आधुनिक एकलव्याच्या जिद्दीची कहाणी

 अमरावती-यवतमाळ राज्य महामार्गावर नांदगाव खंडेश्वर नावाचं

तालुक्याचं ठिकाण आहे़.  म्हणायला तालुकाकेंद्र पण प्रत्यक्षात खेडंच़.  रात्री ९ वाजता निद्रेच्या कुशीत गाव गपगार होऊन जातं आवर्जून गावाला भेट द्यावी, असं  गावात काही नाही़.  एक खंडेश्वराचं देवालय सोडल्यास गावाला स्वत:ची ओळख नाही़.  अशा या गावात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे धनुर्धर घडविले जातात असं सांगितलं, तर विश्वास बसणं जरा जडच जाते़ पण ते खरं आहे़.  वृषाली गोरले या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूसह गावात सराव करणाऱ्या  ८० पेक्षा जास्त धनुर्धरांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन-चार नाहीत, तर तब्बल ३१० पदकं मिळविली आहेत़.  ही माहिती कानावर पडल्यावर उत्सुकतेपोटी गावात पोहोचून तुम्ही विचारणा करायला जाल, तर फार माहिती मिळेल याची शक्यता नाही़.  मात्र सदानंद जाधव सर कुठे मिळतील असं म्हटलं की गावकरी उत्साहाने सांगतील़ ‘त्या तिकडे गावाच्या बाहेर शेतात जाधव सर धनुष्यबाण घेऊन पोरांना काही तरी शिकवित असतात़.  बाकी आम्हाला काही माहीत नाही’, असं सांगून एका दिशेला ते बोट दाखवतील़ आपण आणखी एक दोन ठिकाणी चौकशी करुन गावाबाहेरच्या उजाड शेतात पोहोचलो की समोर दिसणारं दृष्य अचंबित करणारं असतं.  वय वर्ष ८ ते १५ या वयोगटातील ४०-५० मुलं-मुली लाकडी धनुष्यावर तीर चढवत एकापाठोपाठ एक तीर टारगेट बॉक्सवर सोडत असतात़.  पोरांचा तोंडवळा पाहिला की, ही पोरं अगदी सामान्य घरातील, शेतकरी-शेतमजुरांची पोर आहेत, हे पहिल्याच नजरेत लक्षात येतं.  जरा सभोवताल नजर फिरविली की दोन-चार लाकडी धनुष्य तेवढी दिसतात़.  दुसरं कुठलंही साहित्य नजरेला पडत नाही़.  पोरांच्या पायात बुट नाहीत़ . खांद्याला व बोटांना इजा होऊ नये म्हणून लावायचे गॉर्डही दोन – चारच़.  ज्याच्यावर तीर सोडून सराव करायचा ते टारगेट बॉक्सही दोनच़.  त्यामुळे एकावेळी फार झालं तर दोन-चार मुलं सराव करु शकतात़.  मात्र पोरांना त्याचं काही नाही़.  हे असंच असतं ही त्यांची समजूत़.  आपल्याला दिसते ती त्यांच्या चेह-यावरची प्रचंड एकाग्रता आणि डोळ्यातील स्वप्ऩं.  याच उजाड रानावर सराव करुन आपली वृषालीताई परदेशात गेली़ तेथून सोन्याची पदकं घेऊन आली़.  तिला खूप मानसन्मान मिळाला़.  या इथल्या तुटक्या- फुटक्या धनुष्यानेच तिला रेल्वेत अधिकाऱ्याची  नोकरी मिळवून दिली, एवढंच त्यांना माहीत आहे़ वृषालीताई पाठोपाठ येथे धनुर्विद्या शिकणा-या  अनेक मुलामुलींनी राष्ट्रीय स्पर्धात विजेतपद मिळविली़.  त्यातून त्यांचं आयुष्य बदललं.  आपल्यालाही नांदगाव आणि गावाच्या बाहेरचं जग पाहायचं असेल तर ते  धनुष्यबाणांच्या सरावामुळेच मिळू शकतं, हे ज्येष्ठ सहकाºयांच्या अनुभवामुळे त्यांच्या लक्षात आलंय़ त्यामुळे कुठलीही कुरबूर न करता सकाळ-संध्याकाळ  कित्येक तास सरावात ते मग्न असतात़.  एक दिवस आपलंही आयुष्य नक्की बदलेल, हा ठाम विश्वास त्यांच्या डोळ्यात वाचायला मिळतोय़.
गेल्या १७ वर्षापासून हा सिलसिला येथे सुरु आहे़.  सदानंद जाधव नावाच्या एका अतिशय साध्या पण झपाटलेल्या माणसाने स्वत: मोठी स्वप्नं पाहता पाहता पोरांच्या डोळ्यातही स्वप्न पेरायला सुरुवात केली़.  खरं तर आपण सारेच स्वप्न पाहतो़.  मात्र स्वप्नातही आपण हिंमत करत नाही़ आपल्याला पेलवणारी स्वप्नंच आपण पाहतो़.  जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असलेल्या जाधवांनी कुठलं स्वप्न पाहावं? आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धनुर्धर घडविण्याचं स्वप्नं २५ वर्षापूर्वी त्यांनी पाहिलं.  खरं तर जिल्हा परिषद शिक्षकाचं विश्व चाकोरीबद्ध़ अधिकाऱ्यांची  लहर आणि गावाच्या राजकारणात नोकरी कशीबशी सांभाळावी लागते़.  जाधवांनी मात्र कुठल्याही मर्यादेची तमा न बाळगता नांदगावात आल्यानंतर आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली़.  घरचे दागिने आणि मित्रमंडळींकडून उसने पैसे घेऊन त्यांनी गावाबाहेर जागा घेतली़ जागेची साफसफाई करुन एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचा बोर्ड तिथे लावला़.   अकादमी सुरु केली खरी पण धनुर्विद्या नावाचा खेळ असतो, हेही माहीत नसलेल्या नांदगावसारख्या मागास भागात पोरांना याकडे आकर्षित करणे कठीण काम होते़.  जाधवांनी स्वत:च्या खिशाला खार लावत दोन सेकंडहॅन्ड लाकडी धनुष्य विकत घेतली आणि लहान मुलांना जमा करुन धनुर्विद्येबद्दल आवड निर्माण करणं सुरु केलं.  सुरुवातीला तर सर्वांनीच वेड्यातच काढलं.  हे धनुष्यबाण-धनुष्यबाण खेळून काय फायदा होईल, असे कोणते दिवे पोरं लावतील? असे लोक बोलायला लागले़त .  जाधव सर मात्र आपल्या विश्वात मग्न होते़. रोज मुलांकडून आठ-दहा तास सराव आणि केवळ सराव़.  काही कालावधीनंतर आपल्याच खर्चाने पोरांना जिल्हास्तरावरील स्पर्धेत न्यायला त्यांनी सुरुवात केली़.  काही महिन्यातच मेहनत रंग दाखवायला लागली़.  पोरं जिल्हास्तरावर पदकं जिंकलीत़.  थोड्याच दिवसात अनेकांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली़.  बघता बघता राष्ट्रीय स्पर्धेसाठी नांदगावची पोरं निवडली जाऊ लागली़.  इकडे मात्र कोणाला त्याची काही खबरबात नव्हती़.  कौतुकही नव्हते़.  अमरावतीच्या वर्तमानपत्रात येणा-या छोट्या-मोठ्या बातम्या सोडल्यात , तर नांदगावसारख्या मागासलेल्या भागातील पोरं राष्ट्रीय स्तरावर चमकायला लागली़, याचं महत्त्व कोणाच्या लक्षात येत नव्हतं.  एक दिवस मात्र क्रीडा विश्वच नाही, तर बाहेरचं जगही एकाएकी खडबडून जागं झालं.  बातमीच तशी होती़.  एकलव्य अकादमीच्या वृषाली गोरलेची चक्क झेक प्रजासत्ताक येथे होणा-या  जागतिक धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली होती़.  बातमी आली अन् कोण ही वृषाली?  हे नांदगाव कुठे येते,  हा शोध सुरु झाला़.  एका रात्रीत वृषाली आणि जाधव सर प्रकाशझोतात आलेत़.  वर्तमानपत्रांनी प्रथमच भरभरुन लिहिलं.  वृषालीची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर एक गंमतच झाली़ भारतीय धनुर्विद्या

फेडरेशनच्या पदाधिकारयांनी  तिला पासपोर्ट आहे का, विचारणा केली़ ती म्हणाली़- ‘ हो! भरपूर आहे़त ‘ अधिकारी चमकलेत़.  हिने आपल्या बॅगेतून पासपोर्ट फोटो काढून त्यांना दाखविले़.  ती तरी काय करणाऱ़़? आपलं गाव आणि नांदगावची अकादमी सोडली तर छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या  वृषालीला बाहेरच जग माहीतच नव्हतं.  पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर मात्र वृषालीने मागे वळून पाहिले नाही़.  झेक प्रजासत्ताकानंतर डोमॅनिक रिपब्लिकन आणि इतर देशातील स्पर्धेत सहभागाची संधी मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने दहा पदकं मिळवली़
वृषालीच्या जबरदस्त कामगिरीने धनुर्विद्येचं जग चमकलं.  ही पोरगी कुठे शिकली?, हिचा गुरु कोण?, याचा शोध सुरु झाला़ धनुर्विद्येत भारताचं आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारा लिंबारामपासून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू नांदगावात येऊन धडकले़.  मात्र येथे त्यांना धक्काच बसला़.  कुठल्याच मुलभूत सोयीसुविधा नसलेल्या अ‍ॅकेडमीतून वृषाली तयार झाली, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता़.  ही बातमी धनुर्विद्या विश्वात सर्वत्र पसरली़.  सदानंद जाधवांची मेहनत आणि आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या त्यांच्या कसबाची सर्वत्र चर्चा सुरु झाली़.  राजकारणी, क्रीडा अधिकारी, प्रशिक्षकांसह अनेकांच्या भेटीगाठी सुरु झाल्या़.  भरघोस मदत देण्याची आश्वासन मिळालीत.  जाधव सर त्यांना म्हणाले, ‘किमान अनिवासी प्रबोधनीचा दर्जा आणि अत्याधुनिक दोन-चार धनुष्य देता आल्यास बघा़’ या गोष्टीलाही भरपूर वर्ष लोटलीत़.  तोंड भरुन आश्वासन देणाऱ्यांनी  पुन्हा तोंड दाखविलं नाही़.  कुठली मदतही दिली नाही़.  इकडे  कठोर परिश्रम व जिद्दीतून मुलं घडविण्याचं जाधव सरांचं व्रत मात्र अव्याहत सुरुच आहे़.  वृषालीनंतर अनिल मोरे, कीर्ती सारडा, प्रिया काळे,  पवन जाधव, संदीप डाफे, आदित्य रोहणकर अशा शंभरापेक्षा अधिक मुलामुलींनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटविली आहे़.  त्यांचा पराक्रम पाहून महाराष्ट्र आणि इतर प्रांतातील मुलं अकादमीत प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने नांदगावात येतात़.  मात्र येथे निवासाची सोय नाही़ अत्याधुनिक साधनं नाहीत हे पाहून  खिन्न होऊन ते परततात़.  महाराष्ट्र सरकारने प्रत्येक तालुका ठिकाणी क्रीडा प्रबोधनी उभी करुन लाखो रुपये तिथे खर्च केलेत़.  मात्र ज्या अकादमीने १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय पदक विजेते धनुर्धर घडविले तिथे एक रुपयाही त्यांना द्यावासा वाटला नाही़.  जाधवांनी आतापर्यंत अनेकदा सरकारदरबारी अर्ज केले़ राजकारण्यांना विनंती केली़ पण उपयोग काहीच नाही़.  आजही  जुन्या पुराण्या लाकडी धनुष्यावर त्यांची मुलं सराव करतात़.  कुठल्या स्पर्धेसाठी निवड झाली तर पोरांजवळ साधे प्रवासखर्चासाठीही पैसे नसतात़.  चांगला आहार, अत्याधुनिक पूरक साधनं, ही तर फार दूरची गोष्ट झाली़.   आॅलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात वापरलं जाणारं  रिकर्व्ह प्रकारचं धनुष्य आणि त्याची संपूर्ण कीट एक लाखापर्यंत मिळते़.  असे दोन-चार धनुष्य जरी मिळाले तर, तरी मी चमत्कार करुन दाखवेल, असे जाधव सर सांगतात़ (महाराष्ट्रात असंख्य माणसं दानशूर आहेत़ दोन चार माणसं जरी पुढे आलीत तरी जाधवांचं मिशन पूर्ण होऊ शकतं. ) त्यांचं आतापर्यंतच काम पाहिलं तर त्यांचा आत्मविश्वास अजिबात अनाठायी नाही़.  सरकार आणि क्रीडा पदाधिकाऱ्याकडून  आलेल्या अनुभवामुळे ते काहीसे निराश असले तरी स्वप्न पाहणं अद्याप त्यांनी सोडलं नाही़.  २० वर्षापूर्वीच्याच निष्ठा आणि मेहनतीने ते एकापेक्षा एक सरस धनुर्धर घडवित आहेत़.  आपली मुलं पवन, अमर आणि विद्यार्थी सहकारी विलास भारोडकर, संदीप डोफे, कमलेश लोमटे, अनुप काकडे, विशाल ढवळे यांच्यासह ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत़.  एक ना एक दिवस भारताला आॅलिम्पिकमध्ये धनुर्विद्येत  पदक मिळवून देऊच हा आत्मविश्वास त्यांच्यात कायम आहे़.
सदानंद जाधव यांच्या अकादमीचा पत्ता- एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमी, मु़पो़ ता़ नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती ४४४७०८  मोबाईल क्रमांक ९४२२९१४४७०
#Ekalavyaakadami
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)
8888744796

3 thoughts on “आधुनिक एकलव्याच्या जिद्दीची कहाणी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top