२00९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ते दिवस होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असलेले आर. आर. पाटील ऊर्फ आबा विदर्भाच्या दौर्यावर होते. ५ एप्रिलला ते अमरावतीत मुक्कामी होते. २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक वेगवेगळ्या कारणाने गाजत होती. त्यामुळे मी आणि पत्रकार मित्र रघुनाथ पांडे याने आबांची मुलाखत घ्यायचे ठरविले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय खोडके यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आबा व्यस्त असल्याने दुसर्या दिवशी सकाळी नागपूर जिल्ह्यातील वाडी येथील सभेला जाताना हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेता येईल. तुम्ही सकाळी ९ वाजता हेलिपॅडवर पोहोचा, असा निरोप आम्हाला मिळाला. तोपर्यंत विमानाचे दोन-चार प्रवास झाले असले तरी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा पहिलाच अनुभव राहणार असल्याने सकाळी मोठय़ा उत्सुकतेने आम्ही हेलिपॅडवर पोहोचलो.
बरोबर ९.३0 वाजता आबा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या ताफ्यासोबत हेलिपॅडवर पोहोचले. सुरक्षारक्षकांनी घाईघाईत आमची तपासणी केली. आबांसोबत आम्ही डेक्कन एअरवेजच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो. पायलट आणि आबांचा साहाय्यक आधीच तयार होते. हेलिकॉप्टरचा पंखा वेगात फिरायला लागला. मातीचा धुराळा उडाला. प्रचंड आवाज आणि धुराळ्यात आबांनी हात दाखवत पदाधिकार्यांचा निरोप घेतला. काही क्षणातच हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली. आवाजामुळे काही क्षण बोलता येणे शक्यच नव्हते. त्यातच पहिल्या हेलिकॉप्टर प्रवासाची नवलाई असल्याने कमी उंचीवरून खालचं दृष्य कसं दिसतं हे पाहण्याची उत्सुकता आम्हाला होती. जमिनीवरची लांबच लांब काही हिरवी, काही बोडखी शेतं, उजाड डोंगर, शेवाळी नद्या, छोटी-मोठी धरणं, काही कौलारू घरांची गावं, काही मोठय़ा इमारती, जाहिरात फलकं हे पाहता-पाहता आबांनी आमचा परिचय करून घेतला. सुरुवातील अनौपचारिक गप्पा सुरू झाल्यात. ‘महिना होत आला… घरी गेलो नाही… घरच्यांशी जो काही संवाद होतो तो फोनवरून. दररोजच्या सहा ते आठ जाहीर सभा. कार्यकर्त्यांचे मेळावे… गाठीभेटी… यात दिवसाचे अठरा तास निघून जातात. सकाळी आठ वाजता सुरू होणारा दिवस रात्री दोन-तीनला संपतो.’ आबांनी अगदी सहज संवाद सुरू केला. नंतर म्हणाले, ‘विचारा हवं ते… मात्र मी बोलेल तेच छापा बरं..’ मी आणि रघुनाथने आलटून-पालटून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणूक, काँग्रेससोबतची आघाडी, आघाडीतील तणाव, शिवसेनेसोबतच्या छुप्या युतीचे आरोप आदी विषयांवर मुलाखत रंगत होती. बोलता-बोलता मुंबई बॉम्बस्फोटानंतरच्या त्यांच्या राजीनाम्याचा विषय निघाला. आबांचा चेहरा थोडा कष्टी झाला. ‘मी मीडिया हाईपचा बळी ठरलो. मात्र राजकारणात अशा गोष्टी होतात. त्याला इलाज नसतो. तेव्हा जनक्षोभ लक्षात घेता तो निर्णय घ्यावा लागला. मात्र माझा काही दोष होता, असं मला वाटत नाही,’ आबा आपली बाजू मांडत होते.
साधारण अध्र्या तासाने त्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली डोकावत साहाय्यकाला वाडी येथील हेलिपॅड कुठे आहे, याची माहिती घेण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व इतर नेत्यांना फोन करून नेमकी माहिती घ्या, असं ते म्हणाले. दरम्यान, आमच्या गप्पा सुरूच होत्या. गप्पांच्या ओघात आबांनी खिशातून तंबाखूची पुडी बाहेर काढली आणि तळव्यावर तंबाखू घेतला. मात्र एकदम ते थांबले. तेव्हा काही दिवस आधीच आबांच्या तंबाखूप्रेमाची मीडियात खूप चर्चा झाली होती. अजितदादा पवारांनी जाहीरपणे या विषयात आबांचे कान उपटले होते. आबांना ते आठवलं असावं. ते लगेच म्हणाले, ‘मी ही सवय कमी करण्याचा प्रय▪करतो आहे, पण एकदम कमी नाही होणार.. प्लीज हे छापू नका.’ आम्हीही हसत हसत होकार दर्शविला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, त्यांच्या वेगवेगळय़ा सवयी, छंद या विषयावर चर्चा रंगली. मात्र काही क्षणातच आबा एकदम थांबले. ‘अरे… वाडी अजून आलं कसं नाही. किती किलोमीटर आहे?,’ अशी त्यांनी आमच्याकडे विचारणा केली. आम्ही केवळ १५0 किलोमीटर असं सांगितल्यावर आतापर्यंत यायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले. त्यांनी पायलटला काय झाले? , अशी विचारणा केली. ‘आपण जवळपास आलो आहोत मात्र हेलिपॅड दिसत नाही,’ असे उत्तर पायलटने दिले. आणखी पाचेक मिनिटे गेली. पायलट चांगलाच गोंधळल्यासारखा दिसत होता. काही क्षणातच हेलिकॉप्टर नियोजित मार्गावरून भरकटल्याचे लक्षात आले. आबा काहीसे अस्वस्थ झालेत. मात्र आमचा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास असल्याने कुठल्या का निमित्ताने होईना प्रवास थोडा लांबतो आहे, हे पाहून आम्हाला थोडं बरं वाटत होतं. दरम्यान, आणखी काही मिनिटे गेलीत. एव्हाना अमरावती हेलिपॅड सोडून एक तास झाला होता. पायलटच्या चेहर्यावर गोंधळ कायम होता. तो हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रासोबत (एटीएस) संपर्क साधून होता. ‘तुम्ही नेमके कुठे आहात ते सांगा. म्हणजे आम्हाला योग्य मार्ग सांगता येईल,’ असे तिकडून विचारले जात होते. मात्र पायलटला ते व्यवस्थित सांगता येत नव्हते. तो बंगाली असल्याने त्याला भाषेचाही प्रॉब्लेम दिसत होता. शेवटी आबांनी पायलटला हेडफोन मला आणि रघुनाथला देण्यास सांगून एटीएसला तुम्ही नेमकी माहिती द्या, असे सांगितले. आम्ही आकाशातून जमिनीवर दिसणार्या काही खाणाखुणा सांगत होतो, पण ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये मोबाईलची रेंज होती. राष्ट्रवादीचे आमदार रमेश बंग व इतर नेत्यांचे आबांना फोन सुरू झाले. अमरावती सोडून दीड तास झाले तरी पोहोचले कसे नाही यामुळे सार्यांची घालमेल सुरू झाली होती. दरम्यान, मी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके व अमरावती पोलीस आयुक्तांसोबत संपर्क साधून हेलिकॉप्टर भरकटले असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर सार्यांचीच धावपळ सुरू झाली. अमरावती पोलीस नियंत्रण कक्ष, नागपूर पोलीस नियंत्रण कक्ष, वाडी, कळमेश्वर अशा सर्व ठिकाणांहून हेलिकॉप्टरचा शोध सुरू झाला. इकडे वर हवेत हेलिकॉप्टर एका दिशेतून दुसर्या दिशेला भटकत होते. आबा मात्र शांत होते. ते ओळखीच्या काही खाणाखुणा दिसतात का ते बारकाईने पाहत होते. आम्ही सारेच ओळखीची एखादी तरी खूण दिसते का हे शोधत होतो.मात्र काहीच दिसत नसल्याने शेवटी हेलिकॉप्टर थोडं खाली आणण्याचा निर्णय पायलटने घेतला. हेलिकॉप्टर खाली येताच चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी कोळसा खाण दृष्टिपथास पडली. मोठमोठी यंत्र कोळसा उचलत होती. ट्रकमध्ये कोळसा भरला जात होता. लगेच माजरी रेल्वेस्थानकाचा फलकही दिसला. तेथेही रेल्वे वॅगनमध्ये कोळसा भरला जात होता. हेलिकॉप्टरने जवळपास तीन-चार चकरा खाणींभोवती मारल्या. आकाशातून त्या खाणी पाहताना काहीसे भोवंडल्यासारखे वाटत होते. लगेच हवाई नियंत्रण केंद्राला आम्ही माजरीजवळ आहे, अशी माहिती पायलटने दिली. आता नेमका मार्ग सापडेल व हेलिकॉप्टर योग्य दिशेने निघेल, असा दिलासा मिळाला. पुन्हा थोड्या तुटक-तुटक गप्पा सुरू झाल्या. मात्र नंतर दहा मिनिटे होऊनही वाडी हेलिपॅड दिसत नसल्याने आता मात्र आबा वैतागले. त्यांनी स्वत: हेडफोन कानाला लावून नियंत्रण केंद्रातील कर्मचार्याला झापले. मात्र तरीही गोंधळ सुरूच होता. हेलिकॉप्टर कधी चंद्रपूर, कधी यवतमाळ, कधी भंडारा तर कधी नागपूर जिल्ह्याच्या कक्षेत भटकत होते. एका ठिकाणी शाळेचे एक मोठे मैदान दिसले. आबांनी पायलटला तिथे हेलिकॉप्टर उतरवायला सांगितले. मात्र पायलटने नम्रपणे, पण ठाम नकार दिला. ‘सॉरी सर. इमर्जन्सी असल्याशिवाय मला हेलिकॉप्टर अनोळखी ठिकाणी उतरवता येणार नाही. हेलिकॉप्टरमध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे. आपण चिंता करू नका. लवकरच मार्ग सापडेल,’ असे तो म्हणाला. पायलटचे उत्तर ऐकून आम्हा कोणालाच काय करावे कळत नव्हते. भीती वगैरे कोणाला वाटत नव्हती. मात्र हा अधांतरी प्रवास किती काळ चालणार, हे कळायला काही मार्ग नव्हता. एकीकडे रोमांच वाटत होता दुसरीकडे हुरहूरही होती. तिकडे जमिनीवर आबांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्रय▪जोरात होते. खालून आबांचे हेलिकॉप्टर अनेकांना दिसत होते. पायलटला मात्र हेलिपॅड काही केल्या दिसत नव्हते.
