|
|
इतिहासाची बिनदिक्कतपणे मोडतोड करणे हा कुठल्याही काळातील प्रस्थापितांचा स्थायिभाव असतो. ज्यांच्या हाती सत्ता आणि माध्यमं असतात, ते त्यांना हवा तसा इतिहास सांगतात, लिहितात आणि भावी पिढय़ांवर तो तसाच ठसेल, अशी व्यवस्थाही करून ठेवतात. पोथी-पुराणं व इतिहासाची पानं चिकित्सकपणे तपासल्यास याची असंख्य उदाहरणं आढळतात. ज्यांचं केवळ नाव उच्चारलं तर मराठी माणसाची मान उंचावते त्या शिवाजी महाराजांना लुटारू संबोधणं, तुकाराम महाराजांचा उल्लेख व्यवहारशून्य टाळकुट्या करणं , डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निजाम व इंग्रजांचे हस्तक, तर महात्मा गांधी हे फाळणीचे मुख्य गुन्हेगार… हा असा चुकीचा इतिहास कुजबुजतंत्राने सगळीकडे पसरविणे, वेळप्रसंगी जाहीरपणे मांडण्याचेही पराक्रम महाराष्ट्रात झाले आहेत. बहुजनांच्या कर्तबगारीला खुजं ठरविणे, त्यात मुद्दामहून खोट काढणे, ते शक्य नसले तर त्यांच्या कर्तृत्वाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे असे प्रकार अतिशय बेमालूमपणे केले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या महाराष्ट्रातील दखलपात्र संघटनेच्या इतिहासाबाबतही असाच प्रकार होतो आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला यावर्षी २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याबद्दल वेगवेगळी वर्तमानपत्रं व दूरचित्रवाहिन्यांवर अंनिसच्या इतिहासाची उजळणी व डॉ. दाभोळकरांच्या कर्तृत्वाचं स्मरण केलं जात आहे. यात काही चुकीचंही नाही. डॉ. दाभोळकरांनी अतिशय कष्ट, मेहनत व चिकाटीने महाराष्ट्रातील अनेक भागांत अंनिसचं काम उभारलं. कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. अंधश्रद्धांबाबत जनजागरण केलं. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा यासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत चिकाटीने प्रय▪केले. याबद्दल त्यांचं व त्यांच्या संघटनेचं कौतुक व्हायलाच हवं. याबाबत कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही.
प्रश्न वेगळा आहे. दाभोळकरांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त माध्यमांमध्ये जे कौतुकसोहळे सुरू आहेत, त्यात दाभोळकरांची संघटना हीच एकमेव आणि अधिकृत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनच्या विषयात जे काही काम झालं आहे, ते याच संघटनेनं केलं आहे, असं भासविण्याचा आणि ठसविण्याचाही जोरदार प्रय▪करण्यात येत आहे. आक्षेप यालाच आहे. दाभोळकरांच्या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवर वर्तमान आणि भविष्यातही माध्यमांचा त्यांच्या कर्तृत्वावर जास्त प्रकाशझोत राहणार, हे स्वाभाविक आहे. त्याबद्दल पोटदुखीचंही कारण नाही. मात्र हे करताना सत्याचा अपलाप तोसुद्धा जाणीवपूर्वक होत असेल, तर ते मात्र संतापजनकच आहे. याविषयात सत्य काय आहे, हे जरा महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधी व पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. दाभोळकरांच्या संघटनेच्या अगोदर प्रा. श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना नागपुरात केली. अशा प्रकारच्या पहिल्या संघटनेचं श्रेय जर कोणाचं असेल, तर ते निर्विवादपणे श्याम मानवांचं आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांचं आहे. या संघटनेच्या स्थापनेमागचा इतिहासही रंजक आहे. १९८0 च्या दशकात नागपुरात रॅशनलिस्ट असोसिएशन ही संघटना चर्चेत होती. तेव्हाचे नागपूर विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. चंद्रशेखर पांडे, उमेश चौबे, पत्रकार म.