच्या ‘लिडर’ या अग्रगण्य दैनिकाने 21

फेब्रुवारी 1942 च्या अंकात ‘मिस इंदिरा नेहरू यांचा साखरपुडा’ अशा मथळ्याखाली मोठी बातमी छापून ती सार्वजनिक केली. अखेर 26 मार्च 1942 ला इंदिरा आणि फिरोज आनंदभवनात विवाहबद्ध झालेत. भारतात त्या वेळी ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यानुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींनी आपल्या धर्माचा त्याग केल्याशिवाय त्यांना विवाह करण्याची परवानगी नव्हती. मात्र त्याची फिकीर न करता हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे त्यांनी लग्न केले. मे महिन्यात ते काश्मीरला मधुचंद्रासाठी गेले. ते दोन महिने आपल्या आयुष्यातीत सर्वाधिक आनंददायी होते, असे इंदिराजींनी नमूद करून ठेवले आहे. त्या कालावधीत त्या दोघांनी वृत्तपत्रे वाचली नाहीत. फोन घेतला नाही. जगापासून संपूर्ण दूर एका वेगळ्या जगात ते होते.

बस्स. इथपर्यंतच ही कहाणी सुखद आहे. काश्मिरातून खाली मैदानात उतरल्यानंतर स्वप्नातलं जग संपलं. प्रखर वास्तवासोबत सामना सुरू झाला. ऑगस्ट 1942 मध्ये इंदिराजींसह संपूर्ण नेहरू कुटुंबाला अटक झाली. काही कालावधीतच फिरोजलाही पकडण्यात आलं. जवळपास वर्षभर तुरुंगात गेल्यानंतर 1943 मध्ये त्यांचा संसार सुरू झाला. दरम्यान, नेहरूंनी कॉंग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ या दैनिकाचं संचालकपद व पुढे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून फिरोजकडे जबाबदारी सोपविली. पगार होता 600 रुपये. दरम्यान,1944 मध्ये राजीवचा जन्म झाला. पुढच्या वर्षी हे तिघे अलाहाबादहून लखनौला राहायला आले. तेथे त्यांनी एक सुरेख बंगला भाडय़ाने घेतला. होता. मात्रलखनौपासून त्यांच्यातील विसंवादाला सुरुवात झाली. संजय गांधींच्या वेळी इंदिराजी प्रेग्नंट होत्या तेव्हा फिरोज त्यांची आतेबहीण लेखा पंडित हिच्या प्रेमात असल्याची माहिती मिळाली. अली जहीर नावाच्या राजकीय नेत्याच्या मुलीसोबतच्या त्यांच्या संबंधाचीही जोरात चर्चा झाली. यामुळे बिथरलेल्या इंदिराजी तेव्हा हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदी निवड झालेल्या आपल्या वडिलांकडे दिल्लीत यॉर्क रोडवरील बंगल्यात राहावयास आल्या. तेथून त्या फिरोजपासून तुटत गेल्या आणि आपल्या वडिलांच्या अधिक जवळ गेल्या. संजयच्या जन्मानंतर काही दिवस दिल्ली-लखनौ असं त्यांचं येणं-जाणं सुरू होतं. मात्र पुढे आपल्या वडिलांना अधिकाधिक मदत करणं हीच त्यांची प्राथमिकता राहिली.

स्वातंर्त्य मिळाल्यानंतर फिरोजही दिल्लीत राहायला आला. मात्र सासर्‍यांच्या छायेत राहणं त्याला फारसं आवडत नव्हतं. आपल्या बायकोवर वडिलांचा जास्त प्रभाव आहे ही गोष्टही त्याला अस्वस्थ करीत असे. नेहरूंच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत इंदिराजींच्या तुलनेत मिळणार्‍या दुय्यम वागणुकीमुळे त्याला अपमानित झाल्यासारखं वाटे. दरम्यान, लोकसभेची पहिली निवडणूक आली. त्या निवडणुकीत त्याने रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली. इंदिराजींनी त्याच्यासाठी जोरदार प्रचार केला. तो निवडूनही आला. संसद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्याने नेहरूं चं घर सोडून क्विन व्हिक्टोरिया रोडवरील शासकीय बंगल्यात जाणं पसंत गेलं. तेथून खर्‍या अर्थाने इंदिराजींसोबतची त्यांची साथ सुटली. पुढे पंडितजी आणि इंदिराजींना मानसिक त्रास देणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. संसदेत त्यांनी एलआयसीशी संबंधित मुद्रांक घोटाळा उघडकीस आणला. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्री कृष्णम्माचारींना राजीनामा द्यावा लागला. काही महिन्यानंतर नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई यांचेही एक प्रकरण त्यांनी शोधून काढले. या दोन्ही प्रकरणामुळे नेहरूंची मोठी गोची झाली. मात्र बाहेर ‘व्यवस्थेविरुद्ध लढणारा झुंजार नेता.,’ ‘भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारा लढवय्या खासदार’ अशी प्रसिद्धी त्याला मिळाली. दरम्यानच्या काळात त्याची प्रेमप्रकरणं सुरूच होती. ‘द ग्लॅमर गर्ल ऑफ इंडियन पार्लमेंट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तारकेश्वरी सिन्हा, खासदार महमुना सुलताना, सुभद्रा दत्ता आदी अनेक सुंदर स्त्रियांसोबतच्या त्यांच्या प्रेमप्रकरणांची संपूर्ण दिल्लीत चर्चा होती. या प्रकारामुळे इंदिराजी त्यांच्यापासून खूप दूर गेल्या. आपल्याला फिरोजपासून घटस्फोट घेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी आपली मैत्रीण पुपुल जयकर यांना तेव्हा लिहिले होते. असे असले तरी शेवटपर्यंत फिरोजवर त्यांचे अतोनात प्रेम होते. 8 सप्टेंबर 1960 रोजी फिरोज गांधींना दुसर्‍यांदा हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्या त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर अनेक महिने त्या फिरोजच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी डोरोथी नार्मन या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रांमधून त्यांचं प्रेम कळतं. ”फिरोज गेला आणि माझ्या आयुष्यातील सारे रंगच विटून गेले. मी जेव्हा केव्हा अडचणीत असे, तणावाखाली असे तेव्हा तो माझ्याजवळ असे. त्यासाठी तो दुनियेत जेथे असेल तेथून धावत येई. आता तो गेल्यानंतर अंतहीन पाण्यामध्ये मी एकटीच आहे, असं मला वाटत आहे.”

(लेखातील संदर्भ : कॅथरिन फ्रॅक आणि पुपुल जयकर

यांच्या ‘इंदिरा’ या पुस्तकातून)

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत)

भ्रमणध्वनी-8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top