दरम्यान, आणखी काही मिनिटे गेलीत. काही वेळाने शहरी भाग दिसायला लागला. वर्धा-नागपूर महामार्ग दिसायला लागला. मी आबांना त्याची माहिती देऊन या रस्त्याच्या समांतर अमरावती-नागपूर मार्ग आहे आणि त्याच मार्गावर वाडी असल्याचे सांगितले. आता आपण नागपूरजवळ आहे, हे लक्षात येताच आम्ही सारेच रिलॅक्स झालोत. आता आबांनी पायलटला नागपूर विमानतळावर हेलिकॉप्टर उतरविण्यास सांगितले. पायलटने तशी परवानगी हवाई नियंत्रण केंद्राला मागितली. मात्र काही विमाने उड्डाणं घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे काही मिनिटे थांबावे लागेल, असे तिकडून सांगण्यात आले. पुन्हा एकदा हवेत निरुद्देश भटकंती सुरू झाली. एटीएसकडून परवानगी मिळण्यास विलंब होतो आहे, हे पाहून शेवटी हेलिकॉप्टर कळमेश्वरला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आम्ही अमरावती-नागपूर महामार्गावर घिरट्या घालत होतो. तिकडे पायलटला हेलिपॅड दिसावे यासाठी वाडी येथील हेलिपॅडच्या एका कोपर्यात आग पेटवून धूर करण्यात आला होता. शेवटी पायलटला तो धूर दिसला आणि भरवस्तीतील त्या हेलिपॅडवर ११.४५ च्या सुमारास ते हेलिकॉप्टर सुखरूप उतरले. अखेर एकदाचे हवेतून जमिनीवर आल्याचा आनंद सर्वांनाच होता. आमचा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास अशा पद्धतीने अविस्मरणीय झाला होता. मात्र आबांसाठीही तो अनुभव नवीन होता. हेलिकॉप्टरमधून उतरताना आमचा निरोप घेताना ते म्हणाले, ‘आतापर्यंत शेकडो वेळा हेलिकॉप्टरने प्रवास केला. मात्र असा अनुभव आजपर्यंत आला नव्हता.’ काही मिनिटातच आबांची वाडीची सभा सुरू झाली. इकडे आबांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी बर्यापैकी पसरली होती. काही वृत्तवाहिन्यांपर्यंत माहिती पोहोचली होती. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून काय प्रकार झाला हे जाणून घेतले. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांमध्येही ठळकपणे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पान एकवर प्रकाशित झाली. आबांनी बातम्या वाचून मुंबईहून फोन केला. ‘काय… काल मजा आली ना…अक्षांश-रेखांशाचे आकलन करण्यात पायलटकडून चूक झाल्याने हेलिकॉप्टर भरकटले होते,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मंत्रालयात, नागपूर विधानभवनात व विदर्भात वेगवेगळ्या निमित्ताने आबांच्या दोन-चार भेटी झाल्यात. प्रत्येक वेळी त्या हेलिकॉप्टर प्रवासाची आठवण हमखास निघत असे. उपस्थितांना तो अनुभव ऐकविला जात असे. परवा आबा अवचित गेलेत आणि सामान्य माणसाच्या या असामान्य नेत्यासोबतचा तो अविस्मरणीय प्रवास काल केल्यासारखा ताजा होऊन उभा राहिला.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६