य. दळवी ही मंडळी या असोसिएशनमध्ये कार्यरत होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी अशा विषयांत चर्चा, व्याख्यानं, जनजागृती हे काम या असोसिएशनच्या माध्यमातून चालत असे. याच मंडळींनी पुढाकार घेऊन नंतर मानवीय नास्तिक मंचची स्थापना केली. सुधाकर जोशी, नागेश चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत सक्रिय होते. १९८१-८२ मध्ये विख्यात रॅशनॅलिस्ट बी. प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते. नागपुरात त्यांच्या इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करण्याचं काम श्याम मानवांनी केलं. मानवांनी तेव्हा इंग्रजीची प्राध्यापकी सोडून पत्रकारिता सुरू केली होती. तरुण भारत या दैनिकात ते युवकांचा स्तंभ चालवित असत. वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमध्येही ते सक्रिय होते. त्या काळात अब्राहम कोवूरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा, भोंदू महाराजांचं वाढलेलं प्रस्थ या विषयात काहीतरी केलं पाहिजे, हा मानव आणि त्यांच्या सहकार्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असे. प्रेमानंदांच्या दौर्याने त्या विचाराला बळकटी आली. सर्वसामान्य लोकांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेला पाहिजे, यावर नास्तिक मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होऊन श्याम मानवांच्या नेतृत्वात डिसेंबर १९८२ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला. आमचा देवा-धर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली शोषण करणार्या, लुबाडणूक करणार्यांविरुद्ध आमचा लढा आहे, ही भूमिका घेऊन या कामाला सुरुवात झाली.
लवकरच या समितीने विदर्भात धूम केली. चमत्कार व दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणार्या अनेक बुवा-महाराजांना समितीने आव्हानं देणं सुरू केले. बेबी राठोड, गुलाबबाबा, शेळकेबाबा, रज्जाक बाबा अशा अनेकांचा समितीने भंडाफोड केला. अनेक मांत्रिक व वर्धेच्या शहाडे महाराजांसारख्या नामांकित ज्योतिष्यांनाही समितीने थेट आव्हान दिलं. कालांतराने तर देशभर ख्याती असलेल्या पायलटबाबा, कृपालू महाराज, बोलका पत्थरवाले पटवर्धन, सुंदरदास महाराज, नैनोदचा बाबा, शुकदास महाराज, आनंदीमाता, परिअम्मा, अशा अनेकांचे पितळ समितीने जनतेसमोर उघड केले. शकुंतलादेवीसारख्या अनेकांवर फजित होऊन नागपूर सोडण्याची पाळी आली होती. श्याम मानव व त्यांची टीम तेव्हा विदर्भात हिरो होती. तो काळ काही फार जुना नाही. तेव्हाची वर्तमानपत्रं पाहिली तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पराक्रमाचे रकानेच्या रकाने भरलेले आढळतील. त्या काळात विदर्भातील प्रत्येक मोठय़ा शहरात समितीच्या शाखा स्थापन झाल्या. समितीच्या कार्याचा विस्तार केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, खानदेशमध्येही झाला. गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेशातही श्याम मानव व त्यांचे कार्यकर्ते जाऊन आले. अनेक मोठे ज्योतिषी व महाराजांना आव्हान देण्याचं काम जोरात होतं. तेव्हा काहींनी तुमची संघटना मान्यताप्राप्त नाही, असा मुद्दा काढल्याने १९८६ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. श्याम मानव हे अखिल भारतीय संस्थापक संघटक होते. पहिले अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर पांडे, तर कार्याध्यक्षाची जबाबदारी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. भा.ल. भोळे यांच्याकडे होती. उमेशबाबू चौबे, रूपाताई कुळकर्णी, हरीश देशमुख, नागेश चौधरी, सुधाकर चौधरी, सुरेश अग्रवाल ही मंडळी पदाधिकारी होती.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९0 चं दशक अक्षरश: गाजवून सोडलं. समितीच्या कामाचा महाराष्ट्रभर गाजावाजा झाला. याच समितीत १९८७ मध्ये डॉ. दाभोळकर आले. पुण्यात आयोजित विषमता निर्मूलन शिबिरासाठी श्याम मानव व रूपाताई कुळकर्णी गेले असता बाबा आढावांनी नरेंद्र दाभोळकर नावाचा समाजवादी कार्यकर्ता अतिशय ताकदीचा आहे. त्याला अंधश्रद्धा निर्मूलनच्या कामात सहभागी करून घ्या, असे त्यांना सुचविले होते. त्यांच्या सूचनेनुसार मानव व रूपाताई दाभोळकरांना भेटायला सातार्याला गेले. तेथे चर्चेदरम्यान देवाधर्माला विरोध न करता अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम परिणामकारक पद्धतीने करता येणार नाही, असे आपले मतही दाभोळकरांनी व्यक्त केले होते. तेव्हा समितीची भूमिका व काम समजून घेण्यासाठी नागपुरात आयोजित शिबिराला उपस्थित राहा, असे आमंत्रण त्यांना देण्यात आले. कालांतराने दाभोळकर या कामात सक्रिय झाले. १९८७ ते १९८९ असे दोन वर्ष ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीत होते. त्यांना महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी श्याम मानवांनी दिली होती. मुकुंदराव किलरेस्कर महाराष्ट्र शाखेचे प्रदेशाध्यक्ष होते. १९८९ मध्ये श्याम मानव व दाभोळकरांमध्ये मतभेद झाले. संघटना फुटली. (मतभेदाची कारणं आणि संघटनेची फूट हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यात कोण चूक, कोण बरोबर याबाबत भरपूर मतभेद आहेत.) त्यानंतर लगेचच दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. भरपूर मेहनत करून संघटना नावारूपास आणली. दाभोळकरांच्या याच संघटनेचा सध्या रौप्यमहोत्सव सुरू आहे.
दाभोळकरांच्या संघटनेचा उदोउदो करताना मूळ संघटना, तिचे संस्थापक, पदाधिकारी व त्यांचं काम मुद्दामहून दडविण्याचा प्रय▪मात्र चीड येणारा आहे. जेवढं महत्त्वाचं काम दाभोळकरांनी केलं आहे, तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त काम श्याम मानव आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी जिवाची बाजी लावून समाजप्रबोधनासाठी आयुष्य दिलं आहे. श्याम मानव, उमेश चौबे, हरीश देशमुख, गणेश हलकारे, लक्ष्मीकांत पंजाबी, दिलीप सोळंके, शरद वानखडे, प्रा. अशोक राणा, मधुकर कांबळे, सुनील यावलीकर, विनोद अढाऊ अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी दिली आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याच्या विषयातही श्याम मानव यांची मेहनत आणि पाठपुरावा दाभोळकरांपेक्षा कुठेही कमी नाही. दाभोळकरांना पुणे-मुंबईतील वास्तव्याचा फायदा झाला. समाजवादी नेतेमंडळींचे ते लाडके होते. बहुतांश समाजवाद्यांना माध्यमांना कसं हाताळायचं हे चांगलं समजतं. त्यामुळे पुढे-पुढे दाभोळकर हेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्र्वयू आहेत, असा समज रूढ करण्यात ते यशस्वी झाले. दाभोळकरांच्या हत्येमुळे तो समज आणखी बळकट होण्यास मदत झाली. अर्थात याबाबत वाईट वाटायचं कारण नाही. दाभोळकर मोठे की मानव, हा येथे वादाचा विषयच नाही. फक्त अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा इतिहास मांडताना तो खरा मांडावा, ज्याचं श्रेय त्याला मिळावं, हे कोणीही सत्यप्रिय माणूस नाकारणार नाही.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |